गेल्या काही वर्षांत पर्यावरण संवर्धनासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नानाविध भागातून तरुणाई एकजूट होऊन कार्य करताना दिसते आहे. पानी फाऊंडेशनअसेल किंवा नामसारख्या संस्था असतील सेलिब्रिटींच्या संगतीने, कधी त्यांना पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी उद्युक्त करत ही तरुण मंडळी नवनवीन योजना राबवताना दिसत आहेत.  या योजनांचे चेहरे बॉलिवूड सेलिब्रिटींचे आहेत. ५ जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बॉलीवूडच्या संगतीने सुरू असलेल्या  योजनांची ही झलक..

बॉलीवूडकर आता फक्त सिनेमापुरते मर्यादित राहिलेला नाहीत. अनेक मोठे सेलिब्रिटी सामाजिक काम करताना दिसतात.   पर्यावरण संवर्धनासाठीही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर पुढाकार घेतला असून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणाईबरोबर ही मंडळी प्रभावीपणे काही नवीन योजना राबवत आहेत. अक्षय कुमार आणि आमिर खान ही यातील काही आघाडीची उदाहरणं आहेत, त्यांचं कार्य याआधीही प्रकाशात आलं आहे, मात्र आता तरुणांची आवडती अभिनेत्री आलिया

भट्ट हिनेदेखील नव्या उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतला आहे. येत्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणीय समस्यांचा विचार करत त्यावर मात करण्यासाठी इकोफ्रेण्डली पर्यायांचा वापर तिने सुरू केला आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या, नव्या तंत्रांचा अभाव असलेल्या गावांमध्ये आधुनिक पद्धतीने वीजनिर्मिती करायची आणि त्यासाठी प्लास्टिक बॉटल्सचा वापर करण्यात येतो आहे. या योजनेसाठी आलियाने तिच्या ‘स्टाइल क्रॅकर’ या पर्सनलाइज्ड ब्रॅण्डमार्फत स्वत:च्या जुन्या कपडय़ांचा लिलाव केला.  त्यातून आलेल्या पैशांतून ‘अरोहा’ या बंगळूरुमधील संस्थेला मदत करण्यासाठी तिने पुढाकार घेतला आहे.

जुने कपडे आणि वीजनिर्मिती यांचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही. मात्र आलियाने विचारपूर्वक एक योजना आखली आहे. आपल्या जुन्या वापरलेल्या कपडय़ांचे काय करायचे, हा आपल्याला नेहमी छळणारा प्रश्न. आलियानेही आपल्या या प्रश्नावर उत्तर म्हणून तिच्या महागडय़ा कपडय़ांचा लिलाव केला. तिला फिट न होणारे कपडेही तिने लिलावात विकले. या कपडय़ांमध्ये तिचे डिझायनर कपडे, सिनेमात वापरलेले कपडे, घरात वापरलेल्या कपडय़ांचा समावेश आहे. या उपक्रमाचे नाव ‘मी वॉड्रॉब, सी वॉड्रॉब’ असे ठेवले होते. ‘माझे कपाट तेच तुमचे कपाट’ या अर्थाने पार पडलेल्या या लिलावातून जे पैसे आले ते तिने ‘अरोहा’ या चॅरिटीतून उभ्या राहणाऱ्या ‘लाइटर द लाइट’ या उपक्रमासाठी दिले आहेत. यातून सौर वीजनिर्मिती करण्यात येणार आहे

‘लाइटर द लाइट’ या संस्थेचे उपसंचालक पंकज दीक्षित म्हणाले,  ‘सोलार पॅनल उभे करून वीजनिर्मिती करणे हाच एक इकोफ्रेण्डली टास्क आहे. उपयोगानंतर प्लास्टिक बाटल्यांचे विघटन कसे करायचे हा प्रश्न असतो. त्याऐवजी या बाटल्या रिसायकल करून वीजनिर्मिती के ली जाते. या बाटल्या क्लोरिनने भरल्या जातात व त्याला सोलार पॅनलशी जोडले जाते. त्यातून बरेच तास वीजनिर्मिती होऊ शकते. बाजारातील असे सोलार पॅनल जास्त किमतीचे असतात. काही यंत्रसामुग्री बाजारातून आणून प्लास्टिक बाटल्या इतरांकडून जमा करून त्या रिसायकल करण्यासाठी सोलार सिस्टीमला त्याद्वारे एकत्रित करून वीजनिर्मितीसाठी रचना केली जाते.’  हैदराबादमधील पहिल्या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद येतो, असंही ते म्हणाले.

आज आपल्याकडे पर्यावरण या विषयाशी निगडीत अनेक स्टार्टअप्स आहेत पण त्यासाठी जनजागृती करणाऱ्यांची संख्या कमी आहे.  समाजमाध्यमांवरचा प्रभाव आणि लोकप्रियता या दोन मुद्दय़ांमुळे सेलिब्रिटींनी प्रोत्साहन दिलेले स्टार्टप्सना फायदा होतो, असे दिल्लीचे फॅशन डिझायनर मनोज कुमार यांनी सांगितले. लाडक्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्या  ब्रॅण्ड्सना  किंवा  स्टाइलला फॉलो करणं हा तरुणांचा ट्रेण्ड आहे. कुठले सेलिब्रिटी कोणते ब्रॅण्ड फॉलो करतात यावर आजच्या पिढीचे लक्ष असते, त्यामुळे आलिया भट्टसारखी अभिनेत्री जर कपडे लिलावासाठी काढत असेल तर त्या कपडय़ांची खरेदी किती पैशात करायची याची एक ग्राहक म्हणून तरुणांना माहिती असते. तिच्या वयाच्या तरुणीच तिचे कपडे परिधान करू शकतात. त्यामुळे तिलाही तरुणांचे फॅन फोलोइंग मिळते. खरेदी-विक्रीच्या या तंत्रातून ग्राहक वाढवण्याचा मोठा उद्देश साध्य होतो. यातून  मिळणारी रक्कम स्टार्टअप्सना मदत म्हणून दिली जाते.  काही सेलिब्रेटी कपडे रिसायकल करण्यासाठी विविध टेक्स्टाइल इंडस्ट्रीत देतात, जिथे त्यापासून इकोफ्रेण्डली पद्धतीने कपडय़ांची पुनर्निमिती केली जाते. त्या कपडय़ातून चप्पल, बॅग, उशांचे अभ्रे अशा रोजच्या वापरात येणाऱ्या गोष्टी तयार केल्या जातात. कपडय़ांचे विघटन करून योग्य तो डिझायनर ड्रेस तयार करून असे कपडे सेलिब्रिटींच्या पुढाकारातून विकले जातात. हल्ली त्यांचे स्वत:चे ब्रॅण्ड्सही असल्याने त्यातून इकोफ्रेण्डली किंवा सस्टेनेबल फॅशनला पुष्टी मिळते. त्यांचे टायअप असणाऱ्या ब्रॅण्ड किंवा फॅशन लेबलमार्फतसुद्धा इकोफ्रेण्डली, रिसायकल आणि अपसायकल कपडे विकले जातात. भारतातील अर्थकारण हे जास्त कॉटन, खादी आणि ज्यूट या फॅ ब्रिकवर अवलंबून आहे. सस्टेनेबल फॅशनची कल्पना ही परदेशातून आली असली तरी इथे आपल्याकडे गरीब कामगारांना आर्थिक पाठबळ म्हणून सस्टेनेबल फॅशनचा मोठा हातभार लागतो आहे आणि यामुळे एका अर्थी पर्यावरण आणि सेलेब्रिटी हे समीकरण घट्ट होत चाललंय, असं मनोज कुमार यांनी स्पष्ट केलं.

आलियाने तिच्या ‘कोएक्झिस्ट’ या उपक्रमातून प्राण्यांच्या विकासासाठी मदत म्हणून लोकांना उद्युक्त केले होते. तिच्यासारखे अनेक सेलिब्रिटी पर्यावरणसंवर्धनासाठी अनेक संस्थांना मदत करत आहेत. नवी तंत्रे कशा प्रकारे अवलंबली जातील व त्यासाठीचा खर्च लक्षात घेता काही नामवंत कलाकार आपल्या वेगळ्या कल्पनेतून त्यासाठी लागणारा खर्च उभा करत आहेत.  जॉन अब्राहमने ‘गार्निअर’ या कॉस्मॅटिक क्रीमच्या जाहिरातीच्या माध्यमातून ‘पॉवर लाइट अ व्हिलेज’ या संस्थेला आर्थिक मदत करतो आहे. अभिनेत्री नंदिता दासदेखील फिल्म्सच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करतेय. ९० सेकंदाच्या फिल्ममधून विविध पर्यावरणावर आधारित संदेश देऊन मोठय़ा सायन्स सेंटरमध्ये ती दाखवते. प्रियांका चोप्रानेही तिच्या ‘ग्रीनथोन’ या उपक्रमातून विविध पर्यावरणविषयक कायदे पुढे आणण्यावर भर दिला आहे. गुल पनाग ही अभिनेत्री आपल्या ‘ग्रीनहॉम’ या स्टार्टअपच्या माध्यमातून सोलार व रेन हार्वेस्टिंगसाठी लोकांना प्रोत्साहित करते आहे. राहुल बोस हा एका मोठय़ा कंपनीचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर असल्याने त्या माध्यमातून वातावरण बदलाविषयी तो मोठय़ा संस्थांना मदत करतोय. मिलिंद सोमणने  ‘एन्व्हायरमेंटल फिटनेस’ या स्वत:च सुरू केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करत ‘डिग्रेडेशन’च्या समस्येबद्दल जनजागृती करतो आहे. अभिनेत्री रवीना टंडनने कारचा वापर कमी करून सायकलचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. जॉन अब्राहमने ‘पेटा’ या उपक्रमातून बंदी पक्षांना मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलाय. दिया मिर्झा हिने शहरातसुद्धा फुलपाखरू, चिमण्या व इतर कमी होत चाललेले पक्षी परत यावेत म्हणून त्यांच्या अन्नधान्यांचा साठा वाढवण्याची योजना सुरू केली आहे. तर सोनाक्षी सिन्हानेही  दिवे बंद करणे, कपडे रिसायकल करणे आणि इकोफ्रेण्डली गणपती यांना चालना मिळावी म्हणून स्वत: पुढाकार घेतला आहे.

मराठी कलाकारही यात मागे नाहीत. सुयश टिळकने रोज एक याप्रमाणे ४० झाडे लावली.  तर भूषण प्रधानने  प्रदूषण कमी व्हावे म्हणून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री दीपाली पानसरेने देखील एअर कंडिशन न वापरण्याचा निर्णय घेत अमलात आणला आहे. एसीतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक गॅसमुळे नंतर ग्लोबल वॉर्मिगच्या समस्या उभ्या राहतात म्हणून तिने हा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे तरुणांचा पर्यावरण कार्यात हातभार वाढावा म्हणून एकीकडे

सेलिब्रिटी त्यांना एकत्र आणतायेत तर दुसरीकडे तरुणाईही त्यांच्या साथीने पर्यावरण संवर्धनाच्या योजना प्रत्यक्ष राबवत खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा करत आहे.

viva@expressindia.com