18 January 2019

News Flash

फॅशनची ‘लगीन’घाई

लग्नसोहळ्यातील फॅशन, स्टायलिंग, मेकअपचे ट्रेण्ड्सही कमालीचे बदलले आहेत.

लग्न सोहळा हा कोणाच्याही आयुष्यातील सगळ्यात मोठा इव्हेंट असतो. बाकी कोणत्याही इव्हेंटला आपण जेवढे विचारपूर्वक तयार होतो त्याच्या किती तरी जास्त पटीने आपण स्वत:च्या किंवा अगदी घरच्या लग्न सोहळ्यांसाठी जास्त छान तयारी करतो. आजकाल लग्न सोहळ्यांचेसुद्धा ट्रेण्ड आले आहेत. अनेक प्रकार आले आहेत. पारंपरिक प्रथांना सोबत घेऊन त्याला नवीन स्टाइलने सादर करायची रीतच आजच्या पिढीमध्ये आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यातील फॅशन, स्टायलिंग, मेकअपचे ट्रेण्ड्सही कमालीचे बदलले आहेत.

‘व्हिवा’ने यंदाच्या लग्न सोहळ्यातील फॅशन ट्रेंड्सविषयी जाणून घेण्यासाठी फॅशन डिझायनर अदिती होलानी यांना बोलतं केलं. सध्या ट्रेण्डमध्ये असलेल्या डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना लक्षात घेता ‘डेस्टिनेशन वेडिंग हा अगदी गेल्या वर्षीपासून लोकप्रिय झालेली नवीन ट्रेण्ड आहे. असा लग्नसोहळा काही सोपा नसतो, त्यासाठी अनेक गोष्टी लागतात. घरापासून किंवा आपल्या परिसरापासून लांब जाऊन लग्न करताना यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला प्रवासात घेऊनच जाव्या लागतात. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे लग्नाचे कपडे. डेस्टिनेशन वेडिंगसाठीचा प्रवास लक्षात घेता हलके वजन असणारे कपडे आणि दागिने सध्या ट्रेण्डमध्ये आहेत,’ असं अदिती यांनी सांगितलं. हलके, छान फ्लो असणारे गाऊन, लेहेंगा, धोती पॅण्ट, कुर्तीसाठी यंदा जास्त मागणी आहे. तर दागिन्यांमध्ये वजनाने हलके पण हाय फॅशन स्टेटमेंट असणारे दागिने उदाहरणार्थ मोठा जड दिसणारा पण वजनाने हलका असणारा नेकलेस, बिंदी आणि हेड गेअर लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

फॅशन ट्रेण्ड्सचं वर्तुळ हे असंही परत फिरून जुन्या फॅशनवरतीच येऊन थांबतं. नव्याने येणाऱ्या फॅशनमध्ये जुन्या फॅशन ट्रेण्ड्सचा टच असतोच. याबद्दल अदिती सांगतात, ‘ज्या वधूला किंवा बाकीच्यांना लग्नसोहळाच्या वेळी जुने, जड लेहेंगे वापरायचे असतात आणि नवीन लुकसुद्धा हवा असतो ते लेहेंगा विथ शर्ट’ हे कॉम्बिनेशन नक्कीच वापरून पाहू शकतात. लेहेंगा आणि टँक टॉप आणि त्यावरती ओढणीचं कन्वर्जन असलेले केप हे सुंदर कॉम्बिनेशन तुम्ही कोणत्याही सोहळ्यासाठी वापरू शकता. पारंपरिक ब्लाउज आणि साडीवर लाँग नेट जॅकेट तुम्हाला नक्कीच इंडोवेस्टर्न लुक देऊ  शकेल आणि हा लुक सध्या लग्नसोहळ्यांमधून खूपच ट्रेण्डी आहे.’

कपडय़ांचा ट्रेण्ड जसा असेल तसा आपला लुक बदलतो. हा लुक पूर्ण करण्यासाठी ज्वेलरी, मेकअप, आणि स्टायलिंगही खूप महत्त्वाचं असतं. आणि हेच महत्त्व ओळखून याविषयीची माहिती देताना सेलेब्रिटी स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट नेहा अद्विक महाजन यांनी अजूनही याबाबतीत विरानुष्काचा प्रभाव लोकांवर असल्याचं सांगतात. विराट आणि अनुष्काच्या लग्नातील कपडे, मेकअप याचं उदाहरण देत नेहा सांगतात, ‘आजच्या काळातील वधूला बदल हवा आहे. लग्नातील कपडय़ांसाठीचा मेकअप, ज्वेलरीसाठी पेस्टल कलरचा विचारही अनेक वर्ष कोणी केला नव्हता, परंतु आता तुम्हाला कुठेही टिपिकल लाल रंग, गडद रंगाचा मेकअप, कपडे दिसणार नाहीत. कारण यंदा पेस्टल रंगाचा ट्रेण्ड आहे. काही वर्षांपूर्वी लोक याबाबतीत अजिबातच प्रयोग करायला तयार नव्हते, पण आताच्या नवीन विचारांमुळे ट्रेण्ड्समध्ये खूप बदल झाला आहे आणि त्यामुळे आमचंही काम कुठे तरी सोपं झालं आहे.’ आपल्या स्किन टोनला शोभेल असाच मेकअप करण्याकडे वधूचा कल आहे. आय मेकअप हाही खूप महत्त्वाचा भाग आहे. नवरी असेल तर तिला किंवा लग्नासाठी जायचं असेल तर सर्रास शिमारी, चमचमणाऱ्या आय शॉडोचा वापर करतात. पण आता त्याची जागा बऱ्यापैकी स्मोकी आय मेकअपने घेतली आहे. ज्वेलरीमध्येही मोठी पण साधी आणि रॉयल लुक असणारी ज्वेलरी ट्रेण्डमध्ये आहे. आणि त्यांच्या  रंगांमध्येही पेस्टल शेडच ट्रेण्डिंग आहेत. एकंदरीतच यंदा लग्नसोहळ्यांमधून पारंपरिक फॅशनला फाटा मिळाला असून ऑफ बीट फॅशनचीच जास्त चलती आहे.

viva@expressindia.com

First Published on January 12, 2018 12:37 am

Web Title: wedding fashion fashion trend destination wedding wedding fashion trends