12 December 2018

News Flash

वारे बदलांचे!

समाजात घेतले जाणारे सगळेच निर्णय पूर्वीपासून नेहमीच स्त्रियांच्या विरुद्ध होते, अशातला भाग नाही.

निर्णयी कोणत्याही क्षेत्रात किंवा वैयक्तिक आयुष्यात जेव्हा जेव्हा स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते तेव्हा तेव्हा स्त्रियांनी त्यांच्या कामगिरीने त्या संधीचे सोने केलेले आहे. पण जेव्हा या संधी उपलब्ध होत नाहीत त्या वेळी चळवळीच्या माध्यमातून, स्वत:ची भूमिका ठामपणे मांडत, गरज पडेल तेव्हा न्यायव्यवस्थेच्या मदतीने त्या संधी त्यांनी अक्षरश: खेचून आणल्या आहेत. काळानुसार एकूणच स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनात बदल होत चालला असल्याने अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे निर्णय घेत त्यांच्यासाठी बंद असलेली कवाडे खुली करण्यात आली. अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग, भावना कांथ या तीन तरुणींच्या हातात फायटर प्लेन चालवण्याची धुरा देण्याचा निर्णय हा अशाच निर्णयांपैकी एक ऐतिहासिक निर्णय.. गेल्या काही वर्षांत स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या अशा निर्णयांचा महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा..

नुकताच ‘पॅडमॅन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. महिलांच्या मासिक पाळीदरम्यान वापरले जाणारे पॅड (सॅनिटरी नॅपकिन), त्याची गरज, स्त्रियांच्या आरोग्यासाठी या पॅडची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना स्वस्त दरात हे पॅड मिळवून देणाऱ्या अरुणाचलम मुरुगनाथम यांची कथा सांगणारा हा चित्रपट. या चित्रपटात अरुणाचलम यांची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारच्या तोंडी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत एक वाक्य आहे, ‘वुमन स्ट्राँग, मदर स्ट्राँग, सिस्टर स्ट्राँग देन कंट्री स्ट्राँग’. हे वाक्य खूप अर्थपूर्ण आहे. या देशातील स्त्रिया जेव्हा त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जातील तेव्हाच देश खऱ्या अर्थाने प्रगतिपथावर चालू लागेल.

स्त्री शिक्षणापासून ते आरक्षणापर्यंतच्या मुद्दय़ांवरून स्त्रियांना घर, समाज आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन झगडावे लागले आहे. समाजात घेतले जाणारे सगळेच निर्णय पूर्वीपासून नेहमीच स्त्रियांच्या विरुद्ध होते, अशातला भाग नाही. पण अनेकदा समाजाने घेतलेल्या निर्णयांमुळे स्त्रियांच्या आयुष्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा फारसा विचार केला गेला नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत शिक्षणाने आणि स्वत:च्या बुद्धिमत्तेने, कठोर मेहनतीने आजवर जी क्षेत्रे फक्त पुरुषांसाठी म्हणून ओळखली जात होती तिथेही स्त्रिया त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत झाल्या. अगदी नजीकच्या काळातील म्हणता येईल असा सैन्यदल, वायुदल आणि नौदलात स्त्रियांना प्रत्यक्ष लढण्याची परवानगी नव्हती. २०१५ साली केंद्र सरकारने त्या संदर्भात विचार सुरू केला असून त्या दृष्टीने पावलेही उचलली जाऊ लागली आहेत. त्याची पहिली प्रचिती ही अवनी चतुर्वेदी या २५ वर्षीय तरुणीने मिग-२१ हे लढाऊ विमान उडवीत पहिली गगनभरारी घेतली. लढाऊ विमान उडवणारी देशाची पहिली महिला वैमानिक असा इतिहास नोंदवणाऱ्या अवनीचा पराक्रम हा येत्या काळात तिच्यासारख्या महत्त्वाकांक्षी तरुणींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अजून सैन्यदल आणि नौदलातील महिला अधिकाऱ्यांना लढतीवर पाठवण्याचे निर्णय प्रत्यक्षात उतरले नसले तरी तो दिवस दूर नाही.

निर्भया प्रकरणानंतर २०१३ साली देशातील दोन्ही सभागृहांच्या आणि राष्ट्रपतींच्या संमतीने लैंगिक शोषणाविरुद्धचा ‘निर्भया कायदा’ अमलात आणला गेला. बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या स्त्रिया आपली समाजातील अब्रू जाईल, या भीतीने गप्प बसत होत्या. निर्भया कायद्यामुळे योग्य ते पुरावे प्रस्तुत करीत हे प्रकार करणाऱ्या आरोपींना योग्य ती शिक्षा दिली जात आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या या कायद्यामुळे आज स्त्रिया न घाबरता या अन्यायाविरोधात दाद मागत आहेत.

अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने महिला सबलीकरणासाठी आणि त्यांच्या अनेक गहन प्रश्नांविषयी अभ्यास करून असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यातला गेल्या वर्षभरात सामाजिक बदलांच्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरलेला कायदा म्हणजे ‘तिहेरी तलाक बंदी’ कायदा. आजच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, स्काइप अशा माध्यमांचा वापरसुद्धा तलाकसाठी केला जात होता. मात्र तिहेरी तलाक बंदीचा कायदा लागू करीत वर्षांनुवर्षे ‘धर्माच्या’ नावाखाली महिलांची नामुष्की करणारी ही पद्धत सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढली. शहा बानू यांच्यामुळे या अन्यायाला वाचा फुटली आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्याला खरेच सलाम आहे. तिहेरी तलाकप्रमाणेच अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारे ‘लग्न न करता स्त्रीने पुरुषासोबत राहू नये’ हे सामाजिक बंधनही सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षांपूर्वीच काही ‘अटी’ लावत मोडीत काढले. याचप्रमाणे २००६ साली हिंदू लग्न कायद्याअंतर्गत महिलांना त्यांच्या इच्छेनुसार स्वखुशीने ‘आंतरजातीय विवाह’ करण्यासाठीही न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली आहे. केवळ माणुसकीच्या दृष्टीने न बघता धर्म, जात, प्रतिष्ठा यांच्या ओझ्याखाली गुदमरणाऱ्या स्त्रियांना या निर्णयांमुळे स्वत:चे आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याची उमेद मिळाली आहे.

एकीकडे स्त्रियांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल विचार केला जात असतानाच त्यांना उपलब्ध असलेल्या नोकरी-व्यवसायांच्या संधीबाबतही असाच कायापालट झालेला दिसून येतो आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर ‘स्टेशन मास्तर’ म्हणून कार्यरत असलेल्या ममता कुलकर्णीपासून ते सफाई कामगारांपर्यंत साधारण ३० महिलांचा संघ कार्यरत आहे. केवळ रेल्वे स्थानकच नाही तर रेल्वेच्या वर्कशॉपमध्येही महिला मागे नाहीत. नारीशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या गेलेल्या रेल्वेच्या या पहिल्यावहिल्या प्रकल्पाची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ने तर दखल घेतलीच आहे; मात्र दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना माटुंगा स्थानकावर हे दृश्य बघून काही तरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा मिळते आहे. भारतीय सैन्यात भरती होऊन स्त्रिया ज्याप्रमाणे देशसेवा करीत आहेत त्याप्रमाणेच स्वत:चे घर चालवण्यासाठी दररोजच्या जीवनात ‘पुरुषांचं काम’ म्हणून पाहिले जाणाऱ्या गाडीचालकाची भूमिकाही त्या उत्तम बजावत आहेत. मग ती रेल्वे चालवणारी असेल, मेट्रो चालवणारी असेल किंवा देशभरातील अनेक शहरांमध्ये रिक्षा आणि टॅक्सीचालक म्हणून कार्यरत असलेल्या स्त्रिया असू देत. ‘प्रियदर्शिनी’सारख्या अनेक नामांकित स्वायत्त कंपन्या त्यामुळे उदयास आल्या असून महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. लिंगभेद मोडून काढल्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

राजकारणात आणि पर्यायाने समाजकारणात मिळालेलं महिला आरक्षण स्त्रियांचं उत्तम ‘होम मॅनेजमेंट’ नक्की दाखवून देईल यात शंका नाही; कारण घर असो वा देश सगळ्यांचं हित लक्षात घेऊन सर्वागीण विकास करणं त्यांना उत्तम जमतं.

आपल्याकडे खेळ म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर यायचं ते म्हणजे क्रिकेट. अजूनही परिस्थिती फारशी बदलली नाहीये मात्र देशासाठी केवळ पुरुषांचा संघच क्रिकेट खेळतो, असं समजणाऱ्यांना महिला क्रिकेट संघानेही आपल्या दमदार खेळीने स्वत:च्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. पुरुष क्रिकेट संघाप्रमाणेच महिलांच्या संघाने आपली नवी ओळख आंतराष्ट्रीय किकेटमध्ये निर्माण तर केलीच आहे मात्र मिथिला राजने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करण्याचे रेकॉर्ड मोडीत काढलेय. क्रिकेटप्रमाणेच बाकी खेळांमध्येही जिथे केवळ पुरुषांच्या नावाचा जयघोष होताना दिसत होता तिथे  सायना, सिंधू, दीपिका कुमारी, साक्षी मलिक इत्यादींनी आपला डंका वाजवला आहे.

पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान असोत, पहिल्या आय.पी.एस. अधिकारी किंवा अगदी रेल्वे आणि मेट्रोचालक असोत महिला कुठेच मागे नाहीत. मात्र लिंगभेदाचा विळखा हा सहजासहजी सुटणारा नाही. समाजात आजही काही घटक लिंगभेदाचा पुरस्कार करताना दिसतात. चिंतेची बाब ही आहे की आजही केवळ स्त्रियांच्या प्रश्नांना ‘महिला दिनी’च वाचा फोडली जाते. आणि दिवस मावळताना मग तो जोशही निवळतो. मुळात स्त्रीच्या समस्या लक्षात घ्यायच्या तर त्या त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा, ही धारणा आता कुठे मूळ धरू लागली आहे. चित्र पूर्ण बदलायला वेळ लागेल तोवर आपल्या क्षमता सिद्ध करीत, आपला आवाज बुलंद करीत स्त्रियांना आपली लढाई सुरू ठेवायलाच हवी!

viva@expressindia.com

First Published on March 2, 2018 12:39 am

Web Title: women day 2018 pilot avani chaturvedi become first indian female fighter