आपल्याकडे हिंदी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी रीतसर र्मचडायजिंग सुरू आहे. मालिकांना अजूनही त्यांची लोकप्रियता उत्पादनांच्या माध्यमातून ‘कॅश’ करता येत नाहीये. पण सोशल मीडियाने या उद्योगात वेगाने मुसंडी मारली आहे. सोशल मीडियावर गाजणाऱ्या विविध कॉमिक स्ट्रिप्सचं र्मचडायजिंग तरुणाईला खुणावतंय. त्यातून ‘गार्बेज बिन’चे मग, ‘चलता है’ चे टीशर्ट्स हातोहात खपताहेत. ‘वेअर युअर ओपिनियन’, ‘बिअर बाबा’सारखे नव्याने आलेले ब्रँड या कॉमिक स्ट्रिप्सचा कुशलतेने वापर स्वत:च्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी करू लागले आहेत.

‘गार्बेज बिन’ हे नाव घेतल्यास तुमच्या डोळ्यासमोर अजूनही कचऱ्याचा डबा येत असेल, तर सोशल मीडियावर तुमचा वावर अजून तितकासा नाही, हेच म्हणावं लागेल. इलस्टट्रेटर, कॉमिक आर्टिस्ट म्हणून कामाच्या शोधात असलेल्या फैजल मोहम्मदने गुड्डू आणि शान या जोडगोळीला जन्म दिला. आज या दोन मुलांचे प्रताप तरुणाईमध्ये इतके प्रसिद्ध आहेत की, कॉमिक स्ट्रिप्सच्या पलीकडे यांच्या छबी असलेले मग, वह्य़ा, कोस्टर्स यासाठी एक मोठा ग्राहकवर्ग तयार झाला आहे. शाळेत जाणारे, इतरांच्या खोडय़ा काढण्यात तरबेज असलेले, सतत काहीतरी उचापती करून आईला त्रास देणारे, पण तिचे तितकेच लाडके असलेले गुड्डू आणि शान ही दोन पात्र फैजलला सापडली ती त्याच्या बालपणीच्या आठवणीत. त्यांच्या खोडय़ा, वर्गात काठावर पास होऊनसुद्धा असलेला तोरा, गाजर हलव्यावरचं प्रेम, मुलींवर लाईन मारण्यासाठी केलेली धडपड हे सगळं पाहणाऱ्याला ओळखीचं, जवळचं वाटतं.  ‘कॉमिक कॉन’सारख्या मोठय़ा प्रदर्शनात यांचा छोटा स्टॉल सगळ्यांचं लक्ष वेधतो. त्याच्या कटआउट्सजवळ उभं राहून बच्चेकंपनी, तरून मंडळी फोटो काढतात. त्यांचे प्रिंट्स असलेले मग्स, कोस्टर्स, टी-शर्ट्स, वह्य़ा, ब्रेसलेट्स, फ्रीज मॅग्नेट हातोहात विकले जातात.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

म्हणायला तर ही केवळ एक कॉमिक स्ट्रीप. रोजच्या गडबडीत पटकन फेसबुक वॉलवर दिसल्यास खुदकन हसू आणणारी, पेपरातील बातम्या वाचता वाचता त्यांच्यावर नजर गेल्यास प्रासंगिक विनोदानं मूड फ्रेश करणारी. आपल्याकडे फार पूर्वीपासून अशा कॉमिक्स स्ट्रीपमधली अशी पात्र प्रसिद्ध आहेत. आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन, मराठीतल्या बोलक्या रेषा, चिंटू अशी कित्येक कॉमिक्स प्रसिद्ध आहेत. पण पुस्तकांच्या पलीकडे या कॉमिक्सचा उत्पादनांमध्ये वापर फार अभावाने दिसून आला. पाश्चिमात्य जगातील स्पायडर मॅन, हीमॅन, पोकेमॉन हे मात्र वेगवेगळ्या वस्तूंवर कधीच येऊन बसले आहेत. आता यापासूनच धडा घेत सोशल मीडियावर गाजत असलेली कॉमिक स्ट्रिप्स पैसा कमावण्याचं उत्तम साधन बनू लागली आहेत. कारण या कार्टून स्ट्रिप्समधील पात्रांचं र्मचडायजिंग होतंय. त्यामुळे सहाजिकच एरवी पडद्याआड राहिलेल्या कॉमिक आर्टिस्टचा चाहता वर्ग आणखी वाढू लागलाय.

मगाशी उल्लेख केलेलं ‘गार्बेज बिन’चं आपल्या लाडक्या ‘चिंटू’शी जाणवलं असेलच. ‘चिंटू’चेही कॉमिक्स सध्या फेसबुकवर असतात. पण चिंटू कॉमिक पुस्तकांपर्यंत मर्यादित राहिला. कॉमिक्सचा प्रवास उत्पादनांपर्यंत घेऊन जाणारा फैजल हा एकटा कलाकार सोशल मीडियावर नाही. असे बरेच कॉमिक्स आणि त्यांची उत्पादनं यांची सध्या तरुणाईमध्ये बरीच क्रेझ आहे. ‘प्रोकॅस्टीनेशन’ हे फ्रीडो आणि पिड्जीन या दोघा उद्योगी मित्रांचं कॉमिक. महत्त्वाची काम टाळत, नको ते उद्योग करत स्वप्नरंजन करणं हे या कॉमिकमधील पात्रांचं काम. सोशल मीडियावर हे इतकं लोकप्रिय झालंय की, जगभरातून यांच्या टीशर्ट्स, पोस्टर्सना मागणी आहे. भारतातही यांचा आणि यांच्या उत्पादनांचा चाहता वर्ग आहे. मेंदू आणि मन याचं कधीच एका बाबतीत जुळत नाही, याचा अनुभव सगळ्यांनाच येतो. पुस्तकाच्या दुकानात मनाला नव्या पुस्तकांचा सुवास खुणावतो, मागचा-पुढचा विचार न करता पुस्तकं खरेदी करायला मन धावतं, पण तेव्हाच मेंदूला मात्र घरात न वाचलेल्या पुस्तकांचा ढीग आठवतो आणि तो या खरेदीला विरोध करतो. ही तळ्यात मळ्यातली परिस्थिती आपण कित्येकदा अनुभवतो. मग काही भांडणात पोट, यकृत अशा वेगवेगळ्या अवयवांचाही समावेश होतो. हेच द्वंद्व कॉमिकच्या स्वरूपात ‘द ऑकवर्ड येदी’ नावाने सोशल मीडियावर येतं. यांच्याही वेबसाईटवर उत्पादनांची सुरुवात पुस्तकांपासून सुरू झाली होती. आता कॅलेंडर, सॉफ्ट टॉय, टी-शर्ट्स, की-चेनपर्यंत जाऊन पोहचते. ‘ग्रीन हुमर’ ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजणारी कॉमिक आहे. बंगलोरचा रोहन निसर्गाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी पक्षी, प्राण्यांना बोलतं करत या कॉमिकच्या माध्यमातून गंभीर प्रश्नांकडे विनोदी ढंगानं लक्ष वेधतो. हे कॉमिक स्ट्रिप प्रिंट केलेले मग्स, वह्य़ा यांवरही दिसायला लागलंय आणि त्यांच्या वेबसाइटवरच ही प्रॉडक्ट्स विकायला आहेत.

‘इस्ट इंडिया कॉमेडी’, ‘एआयबी’, ‘केनी सबॅस्टीयन’, ‘एसएनजी कॉमेडी’, ‘निशांत तंवर’, ‘प्रीटेंडीअस मूव्ही रिव्हू’, ‘चलता है’, ‘झाकीर खान’ हे यूटय़ूबवरील प्रसिद्ध विनोदवीर आणि त्यांच्या चॅनल्सची लोकप्रियता सर्वश्रुत आहेच. त्यांचा बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांच्या तोडीचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. सध्याच्या घडीला त्यांचे प्रत्येक स्टेज शो हाऊसफुल तर असतातच, पण या शोच्या दरम्यान विकायला ठेवलेल्या त्यांच्या टी-शर्ट्सनाही तितकीच मागणी असते. त्यांच्या विनोदातील गाजलेले कोट्स, व्यक्तिरेखा, शब्द हे या टीशर्ट्सवर प्रिंट केलेले असतात. हे टी-शर्ट्स मिरविणे सध्या स्टाइल सिम्बॉल झाला आहे.

एखाद्या कंपनीला त्यांच्या मागणीनुसार कार्ड, लोगो डिझाइन करून देणं हे इलस्ट्रेटरचं काम. या कामाला छंद बनवत अलीसिया सौझाने स्वत:ची काही इलस्ट्रेशन्स फेसबुकवर टाकायला सुरुवात केली. कार्टून्सची ही बोलकी इलस्ट्रेशन्स तरुणाईमध्ये इतकी लोकप्रिय झाली, की आज यांचे प्रिंट्स असलेले फ्रीज मॅग्नेट, टीशर्ट्स, स्टँप, फ्रेम्स, कुशन कव्हर, लॅपटॉप कव्हर, चप्पल, बॅग, वह्य़ा आणि अजून कित्येक उत्पादनं तिच्या वेबसाइटवर विकायला ठेवलेली आहेत. मुळात हे कलाकार त्यांच्या कामासाठी सोशल मीडियावर आधीपासून प्रसिद्ध होते. पण या प्रसिद्धीचा कुशलतेने वापर करून अर्थाजन करण्याची संधी या उत्पादनांच्या माध्यमातून त्यांना मिळू लागली आहे. कित्येकदा त्यांचा एखादा चाहता त्यांच्यावरील प्रेमापोटी हे उत्पादन खरेदी करतो किंवा कधीतरी एखाद्या प्रदर्शनात याचं उत्पादन आवडलं म्हणून आवर्जून यांचं पेज सोशल मीडियावर शोधणारेही आहेत. यातून नवे चाहते जोडले जातात. ‘वेअर युअर ओपिनियन’, ‘बिअर बाबा’सारखे नव्याने आलेले ब्रँड या कॉमिक स्ट्रिप्सचा कुशलतेने वापर स्वत:च्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी करू लागले आहेत.  असे प्रिंट्स असलेले टी-शर्ट ५०० रुपयांपुढे देऊन खरेदी करताना, आवडतं हटके कॅरॅक्टर असलेली वही २०० रुपये देऊन खरेदी करताना चाहते मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे आता विनोद हा केवळ हसविण्याचं निमित्त न राहता कमाविण्याचं आणि मिरवण्याचं उत्तम माध्यम बनू लागलं आहे.

मृणाल भगत

viva@expressindia.com