विनय नारकर

भारतात धार्मिक संकल्पनांचा, चालीरीतींचा आणि वस्त्र परंपरांचा अन्योन्य संबंध आहे. हिंदू पुरुषांनी व स्त्रियांनी कशा प्रकारची वस्त्रे परिधान केली पाहिजेत याबद्दल धर्मशास्त्रांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. हिंदू परंपरेप्रमाणे ‘न शिवलेले’ कपडे नेसण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा प्रकारे, न विणलेल्या धाग्यापासून म्हणजे जान्हव्यापासून ते ‘न शिवलेल्या’ कपडय़ापर्यंत म्हणजे धोतर व साडीपर्यंत..असा आपला वस्त्र प्रवास धर्माधिष्ठित आहे.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

हाच पोषाख देवतांनाही अर्पण करण्याची परंपरा भारतात सर्व भागांत पाहायला मिळते. फक्त देवतांनाच नाही, तर मंदिरांसाठीही सजावटीची, उपासनेची वस्त्रे बनवण्याच्या अनेक परंपरा भारतात निर्माण झाल्या. विविध प्रदेशानुसार भारतात विविध मंदिरांमधून धार्मिक विधींसाठी अनेक वस्त्रप्रकार बनत आले आहेत.

मंदिरांमध्ये गर्भागृहात आणि छताखाली चौरसाकृती कापडी चांदवा लावण्याची पद्धत होती. विशेषत: जैन मंदिरांमध्ये चांदवा असायचाच. उत्तर भारतीय जैन मंदिरांमध्ये चांदव्यासोबत मुर्तीच्या मागेही एक पट लावण्याची प्रथा होती, त्यास ‘छोड’ किंवा ‘पुथिया’ असे म्हटले जायचे. ‘चांदवा’ आणि ‘छोड’ हे दोन्ही अप्रतिम कशिदाकारी आणि प्लिकने सजवलेले असायचे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात एका जैन मंदिरातील एकोणिसाव्या शतकातील ‘चांदवा’ व ‘छोड’ जतन केले आहेत. यांवर जरदोजीचे अद्भुत काम पाहायला मिळते.

हिंदू मंदिरांमध्ये उत्सवाच्या वेळेस आणि इतरही वेळेस सजावटीसाठी व उपासनेसाठी देवदेवतांची चित्रे, पुराणकथांची चित्रे काढून पट बनवण्याची मोठी परंपरा आहे. असे पट बनवणे हा एक उपासनेचा मार्ग समजला जातो. काही परंपरांमध्ये अशा पटांच्या पुजेला, मूर्तिपुजेचा दर्जा आहे. लाकडी रथांमध्येही हे पट यात्रेच्या वेळी लावले जात. अशा धार्मिक प्रेरणांमधून काही संपन्न वस्त्र परंपरा निर्माण झाल्या. त्यापैकी महत्त्वाच्या म्हणजे ‘कलमकारी’ आणि ‘पिछवाई’.

आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्ती आणि मछलीपट्टणम या गावांमध्ये कापडावर वनस्पतिजन्य रंगांनी लेखणी/ कलम वापरून अप्रतिम चित्रे काढली जातात. या पद्धतीने नंतर साडय़ांवरही चित्रे काढली जाऊ  लागली. मंदिरांमधील या पटांवर कलमकारीने रामायणातील कथा, कृष्णलीला हे विषय प्रामुख्याने येतात. याशिवाय काही स्थानिक कथानकांमधूनही परंपरा तयार झाल्या, आंध्र प्रदेशातील मंदिरातील ‘गंगाम्मा’ पटांवर तिथल्या ‘काटमराजू’ या महापुरुषाच्या आणि त्याच्या पंथाच्या कथा असलेले मोठमोठे पट कलमकारीने बनवले जात. ही कलमकारी तंत्रातली चित्रे बनवताना त्या चित्रकारास कथेचा मथितार्थ व रूढ संकेत सांभाळून कल्पनाविस्तार करण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे त्या चित्रांचे वेगळेपण जपले जाई.

उत्तर भारतात सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला काही वैष्णवांनी कृष्ण हे आराध्य दैवत असणाऱ्या वल्लभाचार्य पंथाची स्थापना केली. ते आपल्या मंदिरातील कृष्ण प्रतिमेमागे विशिष्ट प्रकारची चित्रे लावतात. त्या चित्रांना प्रतिमेमागे लावले जात असल्यामुळे ‘पिछवाई’ असे नाव पडले. या सुंदर चित्रांची अतिशय महत्त्वाची परंपरा तयार झाली. ही चित्रे सुती कापडावर काढली जातात. काही वेळेस कशिदाकारीनेही पिछवाई बनवली जाते. हातमागावर जरीने विणलेली पिछवाई ही सगळ्यात दुर्मीळ. विविध सण, उत्सवानुसार आणि ऋतुंनुसार पिछवाई बदलण्याची रीत होती. पिछवाईंचे विषयही ठरावीक असतात. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थातच कृष्णाचे जीवन. वल्लभाचार्य पंथाच्या इतिहासाबद्दलही चित्रे यात असतात. त्याशिवाय त्यांचे रिवाज, विधी यांची चित्रे आणि काही फुलांची व प्राण्यांची चित्रेही काढली जातात. आज राजस्थानातील ‘नाथद्वारा’ हे पिछवाई चित्रांचे सर्वात महत्त्वाचे स्थान आहे.

धार्मिक रूढींनी आणखी एका कलेला जन्म दिला, तिची सुरुवात मात्र एका वेदनेतून झाली होती. गुजरातमधल्या वाघरी समाजाला मंदिरात प्रवेश करण्यास मनाई होती. त्या समाजातील लोकांनी कापडावर देवीची आणि अन्य स्थानिक देवतांची चित्रे काढून, मंदिरांमागे, त्या पटांचे तंबू उभे करून उपासना सुरू केली. ही कला ‘माता नी पछेडी’ म्हणून ओळखली जाते. या चित्रांची लोकप्रियता हळूहळू वाढते आहे. पिछवाईप्रमाणे, ‘माता नी पछेडी’ या कलेचाही डिजायनर्स साडय़ा व अन्य पोशाखांत वापर करू लागले आहेत.

कृष्ण उपासना ही आसामात अतिशय विलोभनीय स्वरूपात वस्त्रकलेत अवतरली. आसाममधील प्रख्यात संत श्री शंकरदेवांनी तिथल्या विणकरांकडून, साधारण १५६५ मध्ये कृष्ण जीवनावर आधारित पट विणून घेतले. ती विणण्याची कला पूर्णपणे लुप्त झाली आहे. हे पट ‘वृंदावनी वस्त्र’ म्हणून ओळखले जातात. एकोणिसाव्या शतकापर्यंत ही परंपरा चालू असल्याचे उल्लेख सापडतात. इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेतील काही संग्रहालयात वृंदावन वस्त्रे आजही पाहायला मिळतात. लंडनच्या संग्रहालयातील वृंदावनी वस्त्र हे जागतिक वस्त्रकलेच्या इतिहासातील एक अद्भुत प्रकार समजला जातो.

मणिपूरमधील ‘मैती’ या वैष्णवपंथीय समाजासाठी तिथे ‘टेपेस्ट्री’ या अवघड व दुर्मीळ पद्धतीने विष्णूकथा विणून शाली बनवल्या जायच्या. याही आता नामशेष झाल्या आहेत. याशिवाय आसामी लिपीत विणला जाणारा प्रसिद्ध गमछा, बंगाल – उडीशा आणि बनारस येथील सुलेखन असलेली ‘नामावली’ अशी ‘धार्मिक वस्त्रांची’ भारतात संपन्न परंपरा आहे.

संकलन : तेजश्री गायकवाड