18 September 2020

News Flash

इलाही मेरे जी आयें आयें..

एक फिल्ममेकर असल्यामुळे जीपीचा व्लॉग हा लघुपटासारखाच वाटतो.

गेल्या काही वर्षांपासून यूटय़ूबसारखं नवमाध्यम टीव्हीला टक्कर देत आहे. सुरुवातीला म्युझिक व्हिडीओ, प्रँक व्हिडीओ, ट्रेलर, टीजरपासून सुरू होऊन या माध्यमावरच्या वेबसीरिज सध्या हिट आहेत. वेबसीरीजबरोबर  आणखी एक प्रकार सध्या भलताच फॉर्मात आलाय -व्लॉगिंग अर्थात व्हिडीओ ब्लॉगिंग. हा तसा हौशी कलाकारांचा मंच. अगदी साधा कॅमेरा किंवा मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्यानेदेखील शूट केलेल्या रोजच्या जगण्यातल्या घडमोडींच्या व्हिडीओ पोस्ट हे या व्लॉगिंगचं वैशिष्टय़. गेल्या तीन वर्षांत आपल्या देशात हा व्लॉगिंगचा ट्रेण्ड चांगलाच बहरला आहे. बाइकर्स, रिव्ह्य़ूअर्स, फॅशन व्लॉगर्स अशा विविध व्लॉगिंग प्रकारातील नेटिझन्सच्या आवडीचा प्रकार म्हणजे ट्रॅव्हल व्लॉगर्स.

बाइक किंवा एखादी कार, जीप काढून वाट नेईल तिथे भटकायचं आणि फ्रंट कॅमेरा ऑन ठेवून भवताल टिपायचा. जोडीला अखंड बडबड मात्र हवी. हे भटकंतीमधील किस्से हाच ट्रॅव्हल व्लॉगर्सचा यूएसपी असतो. ट्रॅवल व्लॉगर्सचा एखादा व्लॉग पाहून आपणही असं कुठं तरी भटकंतीसाठी निघालं पाहिजे असं वाटल्यावाचून राहत नाही.  गो प्रो, काही गरजेचं सामान आणि धमाल करण्यासाठीचा बेसुमार उत्साह एकवटून निघालेले हे व्लॉगर्स तुम्ही यूटय़ूबवर पाहिले असतीलच. त्यातीलच काहींशी  व्हिवाने संवाद साधला आणि ट्रॅव्हल व्लॉगिंगचं तंत्र समजून घ्यायचा प्रयत्न केला.

दररोज एक व्हिडीओ ब्लॉग अपलोड करणाऱ्या डेली व्लॉगर्सची संख्या आपल्या देशात अजून तरी बरीच कमी आहे. अशा डेली व्लॉगर्सपैकी एक आहे गौरव. गौरव प्रभू अर्थात ‘जीपी’.  गेल्या सात वर्षांपासून यूटय़ूबच्या या दुनियेत सक्रिय असलेल्या गौरवने प्रेक्षकांचा कल ओळखत त्या अनुषंगाने व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. मुळात एक प्रोफेसर, फिल्ममेकर आणि एका रिअ‍ॅलिटी शोचा स्पर्धक म्हणूनही अनुभव असलेल्या गौरवने त्याच्या फिरण्याच्या छंदाला व्लॉगिंगची जोड दिलीय.

एक फिल्ममेकर असल्यामुळे जीपीचा व्लॉग हा लघुपटासारखाच वाटतो. व्लॉगिंगचं वैशिष्टय़ सांगताना गौरव सांगतो, व्हिडीओ ब्लॉगिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हीएफएक्स किंवा हाय एण्ड एडिटिंग केलेलं नसतं. त्यामुळे कोणत्याही व्लॉगरनं अपलोड केलेलं रॉफूटेज हेच वैशिष्टय़पूर्ण असतं. तेच अनेकांची मनं जिंकतं. गौरवच्या व्लॉगविषयी सांगायचं झालं तर, बेसिक तीन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने तो व्लॉगिंग करतो. यामध्ये डीएसएलआर, व्लॉग कॅमेरा आणि हेल्मेटवर लावण्यात येणाऱ्या अ‍ॅक्शन कॅमेऱ्याचा समावेश असतो. ‘व्लॉगिंगची सुरुवात करू इच्छिणाऱ्या नवख्यांना मोबाइलचा फ्रंट कॅमेराही उत्तम पर्याय आहे. माझ्या व्लॉग्समध्ये मी सहसा एका फिल्ममेकरच्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे व्लॉगमध्ये वापरण्यात येणारं म्युझिक आणि काही तांत्रिक बाबींवर मी जास्त लक्ष केंद्रित करतो,’ असं गौरव म्हणाला.

ट्रॅव्हल व्लॉगिंगविषयी सांगताना गौरव म्हणाला, ‘विविध ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांशी तुमच्या प्रेक्षकांना जोडणं म्हणजे ट्रॅवल व्लॉगिंग.’ व्लॉगिंग करताना तुमचा आत्मविश्वास, कॅमेऱ्यासमोर बोलण्याची, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची तुमची ताकद आणि व्लॉगचा कंटेण्ट सर्वात महत्त्वाचा आहे. ही बाब गौरवने प्रामुख्याने नमूद केली. आतापर्यंत आपल्या राज्याखेरीज, लेह-लडाख, केरळ, जयपूर अशा विविध ठिकाणांना भेट देत अवघ्या काही मिनिटांचे व्लॉग यूटय़ूबवर पोस्ट करणारा गौरव येत्या काळात सेवन सिस्टर्स अर्थात ईशान्य भारताच्या दौऱ्याची तयारी करत आहे.

हल्ली बुलेट ही व्हिडीओ ब्लॉगर्ससाठीचा एक सिम्बॉल बनून गेली आहे. पण, काही प्रवासांमध्ये बुलेटपेक्षा इतर वजनाने हलक्या गाडय़ा फायदेशीर ठरतात. हा अनुभव मला लेह-लडाखच्या रोड ट्रिपदरम्यान आला. व्लॉगिंग आणि रोड ट्रिप म्हटलं की अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. बॅटरी चार्जिगपासून ते अगदी पोलिसांना आपण काय करत आहोत हे पटवून देण्यापर्यंतचे अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे राहू शकतात.

गौरव प्रभू 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 4:40 am

Web Title: video blogging on you tube travel vloggers
Next Stories
1 व्ही फॉर व्लॉगिंग
2 भटकंतीचा आनंद शेअर करण्यासाठी..
3 कल्लाकार : नव्या पिढीचा हास्यसम्राट
Just Now!
X