फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना. १४ तारखेचा प्रेमदिवस जवळ येतोय तशी हवा आत्तापासूनच गुलाबी झाली आहे. या दिवसानिमित्त तरुण पिढीला प्रेम या विषयावर बोलतं केलं. प्रेमाचा छोटासा सव्‍‌र्हे केला म्हणा हवा तर! प्रेम म्हणजे काय? इथपासून ते व्हॅलेंटाइन पार्टनर आणि लाइफ पार्टनर एकच असावा का? असे काही प्रश्न त्यांना विचारले. त्याचाच हा वृत्तांत..

‘हृदयात वाजे समथिंग.. सारे जग वाटे हॅपनिंग..’ अशी लक्षणं अचानक तुम्हाला तुमच्यात जाणवू लागली तर तारखेप्रमाणेच तुमच्यातही व्हॅलेंटाइन डेचं वारं शिरलंय असं समजायला हरकत नाही. कारण हृदयात त्याचे ठोके सदान्कदा वाजतच असतात आणि जगही कायम हॅपनिंगच असतं, तुम्हाला ते दिसत नसतं. तुम्ही प्रेमात पडलात की तुमच्यात असलेल्या गोष्टी नव्याने तुम्हाला उमजू लागतात. अगदी प्रत्येकाचंच असं होत असेल असं नाही. प्रत्येकाचं मत, अनुभव वेगळे असू शकतात. काही जणांच्या एकाच व्यक्तिमत्त्वात पूर्ण अनुभवांचा साठा असतो. म्हणूनच आम्ही ते अनुभव एकत्र करायचे ठरवले. म्हटलं बघू या प्रेम-बिम म्हणतात की काय ते कितपत कळलंय. त्यासाठी आम्ही १५-२५ वयोगटांतील १०० मुलांशी (मुलं-मुली दोन्ही) प्रेम या विषयावर बोलायचं ठरवलं. प्रेमाचा छोटासा सव्‍‌र्हे म्हणा हवा तर.. आणि काय आश्चर्य! पॅरिसनंतर आता महाराष्ट्रच रोमँटिक राज्य म्हणून जाहीर होतंय की काय, असा प्रतिसाद आम्हाला लाभला. त्या सगळ्या प्रेमवीरांचे आणि त्यांना प्रेमाचे बरे-वाईट अनुभव देणाऱ्या व्यक्तींचे आभार!

Taiwanese nurses protecting babies during earthquake video
Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

सव्‍‌र्हेचा पहिलाच प्रश्न अर्थात ‘प्रेम म्हणजे काय?’ असा होता. याचं उत्तर देताना राज्यात घरोघरी लेखक जन्माला घातलेयत असं म्हणायला हरकत नाही. प्रेम म्हणजे काय हे सांगताना मुलं (इथून पुढे मुलं म्हणजे त्यात मुलीसुद्धा) इतकी साहित्यिक होतात की, ‘प्रेम’ संकल्पना घेऊन सामान्यातल्या सामान्य नवसाहित्यिकांचं संमेलन होऊ  शकतं. यातला आश्चर्याचा भाग म्हणजे सगळ्यांची पहिली ओळ सारखीच असते. ‘प्रेमाची व्याख्या करता येत नाही’ किंवा ‘प्रेम म्हणजे काय नेमकं सांगू शकत नाही’ अशी सुरुवात करून पुढे प्रेम म्हणजे काय हे भरभरून लिहिलं जातं. जणू काही प्रेम व्यक्त करण्याचा हा एकच मार्ग आता शिल्लक आहे. ‘आसक्तीविरहित आपलेपणा म्हणजे प्रेम’ असं उत्तर एकीनं दिलं तर  ‘१००० किमी लांब असूनही दोघांत अंतर नसणं म्हणजे प्रेम’ असं उत्तर मिळालं. बहुतेक जणांनी काव्यात्मक उत्तरं दिली. यावरून पहिली कविता ही प्रेमात पडल्यावरच स्फुरते या संशोधनाला दुजोरा मिळाला. तितक्याच लोकांनी ‘ब्रेकअप’च्या प्रश्नामध्ये पण मन मोकळं केलं. याचाच अर्थ प्रेमाची तत्त्वज्ञानं मांडणाऱ्यांचं प्रेमप्रकरण काही नीट चाललेलं दिसत नाही.

पुढील प्रश्न हा ‘प्रेमात भावनिक गुंतवणूक महत्त्वाची की शारीरिक आकर्षण?’ असा होता. या प्रश्नाचं उत्तर देताना जवळ जवळ ८० टक्के लोकांनी ‘दोन्ही’ असं उत्तर देऊन सेफ गेम खेळला आहे. १९ टक्के लोकांनी ‘भावनिक गुंतवणूक महत्त्वाची’ असं म्हटलंय. आणि १ टक्का मत शारीरिक आकर्षणाच्या पारडय़ात नाव न सांगण्याच्या अटीवर पडलंय. आता खरं तर जरी आपण टक्केवारीनुसार पाहायला गेलो तरी ८० टक्क्यांवर मतं ही दोन्हीला आहेत म्हणजे शारीरिक आकर्षणालासुद्धा आहेत. त्यामुळे सरळ सरळ न सांगता शारीरिक आकर्षण या विषयाला टॅबू मानत लाजत त्यांनी तिकडे मत टाकलंय. १ टक्क्याकडून त्यांनी धडा घ्यायला हवा. या ८० टक्क्यांपैकी बऱ्याच जणांनी दोन्ही असं उत्तर देऊन पुढे शारीरिक आकर्षणाला दुजोरा देणारी सावध वक्तव्यं केली आहेत. उदाहरणार्थ : आकर्षण ही निसर्गाने दिलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे, जवळ येणंसुद्धा गरजेचंच असतं, इत्यादी. तर भावनिक गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्या एका मुलीने ‘शारीरिक गरजेसाठी एकत्र येणं हे प्रेम नाही तर सौदा आहे’ असं परखड मत व्यक्त केलं.

प्रेमात प्राधान्यक्रम देताना ५५ टक्के मुलांनी १) वेव्हलेन्थ २) दिसणं ३) राहणीमान असा क्रम दिला तर ४० टक्के मुलांनी १) अपिअरन्स २) वेव्हलेन्थ ३) राहणीमान असा क्रम दिला. ५ टक्के मुलं राहणीमानास अग्रेसर ठेवताना दिसली. यातून प्रेमासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आधी वेव्हलेन्थ जुळणं महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. उगाच अनोळखी लोकांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवत बसू नका. (एक फुटक सल्ला : ओळखीच्यांनाच समुद्रावर घेऊन जाऊन ‘वेव्ह्लेन्थ’ जुळवायचं बघा. कारण दिसणं आणि राहणीमान फार काही आपल्या हातात नाही आणि हातात असून तुम्ही त्यात मागे पडत असाल तर तुमचं आयुष्यात काही होणं कठीण आहे.. असो.)

व्हॅलेंटाइन पार्टनर आणि मॅरेज पार्टनर एक असावा का, असा प्रश्न विचारल्यावर ७५ टक्के मुलींचं उत्तर ‘हो’ असं होतं. तर ५० टक्के मुलग्यांचं उत्तर ‘वेगळे पार्टनर असले तरी चालतील’ असं होतं. पण जवळजवळ ८० टक्के मुला- मुलींनी पहिल्यांदा ‘डिपेण्ड्स..’ असं पॉलिटिकली करेक्ट उत्तर दिलं.  एखाद्याची तोच पार्टनर मिळण्याची इच्छा असो व नसो, सेम पार्टनर मिळणं अशक्य आहे. तूर्तास आहे त्याच्यासोबत सुखात आयुष्य चिंता. आणखी एक फुकटचं तत्त्वज्ञान असं की, व्हॅलेंटाइन पार्टनर आणि मॅरेज पार्टनर सेमच असतो. फक्त आपला मॅरेज पार्टनर दुसऱ्या कोणाचा तरी व्हॅलेंटाइन पार्टनर असू शकतो. मुद्दा काय तर – व्हॅलेंटाइन पार्टनर मॅरेज पार्टनर असण्याचं महत्त्व. मग तो कोणाचाही असो. त्यातही काही जणांनी आपल्यासाठी ‘मॅरेज पार्टनरलाच व्हॅलेंटाइन पार्टनरमध्ये बदलून टाका’ म्हणजे इतकं त्याच्यावर प्रेम करा असा मोलाचा संदेश दिलाय. कदाचित ती व्यक्ती अरेंज मॅरेजची समर्थक असावी. असो..

शेवटचा प्रश्न सगळ्यांचाच काळजाचा ठाव घेऊन गेला. सगळ्यांनी भरभरून लिहिलं, संदेश दिले, आम्ही त्यांचा पास्ट ओळखू शकतो इतक्या हिंट्स दिल्या. पण आम्हाला फक्त उत्तर हवं होतं. त्यामुळे उत्तरं दिलेल्यानो घाबरू नका, आम्ही तुमच्या भूतकाळात शिरणार नाही. आम्ही भविष्याचा वेध घेतो. ‘पहिलं प्रेम आणि पहिलं ब्रेकंप मॅटर करतं का?’ असा प्रश्न होता. त्यावर ९८ टक्के लोकांनी ‘होय. खूप मॅटर करतं’ असं लिहून त्यापुढे आम्ही ‘अनुभवकथन स्पर्धा’ आयोजित केल्याचा फील आम्हाला दिला. आणि उरलेल्या २ टक्क्यांनी शिव्या घालत ‘फुल्या फुल्या फुल्या अजिबात भूतकाळ फुल्या मॅटर करत नाही फुल्या’ असं म्हणून भावनांना वाट मोकळी करून दिली. आता जर मॅटर करत नसता तर इतक्या फुल्या का बाहेर पडल्या असत्या असं कोडं आहेच. पण आम्ही भावनांचा आदर करतो. त्यामुळे शेवटच्या प्रश्नाला १०० टक्के मत न देण्यात २ टक्क्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यातही काही जणांनी ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइटचा जमाना गेला आता’ अशी खंत व्यक्त केली. काहींनी व्हॉट्सअ‍ॅपला ठेवता येतील असे छान छान स्टेट्स दिले. ‘पहिलं प्रेम आकाशात झेप घ्यायला लावतं आणि ब्रेकअप जमिनीवर आपटवतं’, ‘ब्रेकअपमधून आपण जितके लवकर बाहेर निघू तितके उत्तम आणि हेच आनंदी आयुष्याचे गुपित आहे.’ इत्यादी. काहींनी ‘कपल असणं ही फॅशन आहे’ असं तत्त्वज्ञान दिलं तर काहींनी ‘तुमचं पहिलं प्रेम हे तुमचं पहिलं ब्रेकअप असणार नाही याची काळजी घ्या,’ असं म्हणत चिंता दर्शवली आहे. एक मनुष्य मात्र या सगळ्याला कंटाळून ‘या कलियुगात कुणावर विश्वास ठेवणं अवघड आहे’ अशी प्रतिक्रिया देतो. कोण म्हणतं आजची तरुण पिढी चिंतनात्मक नाही? असं म्हणणाऱ्यांनी ही उत्तरे वाचावीत.

अंतिमत: हा प्रेमाचा सव्‍‌र्हे म्हणजे जिवंत धगधगत्या हृदयाचं प्रेम परीक्षण आहे. प्रेमाची दुनिया आपल्याला खूप काही शिकवते. औपचारिक शालेय शिक्षणापेक्षा आपण या प्रेमाच्या शाळेत बाहेरूनच अधिक शिकतो हेच खरं. नाही तर एवढी उत्तरं परीक्षेतही लिहिली नसती तेवढी उत्तरं नेमकी ‘प्रेम इज इक्वल टू?’ या समीकरणाची आली. व्हॅलेंटाइन डे जवळ येतोय. आपण साजरा करणार असाल तर उत्तमच. इतरांनी खचून न जाता या सव्‍‌र्हेतून काही टिप्स मिळतायत का बघा. सिक्स्थ सेन्स जागृत ठेवून वाचा आणि वाचून झालं की आपल्याला जगातलं सर्वोत्तम तत्त्वज्ञान मिळाल्याचे तेज:पुंज आविर्भाव चेहऱ्यावर आणून शोध घ्यायला बाहेर पडा. का कोण जाणे, अचानक अपिअरन्सवरून पटकन वेव्हलेन्थ जुळून गेली तर?

या लेखासाठी शिवानी खोरगडे, लीना दातार, कोमल आचरेकर, वेदवती चिपळूणकर, तेजल चांदगुडे, तेजश्री गायकवाड, गायत्री हसबनीस, श्रुती जोशी, मानस बर्वे आणि राधिका कुंटे यांनी सर्वेक्षण केले.