यू टय़ूब चॅनेल्समधील काही अतरंगी आणि वेगळ्या वेब मालिका, कार्यक्रम, व्हिडीओ ब्लॉग्स यांची दखल.

‘हे गाइज, वॉस्सअप..मिसिंग मी..? हिअर आय अॅम’ असा काहीसा ‘कूल’ अॅटिटय़ूड ठेवत साचेबद्ध सूत्रसंचालनाला फाटा देत अनेक नवे चेहरे सध्या करमणुकीची परिभाषा बदलत आहेत. इंटरनेटमुळे स्वत:चं लेखन प्रसिद्ध करणं हे सहज शक्य झालं. लेखकांना ब्लॉग हे नवीन व्यासपीठ मिळालं. ब्लॉग्सच्या फॉलोअर्सचा आकडा वाढतो ना वाढतो तोच, गेल्या काही काळात व्हिडीओचा बोलबाला वाढला आहे. आपलं म्हणणं, मत, विचार, आपली कथा व्हिडीओच्या माध्यमातून मांडायची. अर्थात त्याचा व्हिडीओ ब्लॉग करायचा ही पद्धत जास्त उचलली गेली. यू टय़ूबची लोकप्रियता वाढण्यात या व्हिडीओ ब्लॉग्जचा मोठा हात आहे.

‘व्लॉग’ म्हणजेच व्हिडीओ ब्लॉग. जगभरात ‘व्लॉगिंग’च्या मदतीने प्रसिद्धी मिळालेल्यांचा आकडाही वाढतोय. मोठमोठाले सेट नाहीत, तगडी स्टारकास्टही नाही, रट्टेबाज संहिता नाहीच तरीही आपलं म्हणणं, लोकांचेच प्रातिनिधिक विचार सोप्या (पण वेगळ्या) पद्धतीने, आकर्षक सूत्रसंचालनाची जोड देऊन मांडणं ही लोकप्रिय व्लॉग्सची काही वैशिष्टय़. अशा तगडय़ा एकेका व्लॉगचे साधारणत: दहा हजारांच्याही वर सब्सस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या दर्शकांचा आकडा लाखांवर पोहोचलाय आणि वाढतच जातोय. अगदी रोजच्या जगण्यातले विषय (तरीही जास्त करून दुर्लक्षित), दर्शकांना आपली वाटणारी भाषा आणि त्यात नव्याने काही तरी सांगण्याची आवड हे व्लॉग्स वारंवार पाहण्यासाठी दर्शकांना भाग पाडतात.
9
अशाच काही फेमस व्लॉगिंग चॅनल्सपैकी चर्चेत असणारी नावं म्हणजे सुपरवुमन, रिक्षावाली, ओल्ड डेल्ही फिल्म्स, लव रुद्राक्ष आणि अजून बरीच नावं या यादीत आहेत. काही व्हिडीओमध्ये तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुख्य सूत्रसंचालक असतात. (उदाहरणार्थ लव रुद्राक्ष इन कोलॅबरेशन विथ रिक्षावाली) तर काही वेळेला दोन वेगवेगळ्या यूटय़ूब चॅनेलवर काम करणारे सूत्रसंचालक एकत्र येऊन अक्षरश: हैदोस घालतात. या चॅनल्सचे विषय जितके निराळे तितकंच त्यांच्या नावातही वेगळेपण, म्हणजे ‘लव रुद्राक्ष’ हा दिल्लीचा एक यूटय़ूबर असून हे त्याचं एकटय़ाचं नाव नव्हे. तो आणि त्याचा एक ग्रुप मिळून या चॅनेलवर व्हिडीओज बनवतात आणि अपलोड करतात. हल्लीच त्यांच्या चॅनलने सबस्क्रायबर्सचा लाखाचा आकडा गाठला आहे. संपूर्ण ‘बम्बईया ईश्टाईल’ने यूटय़ूबच्या वर्तुळात अनेकांना वाट बघायला लावणारी, नखरेल अंदाजाची टोपी घालून येणारी व्लॉगर ‘रिक्षावाली’. या चॅनेललादेखील हजारोंनी सबस्क्रायबर्स मिळाले आहे. ‘सुपर वुमन’चा व्लॉगही नावाप्रमाणेच सुपर आहे. फेम हासुद्धा असाच एक चॅनल. फेम बॉलीवूडची ‘स्टक विथ फेम’ ही सीरिजही अपेक्षांवर खरी उतरली आहे. तर ‘फेम स्कूल ऑफ स्टाइल’ची व्लॉगर बरशा धरन ही काही सोपे, सर्वाना जमतील असे फॅशनचे धडे शिकवून जाते, फॅशन डिझायनिंग न शिकताही फॅशन डिझायनर बनण्याच्या काही ट्रिक्स (जसं जुन्या टी शर्टचा श्रग कसा बनवावा?) बऱ्याचशा सरळ भाषेत उलगडून सांगते. फॅशनशी निगडितही बरेच व्लॉग्स यूटय़ूबवर आहेत.

ब्रेकअप होण्याची कारणं, बेस्ट फ्रेंड रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा, भारतात सोशल नेटवर्किंग साइट्स बंद केल्या तर.. आणि असे काही एरवी निषिद्ध मानलेले फुल्याफुल्यांनी बोलण्याचे विषयदेखील व्लॉगिंगवर चर्चेला येतात. अनुभवलेला पहिला लैंगिक छळ किंवा विनयभंग, वुमन सेफ्टी, वाय इंडियन्स हेट पाकिस्तान.. यांसारखे सेन्सिटिव्ह विषयही हे व्लॉगर तितक्याच हिरिरीने हाताळतात. याच कलाकारी तत्त्वामुळे आज अनेजण यूटय़ूबच्या सर्चबॉक्समध्ये या व्लॉग्सचाच शोध घेत असतात. तेव्हा मग व्लॉग्सद्वारे मांडले जाणारे प्रश्न, त्यावरून होणारी विचारांची देवाणघेवाण, बदलत जाणारा दृष्टिकोन हे सारं अनुभवायचं असेल तर गो फॉर इट.

– सायली पाटील