News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : स्त्रीसन्मान गाण्यांतून..

सगळ्यात पहिले आठवणारे गाणे आज जवळपास कानबाह्य़ झालेल्या एका अलीकडच्या कलाकाराचे आहे.

या आठवडय़ामध्ये बिलबोर्ड यादीतील पहिले गाणे तब्बल अकरा आठवडय़ानंतर बदलले. पण ‘गॉड्स प्लान’ या ड्रेकच्या गाण्याने प्रथम क्रमांक गमावला असला तरी त्याच्याच ‘नाइस फॉर व्हॉट’ या नव्या गाण्याने यादीच्या अग्रभागाला पटकावले आहे. यच्चयावत विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या प्रभावशाली महिलांवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचा अंतिम आशय हा महिलाशक्तीसोबत प्रेम या घटकाचे महत्त्व वगैरे सांगणारा आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेपासून इतरत्र पसरलेल्या ‘मी टू’ मोहिमेनंतर महिला अत्याचारांविरोधात तावातावाने बोलणाऱ्यांची आणि महिलांविषयी कोणतीही सहानुभूती समाजमाध्यमांपासून प्रत्यक्ष जगण्यातही न दाखवणाऱ्यांची अशी जगाची विभागणी झाली आहे. आपल्याकडे सध्याच्या सामूहिक मनोउद्रेकाच्या लाटेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समाजमाध्यमांवर दुसऱ्याच्या मतावर कुरघोडी करणारी अधिक जहरी पोस्ट कोण करतो, याची स्पर्धाच लागली आहे. स्त्री आदराची दांभिकता ‘महिला दिना’पुरती ओसंडून वाहू देणाऱ्या आणि अत्याचारांच्या घटनांनंतर उत्कटतेने स्त्री शक्तीच्या बाता मारणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीची पोकळता समजून घेण्याइतकी ताकद महिलांमध्ये नक्कीच आहे. गंमत म्हणजे ड्रेकचे यशस्वी महिलांवर चित्रित करण्यात आलेले गाणे पहिल्या क्रमांकावर जाण्यामध्ये सध्याची जागतिक मानसिकता कारणीभूत आहे, हे खरे असले तरी गेल्या दोनेक दशकांत महिलांची जगण्यातील ताकद मान्य करणारी कित्येक पुरुषांची अन् महिलांचीही गाणी लोकप्रिय झाली आहेत.

सगळ्यात पहिले आठवणारे गाणे आज जवळपास कानबाह्य़ झालेल्या एका अलीकडच्या कलाकाराचे आहे. जमैकामधील ‘श्ॉगी’ या गायकाने दोन हजारच्या दशकांत आपले मोठे बस्तान बसविले होते ते पुरुषांसाठी नेत्रदीपक ठरणाऱ्या गाण्यांनी. ‘गर्ल्स जस्ट हॅव फन’, ‘इट वॉझण्ट मी’ ,‘एन्जल’ या उडत्या चालीच्या गाण्यांमधून स्त्रियांविषयीची उथळवजा मते व्यक्त करून झाल्यानंतर त्याने जबरदस्त धक्का देणारे गाणे प्रसिद्ध केले. ‘स्ट्रेन्थ ऑफ द वुमन’ नावाचे गाणे ऐकण्याइतकेच पाहण्यासाठीचे त्याचे सर्वात सोज्ज्वळ अन् सुंदर गाणे आहे. जेनिफर लोपेझचे ‘आय एण्ट नो युवर ममा’ हे गाणे कुटुंबवत्सल महिलांच्या खस्ता खाण्याच्या प्रवृत्तींवर बेतले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील स्त्रियांपासून ते भारतातील विकसनशील खेडय़ातील सर्वच महिलांसाठी ते लागू आहे. जेनिफर लोपेझच्या नवऱ्याचे म्हणजे मार्क अ‍ॅन्थनीचे ‘यू संग टू मी’ हे गाणे देखील स्त्रीशक्तीचे ऋण मान्य करणारे आहे. मार्क अ‍ॅन्थनीचे हेच एकटे गाणे आपल्याकडे एका काळात प्रचंड लोकप्रिय होते. ‘एम.आय.ए.’ या श्रीलंकी-ब्रिटिश गायिकेची सारी गाणी अचाट तत्त्वज्ञानातून तयार झालेली आहेत. ‘बॅड गर्ल्स’ या गाण्यातील व्हिडीओची चोरी आपल्याकडच्या ‘खिलाडी’ प्रवृत्तीच्या नायकाची लोकप्रियता वाढविण्यासाठी केली गेली होती. शेरील क्रो हिच्या ‘आर यू स्ट्राँग इनफ टू बी माय मॅन?’ या गाण्यात पुरुषाची कल्पना करताना स्वत:च्या ताकदीची या कलाकाराला पूर्ण कल्पना आहे. शनाया ट्वेन हिचे ‘दॅट डोण्ट इम्प्रेस मी मच’ हे गाणेदेखील शेरील क्रोच्या शब्दांना वेगळ्या रूपात मांडते. शनाया ट्वेनची सगळीच गाणी रांगडी आणि एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकण्यास प्रवृत्त करणारी आहेत. ‘दॅट डोण्ट इम्प्रेस मी’ हे गाणे स्त्रीशक्तीचे रूप मांडणारे असल्यामुळे इथे नमूद करणे गरजेचे वाटले. गेली तीसेक वर्षे ‘यूटू’ हा आयरिश बॅण्ड प्रेमगीतांची बरसात करीत आला आहे. या बॅण्डचा मुख्य गायक बोनो हा सामाजिक योगदानामुळे मासिकांच्या जाहिरातींमध्ये, टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये, आंतरराष्ट्रीय सोहळ्यांमध्ये सातत्याने दिसणारा चेहरा आहे. या कलाकाराने आपल्या पत्नीविषयी तयार केलेली गाणी लोकप्रिय आहेत. त्यातले ‘स्वीटेस्ट थिंग’ हे गाणे विविध कारणांमुळे अफाट लोकप्रिय आहेच. गेल्या वर्षांच्या अखेरीस त्यांचा ‘साँग्ज ऑफ एक्स्पिरिअन्स’ आल्बम आला. त्यात अनेक प्रेमगीते आहेत. अन् आपल्या पत्नीवर ‘लॅण्डलेडी’ हे गाणे देखील आहे. ‘यू आर बेस्ट थिंग अबाऊट मी’ आणि इतर सर्व  गाण्यांमध्ये नव्वदीच्या दशकातील त्यांच्या शैलीची वैशिष्टय़े एकवटली आहेत.

स्त्रीप्रेम, स्त्रीकुतूहल आणि आदर यांच्या संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहेत. कोणत्याही घटना आणि दुर्घटनांच्यावेळी त्यावरून समाजमाध्यमांमध्ये दिवसरात्र अवडंबर माजवून ‘आम्ही कसे दांभिक नाही’ याचा दाखला देऊ पाहणाऱ्या सध्याच्या चर्चिल वातावरणामध्ये आपल्याला महिलाशक्तीवरील गाण्यांतून उमजली, तरी ते आपल्यापुरते बरे असेल.

म्युझिक बॉक्स

  • Drake – Nice For What
  • Shaggy – Strength Of A Woman
  • Jennifer Lopez – Ain’t Your Mama
  • Sheryl Crow – Strong Enough
  • Shania Twain – That Don’t Impress Me Much
  • I.A. – “Bad Girls”
  • U2 – Landlady

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:05 am

Web Title: women respect song feminist song pop music
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : फ्रुटी
2 उन्हाळ्यात मेकअप करताय?
3 फॅशनदार : फॅशन करिअर?
Just Now!
X