News Flash

नावात काय आहे?

लग्नानंतर नाव बदलायचा किंवा न बदलायचा निर्णय आजच्या मुलीसाठी सोपा नक्कीच नसतो

लग्नानंतर मुलीचं नाव-आडनाव बदलण्याच्या पद्धतीबद्दल आजच्या पिढीला काय वाटतं, हे जाणून घ्यायचा प्रयत्न.

लग्न म्हणजे केवळ दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मीलन, असं म्हणायची पद्धत आहे. लग्न झालं की, एका घरची मुलगी दुसऱ्या घरची सून होते, असं आपण म्हणतो. या नवीन आयुष्यात सगळ्या गोष्टी तशा नवीन असतात. या नवीन बदलांसोबत अजून एक बदलली जाणारी गोष्ट म्हणजे तिचं नाव. एका घरातून दुसऱ्या घरची होताना तिचं बदललेलं नाव म्हणजे एक प्रकारचं प्रतीक मानलं जातं. जुन्या चालीरीतीप्रमाणे लग्नात मुलींचं नाव-आडनाव बदललं जातं. आता प्रथा, परंपरा म्हटलं की, आपली संस्कृती येते. पण मुलीचं आडनाव बदलण्याची ही ‘प्रथा’ केवळ आपल्याच देशाच्या संस्कृतीत आहे असं नाही. जगभरात सगळीकडे.. विकसित देशांमध्येही हीच पद्धत आहे. कारण बहुतेक सगळं जग पितृसत्ताक संस्कृती मानणारं आहे. लग्न करण्याच्या, ठरवण्याच्या पद्धती जशा जगण्याच्या पद्धतीप्रमाणे बदलल्या तशा जुन्या गोष्टींना मागे सारून नवीन गोष्टी आजच्या पिढीने सहज आत्मसात केल्या. आता नाव बदलण्याच्या प्रथेकडेदेखील आधुनिकतेच्या चष्म्याचून आपल्या आवडीनुसार मुलं-मुली पाहू लागले आहेत.

नावात काय आहे? असं शेक्सपिअरने म्हणून ठेवलेलं असलं तरीही, लग्नानंतर नाव बदलायचा किंवा न बदलायचा निर्णय आजच्या मुलीसाठी सोपा नक्कीच नसतो. नाव बदलण्याची ही प्रथा काही मुलींना मान्य आहे, तर काही मुली याच्या अगदी विरोधात आहेत. विरोधात असणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढतंय. पण उगाच कशाला नवीन संसाराची सुरुवात जुन्या पिढीशी मतभेद करून करा.. नावाचं काय एवढं? असा विचार करणाऱ्या मुलीही बहुसंख्येने दिसतात. नवीन घराशी जुळवून घेताना काही जुन्या गोष्टी मागे पडून नवीन गोष्टी जोडल्या जातात त्यापैकीच एक नाव, असं पहिल्या गटातील मुलींना वाटतं. तर नाव ही आपली कळत्या वयातली पहिली आयडेंटिटी असते आणि लग्न झालं म्हणून तीच का बदलायची, असा रास्त सवाल दुसऱ्या गटातील मुलींचा आहे. ‘व्हिवा’नं याबाबतीत लग्नाळू वयोगटातील मुलींना बोलतं केलं.

आपलं नाव फार ‘कॉमन’ आहे असं वाटणाऱ्या काही जणींना किंवा नावावर विशेष प्रेम नसणाऱ्या मुलींना लग्न ही नाव बदलण्याची नामी संधी वाटते, कारण आपल्याला हवं ते नाव होणाऱ्या नवऱ्याला सांगून ठेवता येतं. याबाबत निशिगंधा बेर्डे म्हणाली की, ‘लग्नानंतर नाव आणि आडनाव दोन्ही बदलायला माझी काही हरकत नाहीये. जसं आई-वडिलांनी मला प्रेमाने नाव दिलं तसंच नवराही देईल आणि सासरी मी त्यांची मुलगी म्हणून जाणार तर त्यांच्यासाठी मी नाव बदलू शकते.’
सगळ्यांनाच नाव बदलावं असं मात्र वाटत नाही. कितीही काही झालं तरी प्रत्येकाला आपल्या नावाविषयी एक सलगी वाटते. त्यामुळे स्वत:च्या नावाबद्दल आग्रही भूमिका घेणाऱ्या मुली अधिक आहेत. त्यापैकीच एक निकिता माणगावकर म्हणाली, ‘माझं नाव मी बदलणार नाही, कारण तीच माझी ओळख बनलीये. पण आडनाव बदलायला हरकत नाही, कारण मी काही नवी नाती जोडणार आहे, नवीन वातावरणात जाणार आहे तर त्यांच्यासोबत जुळवून घेणं मला गरजेचं वाटतं.’ केवळ नावच नाही तर लग्नानंतर मुलीचं आडनाव बदलणार, हे गृहीत धरू नका. हा आमचा निर्णय असेल, असं मात्र ठामपणे आजची मुलगी मांडताना दिसतेय. मुलांनाही मुलीचा हा अधिकार अगदी मान्य आहे आणि त्यांची ही भूमिकाही त्यांना रास्त वाटते. सनिल राणे म्हणतो, ‘नाव बदलायचं की नाही हे त्या मुलीने ठरवावं. तिला जे योग्य वाटेल ते तिने करावं. प्रथा म्हणून नाव किंवा आडनाव बदललंच पाहिजे असा आग्रह धरणं योग्य नाही. तिच्या निर्णयाला महत्त्व आहे.’ वैभवी के. एम. म्हणाली, ‘मी नाव आडनाव बदलणार नाही, कारण २५ ते २६ वषं माझं नाव-आडनाव हीच माझी ओळख आहे. ते बदलून कोणाची तरी सौ. म्हणून नवीन ओळख तयार करण्यापेक्षा माझी असलेली ओळख मी कायम ठेवेन आणि पासपोर्टसारख्या कायदेशीर दस्तावेजावर पुन्हा नाव बदलण्याची तसदी मी घेणार नाही.’ नव्या पिढीतील मुलांचाही याला पाठिंबा आहे. सौरभ तावडे म्हणाला, ‘जन्मापासून ज्या नावाच्या आधारे एखादी मुलगी समाजात आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करते ते नाव बदलून पुन्हा एका नवीन नावाने आपली ओळख निर्माण करणं नक्कीच कुठल्याही स्त्रीला कठीणच असतं. त्यामुळे नाव बदललं नाही तरी त्यात काही वावगं नाही.’

लग्नानंतरच्या आडनावाबाबत एक नवा प्रवाह आजकाल सर्वमान्य होतोय. माहेर-सासर अशी दोन्ही नावं लावून समतोल साधण्याचा. यातून स्वत:ची मूळ ओळख कायम जपली जाते आणि नवीन ओळखही मिळते. म्हणून दोन्ही आडनावं मुली लावतात. पण त्यातून ‘लग्न झालेली मुलगी’ हीच त्या मुलीची पहिली ओळख समोर येते. त्यालाही काही मुलींचा आक्षेप आहे. एकीकडे आपण जातिभेद नष्ट करायच्या गप्पा मारतो आणि ठरावीक आडनावाचा आग्रह धरतो. आडनाव नेहमीच जातिवाचक असतं. त्यामुळे खरं तर आडनावच आपल्या ओळखीतून हद्दपार झालं पाहिजे, असंही काहींचं मत आहे. आडनाव टाळून स्वत:चं नाव, आईचं नाव आणि वडिलांचं नाव असं संपूर्ण नाव लावणाऱ्या मुलींची संख्या अगदी थोडी असली तरी लक्षणीय आहे.

कोणाला वाटतंय नाव आपली ओळख आहे, तर कुणी कायदेशीर कागदपत्रांवर बदल करावे लागतात म्हणून तेच नाव राहू देण्यास पसंती देतंय. कुणाला आपल्या आई-वडिलांचा गौरव आपल्या नावामागे कायम ठेवायचाय, तर काहींना आई-वडिलांनी हक्काने ठेवलेलं नाव केवळ परंपरा, संस्कृतीच्या नावावर बदलावं असं मुळीच वाटत नाहीये. या सगळ्यातली एक सामायिक बाब मात्र अधोरेखित करता येईल. नाव बदलण्याचा किंवा न बदलण्याचा निर्णय मुली जाणीवपूर्वक घेताहेत आणि हा ‘ती’चा निर्णय असेल, हे समाजही हळूहळू मान्य करू लागला आहे. गेल्या पिढीत हीदेखील सोय नव्हतीच. आडनाव न बदलण्याचा पर्याय कित्येकींच्या लेखी अस्तित्वातच नव्हता. आताच्या मुलींना स्वत:चे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्यांच्या निर्णयाला मिळालेली त्यांच्या जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरतेय. घरच्या मोठय़ांनासुद्धा याचं महत्त्व पटवून देण्यात ते पुढाकार घेताहेत. केवळ रीत आहे म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा आपल्या जोडीदाराचं मन आणि मान राखण्याकडे मुलांचाही कल दिसून येतो. मुलींचं वैचारिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या मताचा केला जाणारा विचार नावापेक्षा मोठा वाटतोय. नावात काय आहे, हा प्रश्न रास्त असला तरीही त्याचं उत्तर जिचं नाव आहे, तिनंच द्यायचा मोकळेपणा तरी आता येतोय, हे नक्की.

11

मी नाव आडनाव बदलणार नाही, कारण २५ ते २६ वषं माझं नाव-आडनाव हीच माझी ओळख आहे. लग्नानंतर कुणाची तरी सौ. म्हणून नवीन ओळख तयार करण्यापेक्षा माझी असलेली ओळख मी कायम ठेवेन
वैभवी के. एम.

नाव बदलायचं की नाही हे त्या मुलीने ठरवावं. तिला जे योग्य वाटेल ते तिने करावं. प्रथा म्हणून नाव किंवा आडनाव बदललंच पाहिजे असा आग्रह धरणं योग्य नाही. तिच्या निर्णयाला महत्त्व आहे.
सनिल राणे

लग्नानंतर नाव आणि आडनाव दोन्ही बदलायला माझी काही हरकत नाहीये. जसं आई-वडिलांनी मला प्रेमाने नाव दिलं तसंच नवराही देईल.
निशिगंधा बेर्डे

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 2:20 am

Web Title: women changing their surname after marriage what are the youth opinions
Next Stories
1 ट्राय बिफोर यू बाय!
2 मंगळसूत्राची फॅशन होते तेव्हा..
3 टॅटूचा नवा ट्रेण्ड
Just Now!
X