19 April 2019

News Flash

बीइंग प्लस साइज..

बाकीच्या मॉडेलप्रमाणे प्लस साइज मॉडेलचंही शरीर नीट आणि शेपमध्ये असणं गरजेचं आहे.

लॅक्मे फॅशन वीक

तेजश्री गायकवाड

फॅशन विश्वातील सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे ‘लॅक्मे फॅशन वीक’. ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या विंटर फेस्टीव्ह सीझनला याच आठवडय़ापासून सुरुवात झाली आहे. दर वर्षी वर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन सोहळ्यात फॅशन जगतातील अनेक गोष्टी बघायला मिळतात, अनेक ट्रेंड सेट होतात, फॅशन इंडस्ट्रीला नवीन डिझायनर मिळतात. या सगळ्याबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून ‘लॅक्मे फॅ शन वीक’मध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या अनेक  गोष्टींचे ट्रेंड बदलण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रत्येक सीझनमध्ये काही तरी वेगळे करत आपला ठसा फक्त फॅशन इंडस्ट्रीवरच न उठवता सर्वसामान्य माणसाच्या विचारावरही प्रभाव पाडणाऱ्या लॅक्मेने गेल्या दोन वर्षांपासून प्लस साइज मॉडेल ही संकल्पनाही रॅम्पवर लोकप्रिय केली आहे..

भारतीय शरीरयष्टी, वर्णाबद्दल अनेकदा बोललं जातं. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा शारीरिक बांधा असलेले लोक आहेत. काही देशांच्या तुलनेत आपल्याकडे अंगाने थोडे जास्त जाड असणारे लोक आहेत. त्यामुळे अनेकदा अशा जाड लोकांची फॅशन आणि त्यांचा बांधा याबद्दल खूप चर्चा होते. प्लस साइज फॅ शन हा आवडीचा कमी, न्यूनगंडातून चर्चिला जाणारा विषय जास्त आहे.त्यांना अनेकदा कपडे घेताना स्वत:च्या शरीराची लाज वाटते. दोन वर्षांपूर्वी लॅक्मेने प्लस साइज मॉडेल ही संकल्पना आणली आणि अनेकांच्या मनात स्वत:बद्दलचं मत बदलू लागलं. २०१६ पासून दर वर्षी लॅक्मे फॅशन वीकसाठी प्लस साइज मॉडेल्सच्या ऑडिशन होतात. भारतातल्या अनेक छोटय़ा मोठय़ा भागातून ऑडिशनसाठी मुलंमुली येतात. त्यांना शोच्या दरम्यान बाकीच्या मॉडेलसारखंच डिझायनरचं कलेक्शन घालून ते रॅम्पवरती सादर करण्याची संधी मिळते. अशाच यंदाच्या ऑडिशनमध्ये जिंकलेला मुंबईचा २५ वर्षीय तरुण शंतनू पाठक याने ‘व्हिवा’कडे त्याचा बीइंग प्लस साइज मॉडेलचा प्रवास आणि अनुभव शेअर केला. ‘मी एक संगीतकार आहे. अगदी कधी मुलींशीही न बोलणारा मी थेट ‘लॅक्मे फॅशन वीक’सारख्या मोठय़ा शोच्या मॉडेलिंगच्या ऑडिशनमध्ये पहिला आलो यावर विश्वासच बसत नाही. मला या ऑडिशनबद्दल माहिती मिळाली आणि सहज म्हणून मी ऑडिशन द्यायला आलो आणि सिलेक्ट झालो. ऑडिशनला गेल्यावर आपल्यासारख्या अनेकांना बघूनच माझा आत्मविश्वास वाढला, असं शंतनू म्हणतो. प्लस साइज मॉडेल म्हणजे कसाही शेप असलेला किंवा दिसणारा मॉडेल नव्हे. बाकीच्या मॉडेलप्रमाणे प्लस साइज मॉडेलचंही शरीर नीट आणि शेपमध्ये असणं गरजेचं आहे. फक्त त्याचं वजन जास्त असतं एवढंच.. असं सांगणाऱ्या शंतनूने लॅक्मे फॅशन वीकच्या या मंचाकडे आपण खूप सकारात्मकतेने बघत असल्याचंही सांगितलं. एवढंच नाही तर फॅशन इंडस्ट्रीचा करिअर म्हणून त्याने विचार केला नव्हता पण आता तो त्या दृष्टीने विचार करतो आहे.

‘प्लस साइज मॉडेल’ या संकल्पनेने अनेकांना आत्मविश्वास दिला आहे. कधीकाळी स्वत:चं बेढब शरीर नको असं वाटणारे आज त्याच शरीरावर प्रेम करू लागले आहेत. अशीच या वर्षी आणि गेल्या वर्षीही निवड झालेली दिल्लीची  प्लस साइज मॉडेल मोनिका राठोड तिच्या प्रवासाबद्दल सांगते, ‘लॅक्मे फॅशन वीक’मधील हे माझं दुसरं वर्ष आहे. बीइंग प्लस साइज मॉडेल ही बेस्ट फिलिंग आहे. मी मागच्या वर्षीच्या ऑडिशनची विजेती होते आणि यंदाच्या ऑडिशनमध्येही माझी निवड झाली. मोनिका एका नामांकित कंपनीमध्ये बिझनेस मॅनेजर आहे. गेल्या वर्षी मला सोशल मीडियामुळे या ऑडिशनबद्दल समजलं. बाहेरच्या देशात असलेली ही कॉन्सेप्ट आपल्याही देशात आली हे बघून खूप आनंद झाला. रॅम्पवरती चालल्यानंतर हो आपणही मॉडेल आहोत, आपणही जाड असलो तरी छान दिसू शकतो, चांगले डिझायनर कपडे घालू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. शोनंतर अनेक लोक आपल्याला ओळखू लागले. त्यामुळे फक्त फॅ शन इंडस्ट्रीपुरतं नाही तर दैनंदिन जीवनात वावरतानाही आपल्या व्यक्तिमत्त्वात कमालीचा बदल झाल्याचे मोनिका सांगते.

प्लस साइज मॉडेल या संकल्पनेसोबत प्लस साइज कपडेही बाजारात येऊ  लागले. सध्या काही ब्रॅण्ड्स फक्त प्लस साइज लोकांसाठीच कपडे बनवतात. असेच फक्त प्लस साइज लोकांसाठी कपडे डिझाइन करण्याचे स्वप्न बघणारी अवघ्या २१ वर्षांची रचना मिस्त्री सांगते, माझं नुकतंच फॅशन डिझायनिंगमधून पदवी शिक्षण पूर्ण झालं. मी लहानपणापासूनच जाड आहे. त्यामुळे अनेक लोक तू खूप क्यूट दिसतेस, तर अनेक लोक तू वजन कमी करायला हवं, असं सांगतात. मी तीन वर्ष डाएट, जिम असं सगळं केलं पण जास्त फरक पडला नाही. आणि मी ती गोष्ट मनापासून करत नव्हते. पदवीच्या शेवटच्या वर्षांला आपण डिझाइन केलेले कपडे स्वत: घालून रॅम्पवरती चालायचं असतं. पण तेव्हाही मला अनेकांना तुला जमेल का? तू छान दिसशील का?, असे अनेक प्रश्न विचारले. पण मला मी डिझाइन केलेला ड्रेस घालून रॅम्पवरती सादर करायचाच होता. आमचा शो कोरिओग्राफ करायला आलेली एक प्लस साइज मॉडेल होती. तिच्यामुळे मी खूप प्रभावित झाले, मी तिच्या प्रत्येक सोशल मीडिया अकाऊंटवर जाऊन फॉलो केलं. तिच्यामुळे माझ्यात बदल झाला आणि त्याचवेळी लॅक्मेच्या ऑडिशन आल्या. मी फक्त एक प्रयत्न करायचा म्हणून तिथे गेले. तिथे जवळ जवळ तीनशेच्या आसपास सुंदर प्लस साइज लोक होते. पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाल्यावर मला आणखीनच हुरूप आला. आणि दुसऱ्याही राऊंडला सिलेक्ट झाले. या नंतरही मला अजून दोन मोठय़ा ब्रॅण्डकडून फोटोशूटसाठी विचारणा झाली, पण यापुढे मी फक्त मॉडेल म्हणून माझं करिअर करू इच्छित नाही. मी फॅशन डिझायनर आणि मॉडेल असं दुहेरी करिअर करू इच्छिते. माझ्या शिक्षणाचा वापर करून मला फक्त आणि फक्त प्लस साइज मॉडेलसाठी कपडे बनवायचे आहेत, असा निर्धारही रचनाने व्यक्त केला.

फॅ शन म्हणजे सडपातळ.. दिसणं-असणं अशा चौकटीतले विचार कधीच मागे पडले आहेत. दर वर्षी फॅ शनच्या या मांदियाळीत नवीनच संकल्पना रॅम्पवर उतरते. तिथून ती मार्केटमध्येही अवतरते. त्यामुळे एकाचवेळी सामाजिक आणि आर्थिक बदल सहज घडतात. प्लस साइज मॉडेल्स आणि कपडे यांचा फॅ शनविश्वातील वावर हा अशाच बदलांपैकी एक आहे. यंदा या फॅ शनपंढरीतून अजून नवं काय उमटेल, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.

viva@expressindia.com

First Published on August 24, 2018 1:05 am

Web Title: winter festival season in lakme fashion week