वेदवती चिपळूणकर 

खाणाऱ्या माणसांना म्हणजे खवय्यांना, खाण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही किंवा निमित्त गरजेचं नसतं. खाण्यासाठी खाणं एवढाच त्यांचा उद्देश असतो आणि एवढाच त्यांचा आनंद असतो. हौसेने खातात ते खरे खवय्ये ! त्यांना डाएट किंवा कमी खाणं वगैरे झेपत नाही, पेलत तर नाहीच नाही. डाएट वगैरे करतानाही ते अनेकदा ‘चीट’ करायचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वीही होतात. खाण्यासाठी काय पण हे त्यांना बरोब्बर जमतं! डाएट करताना किंवा ‘आज कमी खाऊ या’ असं ठरवलेलं असतानाच नेमकं असं काहीतरी त्यांच्या पुढय़ात येतं की ते ‘नाही’ म्हणू शकत नाहीत. या खवय्यांसमोर अचानक येणाऱ्या खाद्यसंकटातूनच जणू या शब्दाचा जन्म झाला असावा.

जेव्हा हे खवय्ये लोक किंवा इतर कोणी अख्खा पिझ्झा किंवा चिप्सचा अख्खा पुडा किंवा अख्खं चॉकलेट किंवा चॉकलेटचा एक संपूर्ण बॉक्स एकटेच संपवतात आणि ‘चुकून संपवला, कळलंच नाही किती खाल्लं ते..’, असं म्हणतात, अगदी त्या प्रसंगालाच ‘न्सॅक्सिडंट’ म्हणतात. समोर येणाऱ्या खाण्याच्या टेंप्टेशनला ‘नाही’ न म्हणू शकणारी एक जमात असते. स्नॅक्सना पाहून मनावरचा ताबा सुटतो आणि माणूस त्यांना जाऊ न धडकतो. या धडकीत तो घायाळ होतो आणि मग भानावर येतो. भानावर आल्यावर माणसाला कळतं की आपला संयम सुटला होता आणि आपल्या सगळ्या निश्चयांवर आपण स्वत:च पाणी फिरवलं आहे. हे सगळं वर्णन ‘न्सॅक्सिडंट’ला अगदी चपखल बसतं.

स्नॅक्स आणि अ‍ॅक्सिडेंट यांच्या मोडतोडीतून ‘न्सॅक्सिडंट’ हा शब्द बनला आहे. हा शब्द ‘नाऊ न’ म्हणून शब्दकोशात समाविष्ट आहे. या पद्धतीचे शब्द तयार करायची आताच्या तरुणाईला हौसच आहे. उदा. ‘पिक्शनरी’ हा त्याच धाटणीचा एक शब्द! खाण्यात खंड पडू नये म्हणून दिलेलं हे एक कारण, केवळ एक बहाणा! शनिवारी ‘चॉकलेट डे’ साजरा केला जाणार आहे. या चॉकलेटसाठी थोडे-फार न्सॅक्सिडंट आपल्या डाएट-प्लॅनवरचा कंट्रोल सुटून घडवून आणले तर डाएट करणाऱ्यांचा चॉकलेट डे साजरा होईल ! हॅपी चॉकलेट डे इन अ‍ॅडव्हान्स..

viva@expressindia.com