कोमल आचरेकर

तो आला, तो बोलला, त्यानं हसवलं आणि विचार करायलाही भाग पाडलं. मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या यूटय़ूब फॅनफेस्टला या आघाडीच्या स्टॅण्डअप कॉमेडियनला भेटण्याचा योग आला आणि अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे तो बोलू लागला. ७ मेच्या जागतिक हास्य दिनानिमित्त वेबदुनियेतील या अवलिया कल्लाकाराबरोबर अर्थात झाकीर खानबरोबर रंगलेली ही बातचीत..

एखाद्याला रडवणं सोपं असतं; पण हसवणं तितकंच अवघड. हसवणं ही एक कला आहे आणि स्टॅण्डअप कॉमेडी हा या कलेतील एक प्रकार. आपल्या एकपात्री प्रयोगाप्रमाणेच, पण बांधीव आखीव कथा किंवा संहिता याला असतेच असं नाही. आजकाल यूटय़ूबमुळं स्टॅण्डअप कॉमेडी क्षेत्रातील कलाकारांना प्रसिद्धी मिळते आहे. त्यातलं सध्याचं एक आघाडीचं नाव म्हणजे झाकीर खान. त्यानं त्याच्या उपहासात्मक विनोदी शैलीनं सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. यूटय़ूबवर त्याचे साडेचार लाखांवर सबस्क्रायबर्स आहेत. त्याच्या स्टॅण्डअप कॉमेडीचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी तरुण गर्दी करतात. त्याचे विनोद अगदी रोजच्या आयुष्यात घडणारे आणि आजच्या तरुणांची भाषा बोलणारे असल्यानं तो तरुणांना आपला एखादा मित्रच वाटतो. ‘ठीक है ना?..’ असं कॅमेऱ्यात बघत प्रेक्षकांशी संवाद साधणं आणि जणू आपलं बोलणं खरं आहे, हे खात्री करून घेणं हे त्याच्या बोलण्यात नेहमीच येतं. ही त्याची शैली त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतानाही जाणवत राहते. ‘भाई हूँ तेरा, बताके जाऊंगा..’ असं स्वत:च्या खाशा शैलीत म्हणणारा हा विनोदवीर हसत-हसवत सगळ्यांना आपलंसं करतो. त्याच्या परफॉर्मन्सच्या वेळी प्रेक्षकांमधून येणारा हशा, टाळ्या नि शिटय़ा त्याच्या यशाची पोचपावती देतात.

कॉमेडी म्हणजे काय, असं विचारलं असता झाकीर सांगतो की, ‘‘ही एक भावना आहे. एक प्रकारची ऊर्मी आहे. तिला त्याच दृष्टिकोनातून पाहिलं आणि वागवलं गेलं पाहिजे. रडणं ही एक भावना आहे, तसंच हसण्याबद्दलदेखील आहे. हसण्याची- हसवण्याची ठोस अशी व्याख्या किंवा संकल्पना मांडता येणं कठीण आहे. अमुक केलं की लोक हसतात असे ठोकताळे बांधता येत नाहीत. कॉमेडीचे खूप प्रकार-उपप्रकार आहेत. कुणाला संता-बंताचे विनोद आवडतात, तर कुणाला प्रादेशिक टिप्पण्या भावतात. कुणाला उपहासात्मक विनोद आवडतो. माझ्यासाठी कॉमेडी म्हणजे- एखाद्याला आज हसवेल, उद्या त्यावर विचार करायला लावेल. एखाद्याला सगळे विचार बाजूला सारायला लावून, सगळे ताण विसरून निखळपणं हसवेल ती खरी कॉमेडी. अशा कॉमेडीची व्याख्या कुणी करू शकत नाही, तिला साच्यात बसवता येत नाही. ही भावना असल्यामुळं त्याची जाण असणंदेखील महत्त्वाचं आहे.’’

विनोदवीर विनोदाचा विचार कसा करतो, यावर झाकीर सांगतो, ‘‘प्रत्येक कलाकार हा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहात असतो आणि त्या गोष्टी तो कलेच्या माध्यमातून मांडत असतो. कवी असेल तर तो त्याच्या कवितेतून, विनोदवीर असेल तर तो त्याच्या विनोदांतून काही गोष्टी मांडतो, सांगू पाहतो.’’ वेबमाध्यमातून अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळतं, त्याचा गैरवापर विनोदवीर करतात, असा आरोप सध्या होत आहे. ‘‘यूटय़ूबच्या माध्यमातून मिळणाऱ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करून आपण आपलं मत मांडू शकतो. बरेचदा सामान्य प्रेक्षक रिलेट करू शकतील असा आशय त्यात असतो. बरेचदा लाइव्ह परफॉर्मन्स करताना मित्रांशी बोलतो तशा शिव्या तोंडात येतात. या गोष्टी लाइव्ह परफॉर्मन्स करताना सहज चालून जातात, पण व्हिडीओसाठी कदाचित त्या योग्य वाटत नाही. त्यामुळे चार-पाच वेळा शिवी असेल तर एखाद्या वेळी बीप आवाज टाकला जातो. बाकी फारशी सेन्सॉरशिप लागत नाही,’’ असं झाकीर सांगतो.

झाकीर खान मूळचा इंदौरचा. साध्यासुध्या घरातला शिक्षकाचा मुलगा. त्याच्या करिअरच्या प्रवासात वडिलांचा त्याला खूप पाठिंबा दिला. त्यामुळे ‘‘माझ्या यशाचं आणि लोकप्रियतेचं मलाच अप्रूप आहे,’’ असं तो म्हणतो. आता कोणी स्टार मंडळी त्याच्याशी बोलायला येतात, तेव्हा हे आपल्याला ओळखतात? असा प्रश्न त्याला पडतो. झाकीरला लुई सी केचं काम आवडतं. वडिलांच्या चेहऱ्यावर असणारं हसू कॉमेडियनचं काम करण्यासाठी त्याला प्रेरणा देतं. ‘‘माझ्या वडिलांच्या नजरेत माझ्याविषयी दिसणारा अभिमान आणि माझ्या यशाबद्दल त्यांना वेळोवेळी होणारा आनंद मला द्विगुणित करायचा आहे. त्यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो,’’ असं तो सांगतो. बोलण्याच्या ओघात तो एक प्रसंग सांगतो की, ‘‘माझे वडील शाळेत शिक्षक आहेत. माझ्या एक शिक्षिका एकदा माझ्याकडं बघून बाबांना म्हणाल्या की, हा फार व्रात्य मुलगा आहे. तुम्ही याला ओळखता का? तेव्हा बाबा म्हणाले की, हा माझा मुलगा आहे. त्यावर माझ्या वडिलांना त्या म्हणाल्या होत्या, माफ करा सर, पण हा खरंच बेशिस्त मुलगा आहे. गेल्या वर्षी याच शिक्षिका माझ्या बाबांना भेटल्या तेव्हा त्या म्हणाल्या की, आता झाकीर खूप मोठा माणूस झालाय, खूप प्रसिद्ध झालाय.. हे दोन्ही प्रसंग माझ्या कायम लक्षात राहतात. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून मला आनंद आणि यश मिळतं. हा आनंद आणि सुख पैशांत विकत घेता येणार नाही. हा प्रवास मला खूप महत्त्वाचा वाटतो.’’ वडिलांविषयी असणारा आदर झाकीरच्या डोळ्यांतून जाणवत राहतो.

आपल्या पॅशनसाठी काम करणाऱ्या किंवा या क्षेत्रात येऊ  इच्छिणाऱ्या तरुणांना झाकीर कळकळीने सांगतो. ‘‘आईवडिलांना तुमचं आयुष्य बरबाद होऊ  नये असंच वाटतं. आपला मुलगा गिटार वाजवतो याचा आईवडिलांना त्रास नसतो, तर तो भविष्यात उपाशी राहणार नाही ना, याची काळजी त्यांना सतावत असते. तुम्ही तुमची पॅशन फॉलो करा, पण तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर अभ्यासाला प्राधान्य द्या आणि मग उरलेल्या वेळेत तुमच्या पॅशनकडं लक्ष द्यायला हवं.’’

‘द रायझिंग स्टार ऑफ कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो’ त्याने जिंकलाय. हा कॉमेडी शो जिंकल्यानंतर तुला कसं वाटलं होतं, असं जेव्हा झाकीरला विचारलं तेव्हा तो अगदी सहज हसत सांगतो की, चांगलं वाटलं होतं. फार काही वेगळं घडलं आहे असं काही वाटलं नव्हतं, कारण आजही माझ्या घरचे किंवा मित्रमंडळी आणि मीदेखील पहिल्यासारखंच वागतो. प्रसिद्धी मिळाल्यामुळं नातीगोती किंवा दोस्तीत काहीही फरक पडलेला नाही, हे झाकीर आवर्जून नमूद करतो. झाकीर लेखक, कॉमेडीअन, प्रेझेंटर आहे, पण लेखक म्हणून असणारी ओळख त्याला जास्त भावते. या प्रश्नाचं उत्तर तो त्याच्या खास शैलीत देतो, ‘‘मी कविताही लिहितो, गोष्टीही लिहितो, विनोदी शैलीत लेखन करतो. म्हणजे थोडं उपमेच्या भाषेत सांगायचं तर आपलं अग्रवाल स्वीट्ससारखं आहे हे. आता गोष्ट अशी की, आमच्याकडचे दहीवडे प्रसिद्ध झाले, पण याचा अर्थ असा नाही की, इथं गुलाबजाम केले जात नाहीत..’’ स्वत:च्या विनोदी शैलीतील लिखाणाबद्दल तो सांगतो, ‘‘स्टॅण्डअप कॉमेडी हा असा प्रकार आहे, जिथं विनोदनिर्मिती ही तुमच्याकडूनच होणं अपेक्षित असतं, कारण विनोद चोरला वगैरे असे आरोप होतात. हे एक प्रकारचं स्कॅण्डल आहे. त्यामुळं आम्ही सगळेच याबद्दल दक्ष असतो. आम्हाला स्वत:चं स्क्रिप्ट स्वत:च लिहावं लागतं. त्यामुळेच आम्ही कॉमेडीअन म्हणून वेगळे ठरतो.’’

हे झालं लिखाणाबद्दल, पण विनोदाचं सादरीकरण हेदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं प्रेक्षकांची पसंती लक्षात येते. ‘‘अनेकदा चांगले अनुभव येतात तशी काही वेळा शेरेबाजीदेखील केली जाते.’’ त्याविषयी तो सांगतो, ‘‘त्या वेळी काही सुचलं तर मी प्रत्युत्तर देतो. नाही देता आलं तर शेरेबाजी करणारा जिंकला, इतकंच. चटकन आणि योग्य पद्धतीनं व्यक्त म्हणजे क्रिकेटमधल्या बॉलिंग-बॅटिंगसारखं आहे. कधी तुम्ही षटकार मारता, पण कधी तुमची विकेटदेखील पडते.’’ झाकीर कबूल करतो. आयुष्यात येतील त्या त्या गोष्टी करत राहायची, झाकीरची वृत्ती आहे. तो असेच भारी परफॉर्मन्स करून लोकांना हसवत राहणार आहे. ‘‘नवीन सादरीकरण काय असेल, ते प्रेक्षकांना  कळेलच,’’ असं म्हणून झाकीर त्याच्या भविष्यातील प्रोजेक्ट्स तूर्तास गुलदस्त्यात ठेवतो आणि त्याच्या पुढल्या शोविषयी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो.

viva@expressindia.com