23 January 2018

News Flash

व्हायरलची साथ : चमकणारा बाण

जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्ट हे त्याचं लखलखतं उदाहरण.

प्रशांत ननावरे | Updated: August 11, 2017 1:22 AM

आपल्याकडच्या असामान्य कौशल्याच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करता येते, हे जमैका व आफ्रिकन देशांच्या खेळाडूंनी साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे. अ‍ॅथलेटिक्स हा पदकांची लयलूट करण्याचा खजिना मानला जातो. आफ्रिकन देशांच्या खेळाडूंनी त्याचं महत्त्व ओळखलं आणि ऑलिम्पिक तसंच जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्ट हे त्याचं लखलखतं उदाहरण.

उसेनचे वडील क्रिकेटचे चाहते. परंतु, क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळविण्यासाठी खूप स्पर्धा असते. त्याऐवजी धावण्यात कौशल्य दाखवलं तर जागतिक स्तरावर यश मिळविता येईल, असं उसेनच्या वडिलांना वाटलं. क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्स या दोन पर्यायांपैकी त्यांनी उसेनला अ‍ॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. उसेनला शून्यातून आपली ओळख निर्माण करायची होती. त्यासाठी त्याने अपार मेहनत घेतली. एवढंच नव्हे तर शालेय वयातच त्याने आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली आणि बघता बघता ‘जगातील सर्वात वेगवान पुरुष’ अशी ख्याती मिळवली.

चित्त्याच्या वेगाने पळणाऱ्या उसेन बोल्टला ट्रॅकवर पाहणं म्हणजे सुखच. जागतिक स्पर्धेत उसेन बोल्टने अजिंक्यपद राखताना प्रत्येक वेळी आपल्या अतुलनीय कामगिरीचा प्रत्यय घडविला. विजेतेपद मिळविण्यापेक्षा ते टिकविणं अधिक कठीण मानलं जातं, मात्र प्रत्येक वेळी आपलेच विक्रम मोडीत काढत त्याने चाहत्यांच्या अपेक्षा इतक्या उंचावल्या की, प्रसारमाध्यमांनीही त्याला ‘लाइटनिंग बोल्ट’ (चमकणारा बाण) अशी उपाधी बहाल करून टाकली. बोल्टची कामगिरी विचारात घेतली तर अनेक खेळाडू अद्याप बरेच मागे आहेत, असंच म्हणावं लागेल; परंतु लंडन येथे होत असलेल्या ‘जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये आपल्या कारकीर्दीतल्या शेवटच्या सामन्यात बोल्टला मनासारखी कामगिरी करता आली नाही. आपल्या कामगिरीबाबत बोल्ट स्वत: नाराज असेलच पण, सर्वाधिक निराशा झाली त्याच्या चाहत्यांची. या स्पर्धेत अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने बोल्टला मागे टाकत सुवर्णपदक मिळवलं. तर बोल्टला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. उत्तेजक सेवन प्रकरणी गॅटलिनवर दोन वेळा बंदीची शिक्षा घातली होती. त्यानंतर तब्ब्ल बारा वर्षांनंतर गॅटलिनने पुनरागमन करत आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरलं. पण खरा किस्सा घडला तो पुढे. स्पर्धेनंतर जस्टिन गॅटलिनने एका गुडघ्यावर बसत बोल्टला मानाचा मुजरा केला. एखाद्या सुवर्णपदक विजेत्या स्पर्धेकाने कास्यपदक मिळवलेल्या स्पर्धकाला ट्रॅकवरच मुजरा करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हा आश्चर्याचा धक्का होताच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे छायाचित्रकारांनाही ही सर्वात मोठी फोटो अपॉच्र्युनिटी होती. गॅटलिन गुडघ्यावर बसल्याबरोबर कॅमेऱ्यांच्या लखलखाट सुरू झाला आणि लागलीच वेगवेगळ्या अँगल्समधून घेतलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दुसऱ्या दिवशी जगातील सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्रांनी त्या फोटोला पहिल्या पानावर स्थान दिलं.

या छायाचित्राची दखल यासाठी घ्यायची कारण उसेन बोल्ट हा केवळ तीस वर्षांचा आहे. कदाचित पुढील ऑलिम्पिकमध्ये तो धावताना दिसणार नाही. पण आपल्या पंधरा ते अठरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने कमावलेला आदर आणि केलेले विक्रम सुवर्णाक्षरांत कोरलेले आहेत. युवा खेळाडू म्हणून त्याने मोडित काढलेले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये केलेले विश्वविक्रम मोडणं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे. त्यामुळेच गॅटलिनची ही कृती अधिक दखलपात्र ठरते. उसेनसारख्या खेळाडूला हरवल्याचा माज न करता त्याने आपला आदर व्यक्त केला. कोणत्याही खेळात आणि खेळाडूंमध्ये, खेळाची अशी संस्कृती रुजणं मह्त्त्वाचं आहे. ज्या वेळेस आपण स्पर्धा आणि खेळ यांतला फरक ओळखू लागू त्या वेळेस त्या खेळाची आणि खेळाडूंचीही प्रगती होईल. कारण सन्मान हा मिळवावा लागतो. तो मागून मिळत नाही. हाच धडा आपण यातून घ्यायचा.

viva@expressindia.com

First Published on August 11, 2017 1:07 am

Web Title: usain bolt last race 2017 usain bolt justin gatlin beats usain bolt
  1. No Comments.