13 December 2018

News Flash

‘वाद’च नाही

हल्ली ‘हॉट टॉपिक’वर बोलणं किंवा आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देणं म्हणजे ‘कूल’ समजलं जातं.

महिला दिन आणि फेमिनिझम या दोन्ही गोष्टी जणू हातात हात घालून एकत्र सामोऱ्या याव्यात तशा जिथे तिथे दिसतात, त्यावर घनघोर चर्चाही होते, मात्र या शब्दाचा नेमका अर्थ किती जणांना माहिती असतो. याहीपलीकडे जात खांद्याला खांदा लावून वावरणाऱ्या या तरुणाईच्या जगात ‘फेमिनिझम’चा संदर्भ या पिढीसाठी काही उरलाय का? याचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं.

हल्ली ‘हॉट टॉपिक’वर बोलणं किंवा आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देणं म्हणजे ‘कूल’ समजलं जातं. आपल्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल माहिती असणं ही एक गोष्ट आहे, पण चारचौघांत फुशारक्या मारत ते ‘चुकीचं’ असलं तरी व्यक्त व्हायला लोक कचरत नाहीत. म्हणजे जे कानावर पडतंय त्याची स्वत: शहानिशा न करता, वरवरचं सगळं लक्षात ठेवायचं आणि जिथे हे ज्ञान वाटता येईल असं वाटेल तिथे ते देऊन यायचं हा फंडा इतका रुळलाय की त्यामुळे जे नेमकं लोकांपर्यंत पोहोचायला हवं ते होतच नाही, नको त्याचा बोलबाला होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर साधारण दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘इंटॉलरन्स’ म्हणजेच असहिष्णुतेच्या मुद्दय़ाचं घेता येईल. आमिर खानच्या मुलाखतीत त्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने त्याच्या मनातील भीती व्यक्त केली, मात्र देशभर हा मुद्दा वणव्यासारखा पेटला. त्यात राजकीय पक्षांचे निर्णय, बीफबंदी असे अनेक मुद्दे तेल ओतल्यासारखे पडत राहिले आणि अबालवृद्धांच्या तोंडी ‘इंटॉलरन्स’ची चर्चा ऐकू यायला लागली. असाच प्रकार हा नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्तानेही अनुभवायला मिळतो. महिला दिन आणि फेमिनिझम या दोन्ही गोष्टी जणू हातात हात घालून एकत्र सामोऱ्या याव्यात तशा जिथे तिथे दिसतात, त्यावर घनघोर चर्चाही होते, मात्र या शब्दाचा नेमका अर्थ किती जणांना माहिती असतो. याहीपलीकडे जात खांद्याला खांदा लावून वावरणाऱ्या या तरुणाईच्या जगात ‘फेमिनिझम’चा संदर्भ या पिढीसाठी काही उरलाय का? याचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं.

एखाद्याला आपण किती ‘ओपन माइंडेड’ आहोत हे दर्शवण्याच्या नादात मनाला न पटणारी एखादी पुरोगामी गोष्ट किंवा विचार उगीच आपल्याला किती पटतो हे दाखवण्याचा अट्टहास केला जातो. धर्म-जात-लिंग भेद अशा कुठल्याच भिंती न मानणारी आजची पिढी, लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या नव्या पद्धतींचा आग्रह धरणारी तरुणाई मुळातच समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करणारी आहे. त्यांच्यासाठी ‘फेमिनिझम’ म्हणजेच स्त्रीवाद नेमका काय अर्थ घेऊन येतो.. स्त्रियांच्या प्रगतीचे, विकासाचे मुद्दे असतील किंवा नुसतं एखाद्या घोळक्यात स्त्रीच्या बाजूने बोललं की फेमिनिस्ट आहेस वाटतं, असा प्रश्न केला जातो. केवळ स्त्रियांच्या बाजूने बोललं, संवेदनशीलतेने त्यांचे विषय मांडले म्हणजे ती व्यक्ती ही स्त्रीवादाची पुरस्कर्ती आहे, असं लेबल लावून मोकळ्या होणाऱ्यांचं प्रमाण आजही जास्तच आहे. पण याला स्त्रीवाद म्हणत नाहीत. खरंतर समाजातील लिंगभेद समूळ नष्ट होऊन स्त्री आणि पुरुषांना सर्व क्षेत्रांत समान संधी उपलब्ध व्हायला हव्यात म्हणून प्रयत्नशील राहणं म्हणजे आजच्या काळातला स्त्रीवाद असायला हवा.

साधारण शतकभरापूर्वी हे झगडणं स्त्रियांच्या हक्कासाठी आणि समान संधींसाठी होतं, मात्र आता ते समाजातल्या प्रत्येक घटकासाठी लागू होतं. त्याचं कारण आता स्त्रिया स्वबळावर पुढे जातायेत, करिअर असो वा कौटुंबिक समस्या.. प्रत्येकावर आपापल्या पद्धतीने मात करून त्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे स्त्रीवादाचा विचार, त्याबद्दलचे त्यांचे संदर्भही निश्चितच बदललेले आहेत. पुण्यात शिकणारी अनुजा साठय़े सांगते की, ‘मी घरात एकटीच मुलगी असल्याने मला कधी घरात स्त्रीवाद काय असतो याचा प्रत्यय आला नाही, मात्र कॉलेजमध्ये आल्यावर आजही अनेक गोष्टींमध्ये मला तफावत होताना दिसते. मुली म्हणून आम्हाला सवलती देणं मला खटकतं. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दयेची गरज वाटत नाही, कारण आम्हाला समान संधी हव्या आहेत, सवलती नाही.’

समानतेचा पुरस्कार करताना एकीकडे स्त्रियांना वेगळ्या सवलती नको असं वाटणाऱ्या अनुजाप्रमाणे अनेक मुली आहेत. मुंबईच्या कस्तुरीनेही याविषयी बोलताना सांगितलं की, ‘आम्हा शहरांतल्या मुलींना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या मुलांप्रमाणेच समान संधी आहेत, मात्र भारताच्या खेडोपाडय़ांमध्ये आजही प्रगती झालेली दिसून येत नाही. तिथल्या मुलींप्रमाणेच मुलांनाही अनेक गोष्टींपासून वंचित राहावे लागते आहे. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो. शहरात राहून फेमिनिझमच्या नावाने ओरड करण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे जाऊन विकासाची कामं करणं जास्त गरजेचं आहे,’ असं ती ठामपणे सांगते.

स्त्रीवाद म्हणजे केवळ महिला आणि त्यांचे प्रश्न हे समीकरण प्रचलित असताना मुंबईचा सागर शिंदे म्हणतो, ‘समाजात गुण्यागोविंदाने नांदणारी लिंग समानता म्हणजे खरा स्त्रीवाद, कारण त्यामुळे स्त्रियांची प्रगती तर होतेच पण त्या कमजोर आहेत असं समजून त्यांना दिली जाणारी वागणूक, सवलतीही संपुष्टात येतात. मुळात स्त्री असो वा पुरुष दोघांना आज समाजात अनेक अडचणी आहेत, मात्र त्या सोडवण्यापेक्षा आपण एखादा शब्द, इझम पकडून त्यावर फक्त भाष्य करत राहतो आणि गोळाबेरीज उरते ती शून्य, हे पटत नाही. तळागाळातील पुरुषांचे आणि स्त्रियांचे प्रश्न गहन आहेत. त्यामुळे स्त्रीवाद जर समाजात खऱ्या अर्थाने उतरवायचा असेल तर दोघांसाठी काम करणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दशकांमध्ये महिलांनी त्यांचं कर्तृत्व त्यांच्या कामातून दाखवून दिलं आहे त्यामुळे त्या कशातच कमी नाहीत. तरीही महिला आणि त्यांचे हक्क हा विषय उगीच फेमिनिझमच्या नावाखाली चघळत बसण्यापेक्षा समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी, लिंग, जात, धर्म न जुमानता काम होणं महत्त्वाचं आहे,’ असं सागरला वाटतं.

‘इझम’ किंवा अन्य शब्दांच्या आधारे वैचारिकतेचे इमले बांधण्यात आपण मग्न असतो. त्याच नादात आपण किती सहजपणे अनेक गंभीर विषय बोलून जातो पण त्यामागचा अर्थ, त्याचा गाभा किंवा समाजातील घटकांवर होणारा त्याचा परिणाम लक्षातच घेत नाही. पण आजची सुजाण तरुण पिढी डोळे आणि कान बंद करून न बसता त्यावर विचार करू पाहतेय यासारखी आनंदाची गोष्ट नाही. ही एका नव्या काळाची सुरुवात आहे जिथे लिंग, धर्म, जात याच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाशी माणसासम वागणे एवढेच अभिप्रेत आहे.

viva@expressindia.com

First Published on March 9, 2018 12:38 am

Web Title: women day 2018 feminism