मासिक पाळीच्या त्या तीन दिवसांत सॅनिटरी नॅपकीनच्या किंमतीपेक्षा त्याचा वापर आरोग्यदायी कसा होईल, याची खरी म्हणजे चर्चा व्हायला हवी. दोन आठवडय़ांपूर्वी ‘वल्र्ड पीरिअड डे’च्या निमित्ताने ‘पाळीमिळी गुपचिळी’ या ‘व्हिवा’च्या लेखात आपण सॅनिटरी नॅपकिन कुठले?, कसे आणि का? वापरावेत याविषयी जनजागृती होण्याची गरज असल्याचे विशद केले होते. मासिक पाळीबद्दल त्या खुलेपणाने बोलू लागल्या असल्या तरी अनेक पातळींवर जो गोंधळ सुरू आहे तो सध्या सॅनिटरी नॅपकिन कुठल्याप्रकारचे वापरावेत, याबद्दल जास्त आहे. असे असताना मासिक पाळीसाठी सर्रास वापरण्यात येत असलेल्या मोठमोठय़ा कंपन्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्सवरच जीएसटीचा बोझा वाढवण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन्सला असलेले पर्याय आरोग्यदायी असले तरी परवडणारे नसल्याने त्याचा वापर अजून वाढत नाही आहे. तर दुसरीकडे त्यापेक्षा स्वस्त आणि सोयीचे म्हणत ज्या सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर जास्त आहे त्याच्याही किंमती वाढवल्याने महिन्याचे ते तीन दिवस आरोग्यदायी कसे असतील याचा विचार लांबच पडला आहे. त्याऊलट, पर्याय कोणताही स्वीकारा महिन्याचा तो खर्च खिशाला चाट लावणाराच ठरणार आहे ही भावना स्त्रियांच्या मनात घर करते आहे.

सॅनिटरी नॅपकीन हे मुलींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचेच आहे. मुळात सर्वात महत्त्वाची बाब ही की त्या दिवसात अजूनही सगळ्याच जणी सॅनिटरी नॅपकीन वापरतात असं नाही. ग्रामीण भागात अजूनही कपडय़ाचाच वापर केला जातो. कपडा वापरला तर विविध आजार होण्याची शक्यता असते. मात्र ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीन हे बऱ्याच जणींना मुळात माहितच नसतं म्हणून ते वापरले जात नाहीत. भारतात ८८ टक्के महिला अजूनही सॅनिटरी नॅपकीन वापरत नाहीत. आता तर त्यावरचा कर वाढवून ते वापरलेच जाणार नाहीत, याची तजवीज केली जाते आहे का?, सॅनिटरी नॅपकीन हे हायजिनसाठी महत्त्वाचे असतात. मग महिलांनी करवाढीमागचा उद्देश लक्षात घेऊन ते तीन दिवस महागडेच ठरतील, असे मानून पुढे जावे का?, अशा वेगवेगळ्या प्रकारे समाजमाध्यमांवरून या करवाढीविरोधात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सॅनिटरी नॅपकीन्सला पर्याय म्हणून पुन्हा एकदा कपडय़ाचे धुवून वापरता येण्याजोग्या नॅपकिन्सच्या वापराविषयी आवाहन केले जाते. अर्थात, हे नॅपकिन्स काही वेळेनंतर बदलावे लागतात जे दिवसभर कामावर जाणाऱ्या स्त्रियांना वारंवार शक्य होईलच असे नाही. हे कापडी पॅडही दीडशे ते दोनशे रुपयात दोन मिळतात. टॅम्पॉन्सही अनेकींकडून वापरले जातात मात्र तेही आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. टॅम्पॉन्स आतल्या आत स्त्राव रोखत असल्याने उपायापेक्षा अपाय जास्त असे बोलले जाऊ लागले आहे. सिलिकॉन कपचा पर्याय हा त्यातल्या त्यात सध्या आरोग्यदायी आहे मात्र त्याचा वापर अंगवळणी पडायला वेळ लागतोच शिवाय हा एक कप पाचशे रुपयांपेक्षा जास्त किमतीचा असल्याने तो सरसकट सगळ्यांना परवडणारा नाही. त्यामुळेच सहजी मिळणारे आणि त्यातल्या त्यात कमी किंमतीत उपलब्ध असल्याने सॅनिटरी नॅपकिन्सचाच वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. मात्र करवाढीमुळे त्यांचीही तुलना त्या महागडय़ा पर्यायांशीच होऊ लागली आहे.

याच कारणामुळे सॅनिटरी नॅपकिन्सवरच्या करवाढीविरोधात अनेक स्त्रियांनी समाजमाध्यमांवर आपला असंतोष वेगवेगळ्या मार्गाने प्रकट के ला आहे. सिंदूर, िबदी, बांगड्या यांवरचे कर काढून टाकले. मात्र सोयीचे, परवडणारे व निरोगी ठेवणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सवरच बारा टक्के कर का?, असा प्रश्न अनेकींनी उपस्थित केला आहे. त्यावर सिंदूर, बिंदी अशा गोष्टींवर करच नव्हता मग त्याची तुलना कशाला?, असे उलट प्रश्न केले जाऊ लागले आहेत. शिवाय, हा कर मल्टिनॅशनल कंपन्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्सवर आहे, घरगुती नॅपकिन्स बनवणाऱ्यांवर नाही, अशीही पळवाट काढली गेली आहे. पण प्रत्यक्षात कितीजणी घरगुती बनवलेले नॅपकिन्स वापरतात?, हा प्रश्न उरतोच. तरीही अनेकींनी समाजमाध्यमांतून यावर आपला विरोध करणे थांबवलेले नाही. काही स्त्रियांनी आम्ही लोकांना फक्त साडी नेसून हातात बांगड्या, कपाळावर टिकली व िबदी लावणाऱ्याच मुली वाटतो का? प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी महिला नक्कीच काटकसर व खर्च करत असतील. त्यात अति महत्त्वाची गोष्ट म्हणजेच सॅनिटरी नॅपकीनची आहे. आता त्यासाठी वेगळी काटकसर करायची वेळ का यावी?, अशा प्रश्नांचा महापूर आला आहे. अर्थमंत्री अरूण जेटलींना थेट याबाबत प्रश्न विचारण्यात आले. एका सामाजिक संस्थेने ‘लहू का लगान’ या कॅम्पेनद्वारे सॅनिटरी नॅपकीन करमुक्त करण्याची मागणी केली आहे. काही राजकीय पक्षांनीही ही मागणी उचलून धरली आहे. अर्थात, हा सगळा चर्चेचा धुरळा नॅपकिन्सच्या किंमतीबद्दल आहे. सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर जास्तीत जास्त आरोग्यदायी करण्यावर जो भर असायला हवा. ग्रामीण भागातील महिलांना नॅपकिन्सच्या वापराबद्दलची माहिती देऊन त्यांच्यापर्यंत हे सॅनिटरी  किंवा इकोफ्रेंडली नॅपकिन्सचे पर्याय त्यांना परवडतील अशा किंमतीत सहज उपलब्ध करून देणे ही आत्ताची गरज आहे. पण या करवाढीमुळे पुन्हा एकदा स्त्रियांच्या त्या तीन दिवसांतील आरोग्याचा प्रश्न तसाच राहिला असून मासिक पाळीचे डाग कपडय़ांवर पडू नयेत आणि आपले आरोग्यही जपले जावे यासाठी महागडे का होईना सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यावाचून सध्या पर्याय नाही..

viva@expressindia.com