विनय नारकर

आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटाकडे जातानाही आपण स्त्रिया व्यावसायिक क्षेत्रांमध्ये पुरुषांची बरोबरी करतात किंवा नाही अशा चर्चा करत असतो. हातमाग विणकामात महिला विणकर गेल्या कित्येक शतकांपासून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत, पण त्याबद्दल फारशी जागरूकता झालेली दिसत नाही.

आज माझ्यासोबत जितके विणकर काम करतात त्यांच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिला आहेत. त्यांच्या कामामध्ये पुरुषांपेक्षा जास्त सफाईदारपणा आहे हे निश्चितपणे जाणवते. महिला विणकर भारतात अनेक शतकांपासून काम करीत असल्याचे पुरावे मिळतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात त्या वेळच्या हातमाग क्षेत्राबाबत विस्तृत विवेचन सापडते. मौर्य काळात हातमाग विणकाम हे स्त्रियांच्या उपजीविकेचे स्वतंत्र साधन होते. ही बाब स्त्री-पुरुषांच्या सामाजिक संबंधावरही प्रकाश टाकते. स्त्रियांच्या उपजीविकेसाठी फार साधने उपलब्ध नव्हती. ज्या स्त्रियांना हे उपजीविकेचे साधन उपलब्ध होते त्यांच्याबद्दलही विस्तृत माहिती ‘अर्थशास्त्रात’ दिली आहे. विधवांच्या उपजीविकेची मोठीच सोय विणकामाद्वारे केली जायची.

ज्या स्त्रियांचे पती कामानिमित्त दूर राहायचे किंवा प्रदीर्घ काळ प्रवासासाठी जायचे त्या स्त्रियांनाही विणकाम करून पैसे कमावता यायचे. त्या काळी व्यापारासाठी पुरुषांना बराच काळ घराबाहेर राहावे लागायचे, त्यांच्या स्त्रियांसाठी ही खास व्यवस्था होती. व्यापारामधील अनिश्चिततेची कुटुंबाला झळ पोहोचू नये ही भूमिकाही त्यामागे होती. अपंग स्त्रियाही त्यांना विणकामातील जमेल ती जबाबदारी घेऊ न स्वतंत्र कमाई करू शकत असत.

संसाराचा त्याग करून संन्यस्त झालेल्या स्त्री-पुरुषांनी भिक्षा किंवा मिळालेल्या दानाद्वारे उपजीविका चालवायची असते. परंतु साध्वींना भिक्षा मागण्यासाठी फिरणे अवघड जात असल्यास त्याही विणकाम करू शकायच्या. गुन्हेगार स्त्रियांना द्याव्या लागणाऱ्या दंडाची कमाई त्या विणकामाद्वारे करू शकत होत्या. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या माता, निवृत्त देवदासी आणि राजदरबारातील निवृत्त दासी यांनाही विणकर बनता यायचे. अशा स्त्रियांच्या उत्पन्नाचे साधन बंद झाल्यामुळे त्यांच्यावर परावलंबित्व येऊ  नये म्हणून त्यांच्यासाठी ही व्यवस्था होती. या स्त्रियांना विणकामाचे खास प्रशिक्षण दिले जायचे.

विवाहित स्त्रिया किंवा उपरोक्त उल्लेख झालेल्या स्त्रिया सोडून अन्य अविवाहित स्त्रियांना मात्र विणकर बनता येत नसे. हे काम देताना त्या त्या स्त्रियांच्या क्षमतेचा विचार करून त्यांना जमेल असे काम दिले जायचे. यांत विणकाम, सूतकताई व अन्य कामांचा समावेश होता.

स्त्री विणकरांसोबत काम करताना पाळायचे नियम व सूचना हेही सविस्तरपणे दिलेल्या आढळून येतात. ज्या स्त्री विणकर घराबाहेर पडू शकत नव्हत्या, त्या तयार झालेला माल देणे आणि नवीन कच्चा माल घेणे यासाठी सेविकांना शासकीय कार्यशाळांमध्ये पाठवू शकत असत. यामागचा उद्देश हाही असायचा की कार्यशाळांमधील पर्यवेक्षकांची व स्त्री विणकरांची थेट भेट टाळली जावी. ज्या स्त्री विणकर मालासाठी व मानधनासाठी स्वत: जायच्या, त्यांना पहाटेच्या वेळी जाणे गरजेचे होते. ज्या विभागात पर्यवेक्षक त्यांचे काम तपासायचे तेथे माफक प्रकाशच असणे गरजेचे होते. जेणेकरून त्यांना स्त्री विणकरांचा चेहरा दिसू शकणार नाही. त्या पर्यवेक्षकांना कामाशिवाय अन्य विषयांवर बोलण्यासही मनाई होती. अन्यथा त्यांना कडक शिक्षेची तरतूद असायची. यामागे प्रामाणिकपणा जपणे आणि विणकर स्त्रियांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे दोन्ही उद्देश होते.

आज भारतात एकूण विणकर संख्येच्या सत्तर टक्के विणकर या महिला आहेत. परंतु त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण त्यांच्या पतीचे किंवा मुलांचे आहे. आर्थिक स्वायत्तता या स्त्री विणकरांना मिळताना दिसत नाही. शासकीय नोंदणी करतानाही पुरुष स्वत:च्या नावे हातमाग नोंदवतो. अशा बाबींमुळे स्त्री विणकरांना त्यांचे श्रेय व मोबदला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा सामाजिक स्तरही उंचावत नाही. कित्येक शतकांपूर्वी ज्या गोष्टींची काळजी घेतली जात होती ती आज दिसत नाही. कित्येकदा असे दिसून येते की पुरुष फक्त स्त्री विणकरांच्या कामाचा मोबदला घेतात, स्वत: वेगळे काम करीत नाहीत.

काही स्वयंसेवी संस्था स्त्री विणकरांसाठी खूप चांगले काम करीत आहेत. खूप करण्यासारखे आहे. हातमाग विणकाम हे एक असे क्षेत्र आहे, ज्यात स्त्रिया शेकडो वर्षांपासून कार्यरत आहेत. असे अन्य व्यावसायिक क्षेत्र दुर्मीळ आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री विणकरांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणी जागवणे यासाठी महत्त्वाचे ठरते.

viva@expressindia.com