News Flash

विदेशिनी: येस, यू कॅन..

नमस्कार मंडळी.. आमचं मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब.

श्रवणदोषावर मात करत, प्राणिप्रेमाचा वसा जोपासणारी डॉ. निवेदिता सांगतेय पशुवैद्यक म्हणून राजस्थानच्या खरेखडी या खेडय़ात काम करतानाचे तिचे अनुभव. निवेदिता सहा महिन्यांपूर्वी चिपळूणला पशुधन विकास अधिकारी म्हणून रुजू झाली आहे.
नमस्कार मंडळी.. आमचं मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. अडीच वर्षांची झाले तरी बोलत नसल्यामुळं मला डॉक्टरांकडं नेल्यावर श्रवणदोष hearing impaired असल्याचं निदान झालं. त्यानंतर आमच्या कुटुंबाचं आयुष्य बदललं. सगळे जण माझ्या स्पीच थेरपी आणि ट्रेनिंगमध्ये गुंतले. मला सर्वसाधारण मुलांच्या शाळेत घातलं गेलं. दुबईतल्या इंडियन हायस्कूल, पार्ले टिळक विद्यालय आणि गोकुळधाम हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झालं. सगळ्याच शिक्षकांनी आणि मित्रमैत्रिणींनी मला समजून घेऊन मदत केली. दहावीत ८४.६ टक्के मिळाले. ज्युनिअर कॉलेजला डी. जी. रुपारेल कॉलेज आणि B.V.Sc & AH (बॅचलर इन व्हेटर्नरी सायन्स अँड अ‍ॅनिमल हसबंड्री) आणि पुढं M.V.Sc. साठी बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मला नेहमीच ‘यू कॅन’ हेच शिकवलं गेलं. ‘यू कान्ट’ हे शब्द माझ्या शब्दकोशात नव्हतेच. कुठंही ‘बिच्चारी’ म्हणत माझ्यावर दया दाखवण्याचा प्रकार झाला नाही. कधी झालाच, तर त्याकडं दुर्लक्ष करून पुढं जाण्याचा निश्चय मनाशी झाला होताच; पण समाजात वावरताना कधीकधी आपल्याला दुखावणारे प्रसंगही येतात. माझ्या ताईचं ठरत आलेलं लग्न, मला नीट ऐकू येत नाही म्हणून मोडलं, तेही सुशिक्षित स्थळ असून. मला बॅचलर्सला ७६.६ टक्के गुण मिळूनही, याच कारणास्तव सुरुवातीला M.V.Sc.साठी प्रवेश नाकारण्यात आला. या गोष्टींनी खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. अपंगत्वाच्या भीतीपेक्षा माझ्या कर्तृत्वाचं कौतुक आहे, अशा घरात ताईचं लग्न झालं. तसंच M.V.Sc साठी प्रवेशासाठी पुन्हा अपील करून प्रवेश मिळाल्यावर ८४ टक्के गुण मिळवत मास्टर्स पूर्ण केलं.

लहानपणापासून मला प्राण्यांची आवड. तिसरीत रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पायाला लागलेलं पाहिल्यावर त्याला डॉक्टरांकडं नेण्याचा आग्रह मी धरला होता. तेव्हा बाबांनी माणसांच्या आणि प्राण्यांच्या डॉक्टरांमधला फरक सांगितला. आमच्या जवळपास त्या वेळी कुणीच प्राण्यांचे डॉक्टर नव्हते. तेव्हा मी प्राण्यांची डॉक्टर होऊन स्ट्रे अ‍ॅनिमल्सवर उपचार करण्याचा निश्चय केला. B.V.Sc&AH  च्या तिसऱ्या वर्षांपासून ते M.V.Sc. होईपर्यंत एका क्लिनिकमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून जात असे. मुंबईच्या उच्चभ्रू वसाहतीतले पाळीव प्राणी तिथं येत. माझा स्ट्रे अ‍ॅनिमल्सवर उपचार करण्याचा हेतू तिथं पूर्ण होणं शक्य नसल्यानं दुसरी नोकरी शोधावी लागली. नेटवर TOLFA हॉस्पिटलची माहिती मिळाल्यावर ई-मेलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी टेलिफोनिक इंटरव्हय़ूबद्दल कळवल्यावर माझी फोनवर बोलण्यातली अडचण सांगितली. मुलाखतीच्या वेळी त्यांनी मला विचारलेले प्रश्न बाबांनी मला सांगितले आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं थेट त्यांना दिली. माझ्याकडच्या महाराष्ट्र राज्याच्या रजिस्ट्रेशनवर राजस्थानात नोकरी करणं शक्य नव्हतं. त्यांनी दिल्लीत अखिल भारतीय रजिस्ट्रेशन करून घ्यायला सुचवलं. त्यानुसार रजिस्ट्रेशन करून काम सुरू केलं. मनासारखं काम मिळणं महत्त्वाचं असतं. या खरेखडी गावात मी नऊ महिने राहिले. इथली TOLFA (Tree Of Life For Animals) ही एनजीओ स्ट्रे अ‍ॅनिमल्ससाठी काम करते. रशेल राइट आणि जेम्मा सॅडलर या ब्रिटिश महिला ती चालवतात. मी तिथं निवासी डॉक्टर म्हणून काम करत होते. तिथल्या वॉर्डात जवळपास १५० कुत्रे-मांजरी, ५० गाई, १२-१५ गाढवं आहेत. त्यांची देखरेख आणि ओपीडीमध्ये येणाऱ्या प्राणी रुग्णांवर उपचार करणं, रात्री येणाऱ्या इर्मजन्सी केसेस पाहाणं माझं काम होतं.

खरखेडीतले गावकरी खूप चांगले, विनम्र, मेहनती आहेत. त्यांना प्राण्याविषयी प्रेम-आस्था आहे. रस्त्यावरच्या प्राण्याला रात्रीअपरात्री अपघात झाला तरी त्याला स्वखर्चानं घेऊन येतात. मी तिथली पहिलीच महिला डॉक्टर असल्यानं दूरदुरून लोक बघायला यायचे. कृषिप्रधानतेमुळं स्त्रियांचं शिक्षण यथातथाच. घरकामाखेरीज शेळ्या, गाई-म्हशी चरायला न्यायचं कामही त्यांचंच. त्यांना माझं विशेष अप्रूप वाटायचं. रविवारी मी फिरायला निघाल्यावर कुत्रे माझ्याबरोबर निघायचे बॉडीगार्डसारखे. ‘इफ यू कॅन अर्न फ्रॉम युवर हॉबी, यू विल बी नेव्हर रिक्वायर्ड टू वर्क फॉर अर्निग’. त्यामुळं चौदा तास काम करूनही दमायला होत नाही. बाकी वाचन आणि बॅडमिंटन खेळायला सवड होत नाही. घरी आल्यावर कामं आटोपताना टीव्हीवर इंग्रजी मालिका बघते. हिंदी-इंग्रजीच येत असल्यानं गावातलं मारवाडी बोलणं कळायचं नाही, पण प्राण्याला बघून कल्पना यायची. प्रसंगी साहाय्यकांनी भाषांतर करून सांगितल्यानं काहीही अडलं नाही. इथल्या गावकऱ्यांच्या मुंबई नि सिनेमाच्या भयंकर वेडामुळं त्याबद्दल जाणून घ्यायची दांडगी उत्सुकता असे. प्राण्यावर उपचार झाले, तरी लगेच जायचं नसायचंय. गावातल्याप्रमाणं मुंबईतही सगळे एकमेकांना ओळखतात, असा त्यांचा गैरसमज. एकदा एका छोटीनं शाहिद कपूरच्या लग्नाला तुम्ही जाणार ना, असा प्रश्न विचारत पुस्ती जोडली की, ‘आप को न्योता तो आया होगा और जाना तो पडेगाही. ’ नशीब मलाही घेऊन चला, म्हणून मागं नाही लागली. कारण तिथं आमंत्रण हे आप्तेष्टांसह असतं नि तिच्या मते ती माझी आप्तेष्टच होती. माझे सहकारी पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेले नसले तरी कामात निपुण होते. रात्री इमर्जन्सी आल्यास ते चौकशी करूनच मला बोलवायचे. रेचल मॅडमही माझी घरच्यासारखी काळजी घेत.

मी प्राण्यांना तपासायच्या आधी थोडा वेळ त्यांच्याशी बोलून त्यांना कम्फर्टेबल करते, कारण माणसांप्रमाणं तेही आजारपणामुळं नि हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळं धास्तावलेले असतात. एकदा वनविभागाच्या कर्मचाऱ्यानं ट्रकखाली आलेली वानरी आणली होती. वानर चावल्यानं रॅबीज होत असल्यानं तिचे चारी हातपाय एकेकानं धरले होते. त्यामुळं ती अधिकच चवताळून चावण्याचा प्रयत्न करत होती. मी तिच्याशी बोलायला लागले. तिच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. हळूहळू ती निवळली. मग सलाइन लावलं तिला औषध घालून. सलाइन संपेपर्यंत ती माझं बोट धरून बसली होती, लहान मुलं धरतात तस्सं. प्राण्यांच्या मनातला विश्वास, प्रेम, करुणा आणि कृतज्ञता त्यांच्या चेहऱ्यावर झळकते. त्यांचे एक्स्प्रेशन्स अनेक बॉलीवूड अ‍ॅक्टर्सपेक्षा स्पष्ट आणि जेन्युईन असतात. असे अनेक प्रसंग अनुभवले. एकदा ओपीडीमधून परतताना गेट उघडल्यावर माझं घर उजव्या बाजूला होतं. गेट उघडल्यावर ८-१० कुत्रे लाड करून घ्यायला माझ्यावर झेपावत. त्यांचे लाड केल्यावरच मला घरी जाता येई. माझी वाट बघत ते तिथंच बसून राहात. एकदा नवीन चावरा कुत्राही त्यांच्याबरोबर बसला होता. आत शिरल्याबरोबर तो मला चावायच्या उद्देशाने गुरगुरत धावला. त्या क्षणी बाकीच्यांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याला हाकलत डाव्या बाजूला नेऊन माझी वाट मोकळी केली. एका रात्री अपघातानं मरणासन्न अवस्थेतल्या कुत्र्याला आणलं गेलं. मी त्याच्यावर उपचार करून वॉर्डमध्ये भरती केलं. दोन दिवसांनी रजिस्टर घेण्यासाठी वॉर्डमध्ये गेले, तेव्हा दुसरे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. मी जवळून गेल्यावर शेपटी हलवायला लागला. दोन दिवसांत त्यानं हालचालही केली नव्हती, मग हे कसं झालं, असं त्या डॉक्टरांनी विचारल्यावर साहाय्यकांनी त्याच्या भरतीची गोष्ट सांगितली. त्यानं मला वासानंच ओळखून शेपटी हलवून अभिवादन केलं होतं.

इमर्जन्सीच्या वेळी प्राणी मरणाशी झगडत असताना आपला पाच मिनिटांचा उशीर त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळं कित्येकदा मी अध्र्या जेवणातून उठून गेलेय, कारण जीव वाचवण्याचा आनंद जेवणापेक्षा अधिक मोलाचा आहे; पण पुष्कळदा लोक पाळीव कुत्रा चार दिवस आजारी असूनही डॉक्टरांकडे नेत नाहीत. आणतात ते थेट इमर्जन्सीच्या वेळी.. अशा लोकांना इमर्जन्सीचं महत्त्व आणि डॉक्टरांच्या वेळेची कदर नसते. गावात विजेच्या लपंडावामुळं टॉर्च घेऊन उपचार करावे लागतात. इथं पहिल्यांदा एकटं राहायची वेळ होती. बाबा येऊन सगळी व्यवस्था बघून गेले होते. जवळपास काही उपलब्ध नसल्यानं अँब्युलन्सवाल्याला सांगून वस्तू मागवाव्या लागत. उंदीर किंवा सापाचं पिल्लू शिरलं तर काय करायचं, याची नो थिअरी, ओन्ली प्रॅक्टिकल करावं लागे! त्यामुळं कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास कमावला. सहकारी नि गावकऱ्यांचा आदर कमावला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रे अ‍ॅनिमल्सवर सेवाभावानं उपचार करण्याची संधी मिळाली. तिथल्या सहकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल आणि फोनच्या माध्यमातून अजूनही संपर्कात आहे.

मी M.V.Sc. साठी शोधनिबंध लिहित असतानाच ‘एमपीएससी’ची लेखी परीक्षा आणि मुलाखत दिली होती. त्यानंतर TOLFA मध्ये रुजू झाले. सहा महिन्यांपूर्वी माझं महाराष्ट्र शासनाची पशुधन विकास अधिकारी, गट अ म्हणून चिपळूणला पोस्टिंग झालंय. राजस्थानातल्या अनुभवाचा इथं काम करताना फायदा होणारेय. सरकारी क्लिनिकमध्ये येणाऱ्या पाळीव पशूंवर उपचार करणं, शेतकऱ्यांना पशुधनासंदर्भात मार्गदर्शन करणं, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणं, पशुधनाचा आनुवंशिक सुधार, साथीच्या रोगांना अटकाव, शवविच्छेदन, पाळीव प्राणी आणि वनविभागानं आणलेल्या प्राण्यांवर उपचार करावा लागतो. या जॉबमध्ये चार प्रोफेशनल परीक्षा प्रोबेशन काळात पास कराव्या लागतात. घरकाम आणि क्लिनिकमधल्या कामानंतर त्यांची तयारी सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत मी विविध प्रकारचे गोठे आणि त्यांचे प्रबंधने, वासरू संगोपन आदींविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय. एका मेडिको-लीगल पोलीस केसमध्ये मला शवविच्छेदन करावं लागलं. अशा प्रसंगी अनुसरायची पद्धत, गावकऱ्यांच्या गर्दीला पोलिसांच्या मदतीनं पांगवून शवविच्छेदन करण्याचा अनुभव वेगळा होता. इथं अजून अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोलची योजना सरकार, नगरपालिका किंवा एनजीओ राबवीत नाहीत. त्यामुळं भटक्या कुत्र्यांची संख्या आणि कुत्रे चावण्याचं प्रमाणही वाढतंय. भटक्या कुत्र्यांचं अ‍ॅण्टीरेबीज लसीकरण न झाल्यानं रॅबीजचा धोकाही वाढतो. स्ट्रे अ‍ॅनिमल्सबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा मानस आहे. आय कॅन डू इट..

– डॉ. निवेदिता बर्वे
चिपळूण
(शब्दांकन : राधिका कुंटे)

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2016 1:07 am

Web Title: yes you can
Next Stories
1 खाबूगिरी: ‘शोर्मा’ना क्या!
2 सौंदर्याची परिभाषा बदलतेय?
3 ट्रेण्डिंग: ‘मंडे ब्लूज’वरचे उतारे
Just Now!
X