News Flash

‘तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव जास्त आहे..’

तरुणांना कोणत्याही कामाकडे वळवणं, त्यात बांधून ठेवणं हे तसं सोपं काम नव्हे हे ती मान्य करते.

तरुण पिढीचा उत्साह, त्यांची सळसळती उर्जा, त्यांचे सतत बदलणारे विचार, नवनविन संकल्पना हे सगळं त्यांच्या आईवडिलांच्या पिढीला जितकं भावतं तितकंच आपल्या अगदी मागच्या पिढीलाही तो बदल नेमका काय आहे हे समजून घेण्यात रस असतो. फॅ शन, गॅझेट्स, कॉर्पोरेट संस्कृती यात अडकलेली तरुण पिढी नक्की काय करते? कशात रमली आहे?, ती आपल्या सामाजिक जाणीवांपासून दूर आहे, असे एक ना अनेक प्रश्न आणि तक्रारींचे सूर उमटत असतात. मात्र याच पिढीबरोबर एकीकडे ग्लॅमरच्या जगात तर दुसरीकडे ‘पानी फाऊंडेशन’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील गावोगावच्या तरुणांबरोबर काम करणाऱ्या दिग्दर्शक किरण रावचा तरुण पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आहे. वेगळा आहे आणि तो तिच्या अनुभवातून आला असल्याचं ती स्पष्ट करते.

तरुणांना कोणत्याही कामाकडे वळवणं, त्यात बांधून ठेवणं हे तसं सोपं काम नव्हे हे ती मान्य करते. त्यांच्याभोवताली असलेली सततची स्पर्धा आणि ताणतणाव पाहता त्याही परिस्थितीतही ते उत्साहाने, उर्जेने भारलेले असतात याबद्दल तिला नवल वाटतं. ‘मी फार कमी फिरते, पण मी जेव्हा ग्रामीण आणि शहरी भागात फिरले तेव्हा ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणांमध्ये मला एक वेगळा उर्जा स्रोत दिसला. शहरी भागात तरूणांसाठी सगळं सहज उपलब्ध आहे, पण ग्रामीण भागात कित्येक गोष्टी अगदी जीवनावश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मिळवण्याची त्यांची धडपड जास्त महत्वाची वाटते’, असं ती म्हणते. शहरात खूप संधी उपलब्ध असतानाही तरुणांना त्याचा लाभ होत नाही. कित्येकवेळेला असं होतं की फार चांगली हातची संधी निघून जाते. त्यामुळे त्यांनी सतत सतर्क राहिलं पाहिजे, हे स्पष्ट करताना सामाजिक कार्याची ओढ शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडच्या तरुणांमध्ये आहे हेही ती स्पष्ट करते.

धावपळीच्या या जगात एकटी तरुण पिढी नाही तर त्यांच्या मागची आमची पिढीही अडकली आहे. मात्र ते या परिस्थितीतून चांगल्या पध्दतीने बाहेर पडतील, काही नवे बदल करतील, अशी आपल्याला अपेक्षा आहे असं ती म्हणते. या अपेक्षेमागचं कारण स्पष्ट करताना या पिढीमध्ये एकजूटीची भावना अधिक असल्याचं तिने सांगितलं. तरुण पिढी कठीण प्रसंगातही एकमेकांचे घट्ट हात धरू न उभी राहते. पुढे येणारी स्पर्धा, संकटे यांची त्यांना पुरेपूर जाणीव आहे त्यामुळे अशा परिस्थिीतीत कुठलीही आर्थिक-धार्मिक समीकरणे मध्ये न आणता एकत्र काम करण्यावर त्यांचा भर असल्याचे निरीक्षण किरणने नोंदवले. ‘शहरी भागातील तरुणांना ग्रामीण भागातील तरुणांशी जोडून घ्यायला आवडतं. त्यामुळे एक खूप मोठं व चांगलं नेटवर्क येत्या काळात तयार होईल. त्यासाठी आम्ही तरुणांना नेहमीच प्रोत्साहित करत राहू’, असं सांगणारी किरण कधीकधी त्यांना या प्रोत्साहन देण्याचीही गरजही भासतं नाही इतकी ती स्वत:हून मदतीसाठी तयार होतात, असा आपला अनुभव असल्याचे सांगते. या पिढीला सामाजिकच नव्हे तर कसलीच जाणीव नाही किंवा बांधिलकी नाही, असं तुम्ही म्हणूच शकत नाही.  संकट आलं तर कुठल्याही परिस्थितीत ही मंडळी मोठं काम उभारतील, असा विश्वास तिने व्यक्त केला.

फॅशनेबल किरण

किरण राव हे बॉलीवुडमधलंही एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. तिच्या जगावेगळ्या कामाच्या आणि विचार करण्याच्या पध्दतीप्रमाणेच तिचा पेहरावही युनिक आहे. ‘सिंपल बट एलिगन्ट’ अशी तिची फॅशन नेहमीच पाहणाऱ्याला आकर्षित करते. ती नेहमीच खादी, कॉटन या पठडीत बसणारे ऑथेन्टिक स्टाईलचे ड्रेस घालणं जास्त पसंत करते. साधारणत: अपारंपरिक म्हणजे ऑफबीट तरीही तिच्या पर्सनल स्टाईलने भारतीय स्त्रीची प्रतिमा जोपासणारी आणि प्रत्येक स्टाईल ट्राय करणारी परफेक्ट फॅशन सेन्स असलेली ‘ब्युटिफुल लेडी’ अशा उपमाही तिला मिळतात. तिची फॅशन ही अगदी साधी तरीही वेगळ्या फॅशनची असल्याने आपल्यालाही तिची फॅशन फॉलो करण्याचा मोह आवरत नाही. सहज जमणारी व कम्फर्ट मिळवून देणारी फॅशन ज्यात हलकीफुलकी रंगांची कॅमेस्ट्री असेल अशा स्टाईलचे ड्रेस किरणने ट्राय केले आहेत. किरण आत्तापर्यंत ‘रॉ मॅन्गो’, ‘पेरॉ’, ‘एका’ या ब्रॅन्ड्सचे कपडे जास्त वापरते. त्यातून तिचा आवडीचा ब्रॅंड ‘नॉर ब्लॅक नॉर व्हाईट’ हा आहे. इंडियन वेअरमध्ये तिने नेहमीच साडीला महत्त्व दिलंय. त्यातही गोल्ड बॉर्डर, पॅचवर्क आणि सिल्क साडीला ती जास्त प्राधान्य देते. ब्लाऊ जमध्येही ती हाय नेक ब्लाऊ ज, मेगा स्लिव्हलेस, क्रॅप टॉप पसंत करते. कॉटन, सिल्कबरोबरच तिने झारी, वूलनचे फॅब्रिकसही ट्राय केले आहेत. तिचा भर दाक्षिणात्य लुकपासून तिकडच्या फॅब्रिकवरही असतो. सतत काहीतरी वेगळं परिधान करण्याचा तिचा आग्रह, तिची सवय यामुळे ती बॉलीवुडच्या ग्लॅमर गर्दीतही उठून दिसते. तिचा वेगळेपणा तिच्या पेहरावातूनही अचूक उमटतो. त्यामुळे एका अर्थी ती मिसेस परफेक्शनिस्ट आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:09 am

Web Title: young people feel more about social commitment says kiran rao
Next Stories
1 ‘बुक’ वॉल
2 ‘जग’ते रहो : अमाप निसर्गसौंदर्य आणि इतिहासाच्या पाऊलखुणा
3 ‘कट्टा’उवाच : थ्रोबॅक
Just Now!
X