मंडे ब्लूज या हॅशटॅगखाली दर सोमवारी किंबहुना रविवार संध्याकाळपासूनच विविध प्रकारचा मजकूर, फोटो, चित्र असं काही-बाही सोशल मीडियावर पडत असतं. मंडे ब्लूज या नावावरूनच लक्षात आलं असेल की आपण शनिवार-रविवार सुट्टीच्या, लेट नाइट पार्टीज किंवा मग वीकएण्ड पिकनिकचा आनंद लुटल्यानंतर येणाऱ्या आणि रटाळ वाटणाऱ्या कामाच्या आठवडय़ाला सुरुवात करणाऱ्या सोमवारबद्दल बोलत असतो. सुट्टीच्या आरामानंतर पुन्हा कामावर किंवा शाळा, कॉलेजला जाणं नकोस वाटणं स्वाभाविक आहे. पुन्हा आठवडय़ाची सुरुवात नेहमीच्या त्याच कामाने होते त्या वेळी वाटणारी एक असाहाय्यता, वैताग, कंटाळलेपण म्हणजे मंडे ब्लूज! सोमवार तसा आठवडय़ातला कामाचा पहिला दिवस असल्याने बऱ्याच जणांना मीटिंग्ज, प्रेझेंटेशन, टार्गेट याबद्दल टेन्शन येतं. त्यावर परत आठवडय़ाचं सगळं प्लॅनिंग ठरत असतं. पण परत आठवडा कधी संपतोय याची वाट पाहण्याशिवाय काही हातात नसतं.

या ‘मंडे ब्लूज’चा समाचार दर सोमवारी ट्विटरवरून, फेसबुक, इन्स्टाग्राम वरून हल्ली घेताना दिसतात. त्यासाठी वेगवेगळे स्टेटस, फोटोज शेअर केले जातात. यात खास करून रडक्या चेहऱ्यांचा वापर केलेला असतो आणि तो फोटो जणू आपली भावनाच प्रकट करतोय या अनुषंगाने पोस्ट, रिपोस्ट, शेअर केला जातो. एवढं करून काम टाळता येत नाही हेपण तितकंच खरं! पण तेवढंच दु:ख हलकं झाल्याची भावना त्यामागे कदाचित असेल. दर सोमवारी हा मंडे ब्लूजचा ट्रेण्ड असतो.

तसा हा नकोसा वाटणारा सोमवार हवाहवासा कसा वाटेल? त्याला काही तरी मोटिव्हेशन सापडलं की. मग या मोटिव्हेशन्सची लिस्ट, टिप्स, मंडे मूड चांगला करण्याच्या निरनिराळ्या युक्त्या हेदेखील दर सोमवारी सोशल मीडियावर पडतं. मंडे ब्लूजमधून बाहेर येण्यासाठीच्या मोटिव्हेशन्समध्ये कुणी जिमिंगचं नाव घेतं, तर कोणासाठी डान्स क्लास मोटिव्हेटिंग वाटतं. इतकच काय तर स्वादिष्ट नाश्ता आणि वाफाळणारा चहा हेसुद्धा मग मोटिव्हेशनमध्ये समाविष्ट होत असल्याचं दिसून येतं. मग त्याचेही मग फोटो, व्हिडीयो शेअर केले जातात.
कामाच्या ठिकाणचं वातावरण हा मंडे ब्लूज हटवण्याचा किंवा मंडे मोटिव्हेशनचा महत्त्वाचा भाग असतो. म्हणून काही कंपन्यांमध्ये हे मंडे मोटिव्हेशनसाठी खास प्रयत्न केले जातात. कर्मचाऱ्यांना उत्साह वाटेल अशा टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटीज, मोटिव्हेशनल स्पीच असे कार्यक्रम मुद्दाम सोमवारी आखले जातात. अनेक ठिकाणी वर्क मोटिव्हेटर म्हणून अशा भाषणांचे व्हिडीओ, कामाशी निगडित टिप्स दिल्या जातात. टोनी रॉबिन्स या अमेरिकन लेखकाची मोटिव्हेशनल स्पीचेस, लेख अनेक सोमवारी कर्मचाऱ्यांच्या ई-मेल इनबॉक्समध्ये आल्याच दिसतं. संतोष वैद्य म्हणाला, ‘आमच्या ऑफिसमध्ये मंडे मार्वेल्स नावाचा एक पझल गेम ठेवतात. त्याचे जे कोणी पहिले बरोबर उत्तर देतात त्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट्स दिले जातात.’ मंडे मोटिव्हेशनसाठी काही ऑफिसेसमध्ये शनिवारीच तयारी केली जाते. त्यासाठी मग म्युझिक थेरपी, मेडिटेशन यांचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी एम्प्लॉयी एंगेजमेंट अॅक्टिव्हिटीदेखील घेतल्या जातात. ‘लाइफस्टाइल’ची सीनिअर एक्झिक्युटिव्ह माधुरी नारिंग्रेकर तेलकर म्हणाली, ‘आमच्या ऑफिसमध्ये शनिवारी गेम ट्रेनिंग, टीम बिल्डिंग तसेच काही स्पर्धा होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रिफ्रेशिंग वाटतं. त्यामुळे आपोआपच मंडे मोटिव्हेशन मिळतं.’

कामाची जागा, तिथलं वातावरण जर खेळीमेळीचं असेल आणि मुख्य म्हणजे काम आवडीचं असेल तर मंडे ब्लूज जाणवणार नाहीत आणि तिथे जाण्याबाबत उत्साह, ओढ निर्माण झाली तर मंडे ब्लूजला सामोरं जावंच लागणार नाही, असंच या सगळ्यातून स्पष्ट होतं.

– कोमल आचरेकर