आपल्याकडच्या प्रत्येक ऋतूत खाण्या-पिण्याची खासियत असतेच. त्यातला हिवाळी म्हणजे तर सगळ्यात हेल्दी महिना. हिवाळा म्हणजे भूक आणि भूक म्हणजे स्वादिष्ट पदार्थ असं समीकरण असतं. एरवी आपल्या गरम देशात गरमागरम पदार्थाचीच रेलचेल असली, तरी हे पदार्थ हिवाळ्यात खाण्याची मजा काही औरच. खवय्यांसाठी हिवाळा म्हणजे त्यांच्या खाण्याच्या आवडीला अबाधित ठेवण्याची घोषणाच जणू. मग रात्री रस्त्यावर उभे राहून खायची गरमागरम पावभाजी असो, चायनीज सूप असो वा समुद्रकिनारी बसून मित्रांसोबतची एक ‘कटिंग चाय’ असो, उत्तमोत्तम हॉटेलमधले देशी-विदेशी पदार्थ असोत किंवा मग घरात आईच्या हातचं गरमागरम फोडणीचं वरण, भात आणि त्यावर तुपाची धार असो.. या भूक लागणाऱ्या ऋतूत खवय्यांची चंगळच असते.

कॉफी आणि चहा प्रिय असणाऱ्या लोकांसाठी तर हिवाळा म्हणजे एक पर्वणीच; पण बदलत्या काळानुसार या खाण्यापिण्याच्या सवयीत किंवा खाद्यसंस्कृतीत म्हणू या हवं तर.. काही मोठे बदल होत आहेत. निव्वळ चहा आणि कॉफीचा गरम घोट घेण्यापेक्षा युवा पिढी त्यातही व्हरायटी ऑप्शन शोधू लागली आहे. वेगवेगळे मसाले घालून नि तितकीच कॉम्बिनेशन करून ही गरम पेये घेतली जातात आणि आपला हिवाळा उबदार बनवतात. हळद, आलं, सुंठ, ओवा यांचा काढा थंडीत सर्दी-पडशापासून दूर राहण्यासाठी पिणे हे तर आजीबाईंच्या बटव्यातील औषध, पण सध्या हा काढा किंवा हळद घातलेलं दूध हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ट्रेण्डी फूड झालं आहे. काही विदेशी खाद्यपदार्थही आता आपल्याकडे चांगले रुळले आहेत. त्यातला वॉफल्स हा पदार्थ तर गुलाबी थंडीत चवीनं खायचा पदार्थ.

तब्येतीची विशेष काळजी घेणाऱ्यांसाठीदेखील हिवाळा ट्रीट घेऊन येतो. म्हणजे कडधान्य आणि डाळींचे पदार्थ आपण अन्य ऋतूत तितकेसे खाणं उचित समजत नाहीत. तळलेल्या पदार्थाबाबतीतही हेच लॉजिक आहे; पण हे पदार्थ हिवाळ्यात सहज पचतात. म्हणजे असे पदार्थ चालू शकतील असा हा एकच ऋतू. शिवाय व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारी फळं आणि पदार्थ तर हिवाळ्यात भरपूर येतातच. त्यामुळे आवळ्याचं किंवा पेरूचं लोणचं, अननसाचा जॅम घरात बनायला सुरुवात होते, याच ऋतूत. या चटकमटक पदार्थासोबतच सूपदेखील जास्त प्रमाणात प्यायलं जातं. एरवी व्हेज क्लिअर सूपसाठी दर्शवली जाणारी नापसंतीदेखील पसंतीमध्ये बदलते. अशाच अनेक प्रकारच्या सूपच्या प्रकारांनाही पसंती दर्शवली जाते.

कितीही गरम झालं तरी गरम चहा चवीने पिणारे चहाप्रेमी आहेत, तशी कुडकुडत्या थंडीत थंडगार आइस्क्रीम खाणारे खवय्येही आहेतच. थंडीत आइस्क्रीम खाण्याची हौस असलेले खवय्ये कमी नाहीत. वेगवेगळे प्रयोग करीत हे आइस्क्रीम चाखलं जातं. आइस्क्रीमवर हॉट चॉकलेट किंवा विविध चवींचे सॉस टाकून त्यांची मजा लुटली जाते.

मुळात हिवाळा हा शरीराला गरम ठेवणारे पदार्थ खावेत असं सांगतोच, पण सोबत जिभेचे नि पोटाचे चोचलेही वाढवून जातो. म्हणूनच तर एरवी पावसाळ्यात किंवा चटपटीत चाटपासून गरमागरम जिलबीपर्यंत सगळं स्ट्रीटफूड हिवाळ्यात अधिक रुचकर लागतं. एकंदरीत काय, पेटपूजा करायला लाजू नका, कारण हिवाळा आपले खायचे-प्यायचे लाड पुरवायला आलाय. हॅप्पी िवटर 🙂

गरमागर्रम चहाकॉफी

तुम्ही कधी चहा-कॉफी नावाच्या एका पेयाबद्दल ऐकलंय. या हिवाळ्यात काही तरी नवीन पेय अनुभवायचं असेल तर नक्की पिऊन पहा ही मारामारी. कॉफीमध्ये चहाचा ट्विस्ट असणारं हे पेय नावाइतकंच आगळंवेगळं आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये काही स्टॉल्सवर हे भन्नाट पेय मिळतं.

वॉफल्स

वॉफल्स हे या हिवाळ्याचं आवडीचं डेझर्ट झालंय. आपल्या देशात अलीकडच्या काळातच हा पदार्थ सार्वत्रिक झाला. अजूनही मोठय़ा शहरांच्या ठरावीक हॉटेल्समध्ये आणि बडय़ा मॉल्समध्ये वॉफल्स मिळतात. आपल्यासमोर बेक केलेले चौकोनी वॉफल्स वरून चॉकलेट, क्रीम, आइस्क्रीम अशा हव्या त्या टॉपिंगसह सव्‍‌र्ह केली जातात. बेल्जियन वॉफल्स जगभर प्रसिद्ध आहेत. तऱ्हेतऱ्हेच्या टॉपिंग्जऐवजी गरमगरम प्लेन वॉफल आणि वरून हॉट चॉकलेट सॉसची धार हा क्लासिक डेझर्टचा पर्याय चाखायलाच हवा.

गोल्डन कॅफे/टर्मेरिक लाते

अमेरिकेतलं सध्या सगळ्यात ट्रेण्डी बेव्हरीज कोणतं माहिती आहे? टर्मेरिक लाते. ही गोल्डन कॅफे म्हणूनदेखील प्रचंड लोकप्रिय आहे. हे पेय म्हणजे दुसरंतिसरं काही नसून आपलं हळदीचं दूध आहे; पण त्या जोडीला फ्लेवरिंग म्हणून हळदीसोबत मध, दालचिनी, ज्येष्ठमधासारखे जिन्नस त्यात टाकून तिला गुणकारीही बनवलं जातं. या टर्मरिक लातेची क्रेझ पाश्चिमात्य देशांत दिवसेंदिवस वाढतेच आहे. इन्स्टाग्रामवर या यलो कॉफीचे फोटो पोस्ट करण्याची लाट गेल्या ८-९ महिन्यांपासून आली आहे. या टर्मेरिक लातेची ‘रेसिपी’ कॉफी शॉपनुसार बदलली जाते. खजूर, बदामाचं दूध, आलं, तर कधी चिमूटभर मीठ घालून या लातेची लज्जत वाढवली जाते. हळदीची मक्तेदारी असणाऱ्या भारतात मात्र या पेयाला बाजारी महत्त्व आलेलं नसलं तरी घराघरांतली दूध-हळदीची लोकप्रियता मात्र वादातीत आहे.