‘आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवणार’, असा एक संवाद ‘पक पक पकाक’ चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांच्या तोंडी आहे. आयुष्याचे वाईटात वाईट चटके सोसलेला ‘भुत्या’ स्वत:ला अशा वाक्यांनी जिवंत ठेवत असतो, स्वत:ला जगण्याचं बळ देत असतो. आयुष्य सुंदर आहे हे सतत स्वत:ला बजावत राहून जगण्याची उमेद कायम ठेवणं हा एक प्रकारचा मानसोपचार आहे. निराश वाटत असताना या मंत्राचा नेहमीच उपयोग झाला आहे. याच धर्तीवर उगवलेली संकल्पना म्हणजे ‘योलो’. हा कोणता विशेष शब्द नसून ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ या इंग्रजी वाक्प्रचाराचा शॉर्टफॉर्म अर्थात संक्षिप्त रूप आहे.

याचा उगम विशेष करून तरुण रॅपर्सच्या गाण्यांमधून झाला आहे. ‘वी वॉन्ट टू डाय यंग’ म्हणणारे हे रॅपर्स त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात आणि गाण्यातही ‘योलो’चा वापर करताना दिसतात. तरुणांमध्ये ही संकल्पना भिनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एकदाच माणसाचा जन्म मिळाला आहे आणि त्यात आपल्याला हवं तसं जगून घ्या, असा  याचा साधासरळ अर्थ तरुणाईने लावला आहे. ‘योलो’च्या आधारावर एखादा कठीण निर्णय घ्यायलाही अनेकांना अनेकदा मदत होते. परिणामांची चिंता न करता किंवा कोणताही नकारात्मक विचार मनात न आणता हिंमतीने एखादी गोष्ट ‘ट्राय’ करण्यासाठी ‘योलो’चा नेहमीच आधार वाटतो. ‘जो होगा देखा जाएगा’ म्हणत धाडसी पाऊ ल टाकणाऱ्यांना ‘योलो’ प्रेरणा देतं. ‘रिस्क’ घेण्याची हिंमत आणि आयुष्य मनसोक्त जगण्याची गंमत ‘योलो’कडून मिळते. एकदाच मिळालेल्या या आयुष्याबद्दल वाटणारी कृतज्ञताही अनेकदा याच भावनेतून जन्माला येते. अनेक जन्म आणि त्यानंतर मिळणारा मनुष्यजन्म या भारतीय तत्त्वज्ञानावर कदाचित तरुणाईचा विश्वास नसेल; पण मिळालेलं आयुष्य पुन्हा मिळणार नाही हे तरुणाईलाही मान्य आहे. त्यामुळे आहे त्या जन्मात चांगलं कर्म करा हे पटत नसलं तरी आहे त्या जन्मात निदान स्वत:साठी तरी चांगलं काही करावं यावर तरुणाई आणि तत्त्वज्ञान यांचं एकमत नक्की आहे.

फक्त ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ आणि ‘माय लाइफ, माय रूल्स’ यात एक बारीक सीमारेषा आहे; कदाचित तीच सीमा जी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये आहे. एकदाच जगायचं आहे आणि ‘यंग डेथ’ हवी आहे म्हणून कोणत्याच चुकीच्या गोष्टींना किंवा व्यसनांना ‘योलो’चं लेबल लावता येणार नाही. कोणत्याही संकल्पनेचा अतिरेक आणि त्या बाबतीतली टोकाची भूमिका हे ‘एकदाच मिळालेलं’ आयुष्य उध्वस्त करू शकते, याचे भान तरुणाईला आहे हेही नसे थोडके!

viva@expressindia.com