25 November 2017

News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : पापा कहते हैं..

खरं तर मुलगा जन्माला येतो तेव्हा अगदी आनंदोत्सव साजरा केलं जातो.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: July 7, 2017 12:35 AM

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं?

बीएच्या दुसऱ्या वर्षांला असलेला चेतन आणि त्याची आई, दोघेही काहीसे टेन्स होते. चेतनच्या आणि त्याच्या बाबांच्या रोजच्या वादविवादांना आई कंटाळली होती. वाद तिचेही व्हायचे चेतनशी, नाही असं नाही. पण आजकाल का कोण जाणे, बाबांना त्याचं काही म्हणता काही पटत नव्हतं. साधं काही तरी बोलायला सुरुवात झाली तरी त्याचं पर्यवसान भांडणात व्हायचं. आईची मध्यस्थी करताना पुरेवाट व्हायची. मग जितकं शक्य होईल तितका चेतन बाबांना टाळायचा प्रयत्न करायचा. काही निरोप सांगायचा झाला तर तो आईतर्फे सांगायचा, जेवणाचं ताट रूममध्ये घेऊन जायचा, असं काही तरी करायचा. बाबांचा राग मग आणखीनच वाढायचा.

बारावीला तसे चांगले मार्क्‍स पडले होते त्याला. पण त्यानं ठरवलं होतं स्पर्धा परीक्षा द्यायच्या. म्हणून बीएला अ‍ॅडमिशन घेतली. बाबांना हे काही फारसं पटलं नव्हतं. त्यावरून नेहमी वाद व्हायचे. शिवाय त्याची अस्ताव्यस्त रूम, जुने, फाटके कपडे घालणं, उशिरा उठणं, वाट्टेल तेव्हा खाणं अशा एक ना अनेक गोष्टी असह्य़ व्हायच्या त्यांना.. किती नाही म्हटलं तरी ‘आम्ही तुझ्या वयाचे असताना..’ असा डायलॉगही यायचा अधूनमधून तोंडात. ‘अरे काही तरी शिस्त लाव स्वत:ला, जरा घराकडे लक्ष दे, आईला मदत कर’ ते चेतनला सांगायचा प्रयत्न करायचे.

चेतनला आठवलं, ‘लहानपणी आपण किती मज्जा करायचो. बाबा रात्री कितीही दमून आले तरी त्यांच्याबरोबर कुस्ती ही ठरलेली. तेही कौतुकानं सहन करायचे सगळं. पसारा करणं हे तर आमचं सिक्रेट असायचं आईपासून लपवलेलं. रविवारी टेकडी चढताना रेस लावायची तर बाबांबरोबरच. आणि आईच्या विरोधाला न जुमानता अधूनमधून हॉटेलमध्ये जाऊन किती चिकन हादडायचो. आई तेव्हा नेहमी म्हणायचीसुद्धा, ‘अगदी एकाला झाकावं आणि एकाला काढावं इतके सारखे आहात तुम्ही दोघे.’ अजूनही बाबांच्या आणि आपल्या सवयी किती सारख्या आहेत. पुस्तकांपासून ते मूव्हीजपर्यंत. पण झालंय काय आजकाल? धड एकही शब्द एकमेकांशी सरळ बोलता येत नाही आपल्याला!’, खूप गोंधळला चेतन. म्हणून माझ्याकडे आले दोघं.

खरं तर मुलगा जन्माला येतो तेव्हा अगदी आनंदोत्सव साजरा केलं जातो. वंशाचा दिवा, कुलदीपक, घराण्याचं नाव चालवणारा राजकुमार अशी अनेक विशेषणं त्याला लावली जातात. मग नव्याची नवलाई संपते. बाबा कामाला जायला लागतात. मुलगा हळूहळू मोठा होतो. संध्याकाळी कामावरून दमून आल्यावर मुलाबरोबर बोलणं काय होतं तर ‘अभ्यास केलास का? आणि आईला त्रास दिला नाहीस ना?’ हसणं, खेळणं विसरून जायला होतं. मुलगा वयात यायला लागतो, उद्धट, उर्मट उत्तरं द्यायला लागतो. स्वतंत्र होण्याची स्वप्नं बघायला लागतो. निसर्गाला हवं असतं हे स्वातंत्र्य. त्याशिवाय शिकणार कसे तुम्ही या जगात एकटे राहायला? हे बदललेलं समीकरण पटायला जड असतं आईबाबांना. गप्पाबिप्पा राहतात बाजूला, फक्त वाद सुरू होतात. शिवाय स्वत:च्या मनातलं प्रेम शब्दांत सांगायची सवय कुठे असते बाबांना? सतत कमावत्या माणसाच्या, बॉसच्या भूमिकेत राहणं त्यांच्यासाठीही काही फार आनंदाचं नसतं. हवेहवेसे वाटणारे बाबा टाळावेसे केव्हापासून वाटायला लागले? नक्की कधी बदलायला लागलं हे नातं? लक्षातही येत नाही.

बाप-मुलाच्या नात्यावर खूप संशोधन-अभ्यास झालाय. त्यांच्या ताणलेल्या नातेसंबंधांना इडिपस कॉम्प्लेक्स, सत्तेसाठी, पॉवरसाठी स्ट्रगल अशी कारणंही दिली गेलीयेत. संवादाचा अभाव हे एक मोठं कारण असावं असंही वाटतंय. शिवाय आपली पारंपरिक पद्धत अशी की पुरुषांनी बाहेर जाऊन काम करायचं आणि बायकांनी घरी राहून मुलांकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे वडिलांचं काम काहीसं िरगमास्तरसारखं झालंय.

आजची जनरेशन या गोष्टी काही प्रमाणात दुरुस्त करायचा प्रयत्न नक्कीच करतेय. आजचे बाबा त्यांच्या कठोर मुखवटय़ातून बाहेर येतायत. मुलांना फक्त धाकात ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी खेळलं तर जास्त मजा येते हे ते अनुभवतायत. वयात येताना, मोठे होताना मुलांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करतायत. काही वेळा अलगद आईच्या भूमिकेतही शिरतायत. मनातून मुलांवर कितीही प्रेम करत असलो तरी ते शब्दांतून, कृतीतून त्यांच्यापर्यंत पोचवायला लागतं हे त्यांच्या लक्षात यायला लागलंय.

चेतनला त्यांची ही बाजू समजून घ्यायला लागेल. हळूहळू त्यांच्याशी संवाद साधायला लागेल. आपल्या वागण्याचा रिव्ह्य़ू घ्यायला लागेल. आणि हो, यातूनच आपण बाबा झाल्यावर कसं वागायचं यावरही त्याचा विचार होईलच.

viva@expressindia.com

First Published on July 7, 2017 12:35 am

Web Title: youngsters stress issue study stress