सायली सोमण

इतिहासात सांगितल्याप्रमाणे आपल्या देशात विविध भाषा आणि संस्कृती संपन्न असल्यामुळे, प्रत्येक राज्य-प्रदेश कलागुणांनीही तितकाच संपन्न आहे. टेक्स्टाइल-फॅब्रिक विणकाम आणि हस्तकला या क्षेत्रांमध्ये तर आपल्या देशाएवढी विविधता कुठेच नसेल. कालांतराने आज आधुनिक तंत्रज्ञान, जागतिकीकरण, पाश्चिमात्य राहणीमानाचा प्रभाव यामुळे यातील काही विशेष टेक्स्टाइल्स आणि फॅब्रिक्स बाजारात कमी मागणीमुळे कुठे तरी दुर्मीळ झाले आहेत किंवा असले तरी त्याच्या आर्टिफिशिअल आवृत्ती जास्त बघायला मिळत आहेत. आज यातीलच काही टेक्स्टाइल्स आणि फॅ ब्रिक्सवर आपण एक विशेष नजर टाकणार आहोत.

ईकत

ईकत हे नाव एक माले-मलेशियन शब्द ‘मेंगिकत’वरून घेतले आहे ज्याचा मोघम अर्थ आहे ‘बंध’. म्हणजेच काही निवडक धागे एकत्र बांधून त्यावर रंगांची कलाकृती करण्याची एक भव्य आणि किचकट क्रिया. थोडक्यात कापड विणायच्या आधी त्यामधील काही निवडक धाग्यांवर ‘टाय अ‍ॅण्ड डाय’ची क्रिया करून एका विशिष्ट प्रकारचे डिझाइन तयार करणे. या कलाकृतीचा उगम जगातील एकाच विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित नसून बहुरंगी आहे. या प्रकारचे टेक्स्टाइल दोन पद्धतीत विणले जाते ‘सिंगल ईकत’ आणि ‘डबल ईकत’. सिंगल ईकतमध्ये कापड विणताना ताणा किंवा बाणा यापैकी कोणत्याही एकाच दिशेच्या धाग्यांवर टाय आणि डायची प्रक्रिया होते तर डबल ईकतमध्ये दोन्ही दिशेतील धाग्यांवर ही प्रक्रिया केली जाते. भारतात ही कलाकृती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावात आणि रूपात प्रसिद्ध आहे.

दक्षिण भारतात ‘डबल ईकत’ प्रकारातील ‘तेलाइ रुमाल’ आणि ‘पोचमपल्ली साडय़ा’ प्रसिद्ध आहेत तर गुजरातमध्ये पाटण भागातील ‘डबल ईकत’ प्रकारच्या ‘पटोला’ साडी जास्त बघायला मिळतात तर राजकोट ‘सिंगल ईकत’मधील साडय़ा आणि फॅब्रिक्ससाठी प्रसिद्ध आहे. ‘सिंगल ईकत’ पद्धतीने विणलेले ‘बंधाज’ ओरिसामध्ये बघायला मिळते. ईकत पद्धतीतील प्रत्येक कापड-टेक्स्टाइलची ओळख त्यातील वापरल्या जाणाऱ्या सुतांच्या प्रमाणावर (कॉटन, सिल्क इत्यादी प्रमाण), रंगसंगती, वापरले जाणारे डिझाइन मोटीफ (फुले, फळे, पाने, प्राणी, पक्षी इत्यादी) तयार झाल्यावर त्याचा कुठल्या रूपात वापर होतो या सर्व पैलूंवर अवलंबून असते.

ईकतचा सविस्तर विचार केला तर बऱ्याच डिझायनर्सनी या टेक्स्टाइलला आजच्या काळाप्रमाणे मॉडर्न पद्धतीने वळवले असले तरी पूर्वीसारखे शंभर टक्के कॉटन किंवा सिल्क आता मिळणे खूप अवघड होऊ न बसले आहे. याचे कारण या पद्धतीचे विणकाम खूप किचकट आणि लांबलचक प्रक्रियेचे असल्यामुळे आणि या महागाईच्या काळात या कारागिरांना त्यांच्या मेहनतीचा हवा तसा मोबदला मिळत नाहीच, शिवाय आजच्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रिंटेड ईकत विविध रंगांत आणि परवडणाऱ्या किमतीत बाजारात उपलब्ध झाले आहेत. तरी जितके शक्य होईल तितके हिमरूप्रमाणेच सुरय्या हसन यांनी ‘चेनेथा’सारख्या ‘विवर को-ऑपरेटिव्हज’च्या मदतीने ही कलाकृती शक्य तितकी लोकांमध्ये जिवंत ठेवली आहे.

बोमकाई सारी

या साडीचे मूळ ओरिसामधील ‘बोमकाई’ नावाच्या गावामध्येच आहे. ही साडी पूर्वी कॉटनमध्ये विणली जायची, पण कालांतराने लोकांच्या मागणीवरून ही साडी सिल्कमध्येही बनायला लागली. खरी बोमकाई साडी ही फक्त लाल, काळ्या आणि पांढऱ्या रंगाची असते, याचा पदर आणि किनारे खूप भरलेले असतात. ही एक साधारण पिटलूमवर विणली जाते ज्यावर रुद्राक्ष, हत्ती आणि इतर पारंपरिक मोटीफ विणले जातात. आजच्या काळात साडी आणि कापडाच्या उत्पादनात इतक्या नवीन नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर शिरला असल्यामुळे कुठेही शुद्ध सिल्क आणि कॉटनपासून विणलेल्या बोमकाई साडी मिळणे कठीण झाले आहे.

मश्रू

या शब्दाचा उगम अरेबिक शब्द ‘शारी’मधून झाला ज्याचा मूळ अर्थ ‘इस्लामिक कायद्याची परवानगी असलेला’ असा आहे. कुराणात सांगितल्याप्रमाणे इस्लामिक पुरुषांसाठी कुठलीही चैनीची किंवा शाही वस्तू वापरणे वज्र्य आहे. सिल्क हे कापड या चैनीच्या वस्तूंमध्ये मोडते. म्हणूनच ‘मश्रू’ हे फॅब्रिक बाहेरून सिल्क आणि आतून कॉटन असते. त्यामुळे त्यांना याचा वापर पूर्वीच्या काळात करता आला. भारतातील शाही कुटुंबे लयाला गेली तसे टेक्स्टाइलची मागणी आणि मूल्य कमी होत गेले. गुजराथमधील पाटण या भागातील काही निवडक कारागीर आजही हे फॅब्रिक विणतात परंतु नैसर्गिक व्हेजिटेबल डाय व सिल्क, कॉटन न वापरता.. स्वस्त असलेले केमिकल, डाय, रेयॉनसारखी सिंथेटिक सामग्री वापरून ते विणले जाते. आपल्या पूर्वजांकडून ही कला शिकून घेत ती कलाकृती जोपासणारी ही जणू शेवटची पिढी. आज ते साठीत आहेत. त्यांना स्वत:ला या क्षेत्रात व्यावसायिक फायदा मिळत नसल्याने खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या मुलांनी वेगळ्या कामाचा अवलंब केला आहे.

हिमरू

हे टेक्स्टाइल मुख्यत: कॉटन आणि सिल्कपासून विणलेली कोयरीच्या डिझाइन्स (पेजले मोटीफ) असलेली ‘हिमरू शाल’ किंवा शेला म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. मुहम्मद तुघलकाचे जेव्हा दिल्लीहून दौलताबादला म्हणजेच आजच्या औरंगाबादेत प्रस्थान झाले तेव्हा त्याने या कापडाचे उत्पादनच पूर्णपणे औरंगाबादमध्ये सुरू केले. या फॅब्रिकचा उगम ‘हम-रुह’ या पर्शियन शब्दापासून झाला ज्याचा अर्थ आहे ‘सारखे’; कारण हे कापड चांदी आणि सोन्याच्या धाग्यांपासून विणलेल्या ‘कुम-ख्वाब’ नामक टेक्स्टाइलची जणू एक आवृत्ती आहे, जे त्या काळात फक्त शाही परिवारांनाच वापरण्यापुरतं मर्यादित होतं. काही वर्षांनंतर जसा इतर सिंथेटिक टेक्स्टाइलचा शोध लागत गेला तशी या फॅ ब्रिकची मागणी कमी होत गेली आणि जवळजवळ हिमरू नाहीसं व्हायला लागलं. मात्र १९८५ मध्ये दोन विणकारांना गाठून सुरय्या हसन यांनी एकटीने, स्वत:च्या जोरावर मश्रू, पैठणी, जामेवार, हिमरू यांसारख्या रिच टेक्सटाइलची नव्याने ओळख करून दिली. हेच कार्य पुढे नेता नेता हळूहळू अनेक महिला या विणकामात सहभागी व्हायला लागल्या ज्यामुळे या भागात रोजगारही वाढला.

खरड 

हे टेक्स्टाइल म्हणजे कच्छ भागात तिकडच्या पशुसंवर्धन व्यवसायातील लोकांनी किंवा भटक्या विमुक्त जातीजमातींच्या लोकांनी वर्षांनुवर्षे उंटाच्या, शेळीच्या, बकरीच्या लोकरीपासून विणलेली ही एक अनोखी कलाकुसार आहे. खरड विणताना वापरले जाणारे हातमागही त्या लोकांसारखेच भटके आहेत. यावर विणले जाणारे डिझाइन मोटीफ पण या लोकांच्या रोजच्या जीवनातील संपर्कात येणाऱ्या वस्तू किंवा पशू-पक्ष्यांपासून प्रेरित आहेत आणि रंगांसाठी नैसर्गिक डायचा वापर केला जातो. हे एक अत्यंत टिकाऊ आणि मजबूत कापड मानले जाते जे जवळजवळ शंभर वर्षे टिकते. खूप उबदार असल्यामुळे हे पूर्वी थंड वातावरणात वापरले जायचे. इतर टेक्स्टाइलसारखेच कालांतराने  ही कला जोपासणारी, विणणारी आता फक्त दोन कुटुंबे राहिली आहेत. खरद विणणाऱ्या कारागिरांची कमी नाही तर बाजारात या कापडाला क्वचित मागणी असल्यामुळे या जमातीमधील लोकांनी हळूहळू रोजगाराचे वेगळे पर्याय निवडले. तरी २००१च्या भूकंपानंतर ‘खमीर’ नामक संस्था या भागातील सर्व कारागिरांच्या कलेला बाजारात आणि इतर उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे.

हे मला आढळलेले स्वत:चे मूळ हरवून बसलेले आणि नकली आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध असलेले काही विशेष टेक्स्टाइल्स. पण या आधुनिक आणि टेक्नोसॅव्ही काळात एक चांगली बाजू हीपण आहे की काही निवडक डिझायनर्स, टेक्स्टाइल आणि हँडीक्राफ्ट क्षेत्रातील काही सहकारी संस्था ही कला आणि ती जोपासणाऱ्या कारागिरांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्याचा, ही कला त्यांच्यात आणि त्यांच्या येणाऱ्या पिढय़ांमध्ये जिवंत ठेवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे अभिजात कपडय़ांचे प्रकार दुर्मीळ होणार नाहीत आणि त्यांच्या नकली आवृत्त्याच पाहणं नशिबी येणार नाही अशी आशा अजूनही आहे.

viva@expressindia.com