वेदवती चिपळूणकर

आजकाल पिढी दर पाच वर्षांनी बदलते असं म्हणतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे झपाटय़ाने बदलतं तंत्रज्ञान, वेगाने त्याचा होणारा प्रसार आणि प्रत्येक पिढीचे बदलत चाललेले विचार! जसजसे विचार बदलत आहेत तसतसे तरुणाईचे दृष्टिकोन आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत. सरधोपट मार्गाच्या बाहेर जाऊन वेगळ्या वाटेने जाण्याची हिंमत करणाऱ्या या तरुणींनी आपली जीवनपद्धती अर्थात लाइफस्टाइल आपल्या मनाला रुचेल, पटेल आणि आवडेल अशी डिझाइन केली आहे. करिअरचे निर्णय घेण्यापासून ते एन्जॉयमेंटच्या संकल्पनांपर्यंत आणि लग्नाच्या निर्णयांपासून ते एकटं स्वतंत्र राहण्याच्या हट्टापर्यंत सगळ्याच गोष्टीत मुली मागच्या पिढीपेक्षा वेगळा विचार करताहेत. आपला निर्णय चुकला तरी त्याची जबाबदारी घ्यायची तयारीही मुली दाखवत आहेत आणि इतरांना न पटणारा, मात्र स्वत:ला योग्य वाटणारा, निर्णय धडाडीने घेऊन तो निभवायचा पूर्ण प्रयत्नही मुली स्वबळावर करत आहेत. लाइफस्टाइल म्हणजे मुळातच केवळ फॅशन आणि फिटनेस नव्हे. काही वर्षांपूर्वीपर्यंत काळ्या पिशवीत बांधून घरी आणले जाणारे सॅनिटरी नॅपकिन्स आता मुली हातात घेऊन फोटो काढताहेत आणि सोशल मीडियावर आपली मतं उघडपणे व्यक्त करताहेत. समाजात आणि समाजमाध्यमांवर अशा दोन्हीकडे वावरायचे मुलींचे ठोकताळे बदललेले आहेत. कौमार्य चाचणीसारख्या विषयांवर जाहीरपणे मुली जहरी टीकासुद्धा करताहेत. राजकारण, समाजकारण, जातीयवाद अशा ज्वलंत आणि वादग्रस्त विषयांवरही त्या स्पष्टपणे आणि निर्भीडपणे फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताहेत. या सगळ्याचं सार असं की, मुली आता व्यक्त व्हायला चाचरत नाहीत आणि स्वत:चं व्यक्तिस्वातंत्र्य त्या स्वत:च स्वत:साठी लढून मिळवताहेत. यासाठी नेहमीपेक्षा काही वेगळे मार्ग अवलंबावे लागले तरीही त्या मागेपुढे पाहत नाहीत.

स्वत:चं करिअर स्वत: निवडणं हे कधीकाळी निषिद्ध मानलं गेलेलं स्वातंत्र्यही मुली काही प्रमाणात सहज तर काही प्रमाणात झगडून मिळवताहेत. वाइन टेस्टिंगपासून बारटेण्डिंगपर्यंत आणि ट्रेकिंगपासून सायकलिंगपर्यंत ज्यात कधीकाळी केवळ पुरुषांची मक्तेदारी मानली जायची त्या सगळ्या क्षेत्रांत मुली आवडीने आणि पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या दिसतात. ज्या विषयांचं मुलींना आकलन होणार नाही असा कधीकाळी सर्वसाधारण समज होता त्या सगळ्या विषयांत त्यांनी स्वत:चं प्रावीण्य सिद्ध करतायत. मुलींच्या ड्रायव्हिंगची कधीकाळी फक्त थट्टा होत असताना आज त्या टॅक्सी सेवा देऊ  लागल्या आहेत. मुली पाण्यात खोलवर डायव्हिंगही करताहेत आणि उंच आकाशात विमानासह भरारीही घेताहेत. आता तर भारतीय वायुसेनेनेही मुलींच्या हातात लढाऊ  विमानांची धुरा दिली आहे. आपल्या आवडीचं क्षेत्र निवडून त्यात काही ‘करून दाखवण्या’चा मुलींचा दृष्टिकोन हा नक्कीच एक सकारात्मक बदल म्हणता येईल. आजूबाजूच्या चार मुली करत नसलेल्या वेगळ्या गोष्टी आपल्याला आवडताहेत म्हटल्यावर त्याने कमीपणा न वाटता उलट हे ‘आऊट ऑफ द बॉक्स’ असणं आजकाल मुली एन्जॉय करायला शिकल्या आहेत.

आपल्या आयुष्यातले सगळे मोठे निर्णय स्वत:च्या विचारांनी आणि आत्मविश्वासाने घेण्याची धमक मुलींमध्ये आलेली असताना लग्नासारख्या मोठय़ा बाबतीत त्या मागे कशा राहतील! आपला जोडीदार कसा असावा, त्याने आपल्याशी कसं वागावं, त्याने आपल्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत अशा सगळ्या गोष्टींचा विचार स्वत: करून मुली आपल्या लग्नाचा विचार करतात. मग लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, मुलींच्या संकल्पना आणि अपेक्षा स्पष्ट असतात आणि त्यानुसार त्या आपले प्राधान्यक्रम ठरवत असतात. सगळ्या विचाराअंती आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णयही मुली ठामपणाने घेतात.

या सगळ्यात एक बाब महत्त्वाची म्हणजे मुलींनी स्वत:च्या घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे काही विचार आणि काही सबळ कारण नक्कीच असतं. त्यांच्या दृष्टीने ती कारणं योग्यही असतात आणि त्यामुळे निर्णयावर ठाम राहायला मुलींना काहीच अडचण येत नाही. मात्र सगळ्याच मुलींच्या बाबतीत हे स्वातंत्र्य अवलंबलं जातंय का, सगळ्याच स्तरांतील सगळ्याच मुलींना आपले निर्णय घेण्याचा अधिकार दिला जातोय का, सगळ्या मुलींमध्ये तेवढा आत्मविश्वास आहे का?, हे आणि असे अनेक प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत. परंतु काही प्रमाणात का होईना मुली स्वत:बद्दल विचार करायला शिकताहेत. आपण स्वत: एक विचार करण्याचा विषय आहोत याची जाणीव हळूहळू का होईना त्यांच्यात रुजते आहे. हेच अनेक सकारात्मक बदल सध्या असलेल्या ‘हटके’ किंवा ‘आऊट ऑफ द बॉक्स’ या गटातून अंगवळणी पडलेल्या सवयींच्या गटात जातील तो खराखुरा सेलिब्रेशनचा दिवस!

viva@expressindia.com