07 July 2020

News Flash

नवविचारांचा श्रीगणेशा..

सेट डिझायनर आणि आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटीलने यंदाच्या गणपतीत नवा उपक्रम हाती घेतला

गायत्री हसबनीस

स्वत:च्या हातातली कामं सांभाळून आजची तरुणाई मोठय़ा कल्पकतेने, सकारात्मक दृष्टिकोनातून आणि नवं काही करण्याच्या ध्यासातून गणेशोत्सवात सहभागी होताना दिसली. गणेशोत्सव म्हणजे नुसतीच धांदल, नाच अशा विचारांना बाजूला सारत आपल्या अंगी असलेल्या कलेतून या उत्सवात वेगळं काय करता येईल, या प्रयत्नात असलेल्या काही वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या, विचारांच्या तरुणाईने केलेले काही आगळेवेगळे प्रयोग..

गणपतीत सजावट, मखर, उंच गणपतीची मूर्ती, मोठा सेट, गणपतीला दागिने-प्रसाद याच्या तयारीतच खरं म्हणजे अनेकांचा उत्सव निघून जातो. मात्र खऱ्या अर्थाने हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही अवली तरुणांनी कधी कलेची, कधी इतिहासाची, कधी सामाजिक तर कधी पर्यावरणीय बांधिलकीचे भान जपत काही नवे प्रयोग करून पाहिले आहेत.

स्वत: रिसर्च स्टुडंट, सेट डिझायनर आणि आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटीलने यंदाच्या गणपतीत नवा उपक्रम हाती घेतला. त्याने त्याच्या गणपती मंडळात एकूण आठ गणपती तयार केले जे कोणत्याही मूर्तिकाराने केलेले नसून अ‍ॅसिडग्रस्त माहिलांनी ते बनवले आहेत. या आठ गणपतींपैकी प्रत्येक गणपती वेगळ्या विचारांनी तयार केलाय. त्यातला एक गणपती माचिसच्या काडय़ांपासून बनवलेला आहे. दुसरा गणपती मेणबत्त्यांचा आहे. यामागे मेणबत्त्याप्रमाणे दीप उज्ज्वल करणारी स्त्रीच असते, असा विचार मांडला आहे. भट्टीतून बाहेर आलेल्या मातीच्या तिसऱ्या गणपतीतून स्त्रीही याच मातीप्रमाणे कणखर असते, हे सूचित के लं आहे. चौथा गणपती शिवणकामातून केलाय तर पाचवा गणपती पृथ्वीच्या आकाराचा तयार केला असून त्यावर ‘कंट्रोल’ किंवा ‘डिलिट’ ही दोन बटणं ठेवली आहेत. म्हणजे एक तर निसर्ग जगवा किंवा नष्ट करा, हा विचार त्यात आहे. सहावा गणपती शेणाचा आणि सातवा गणपती पाण्याखाली जगणाऱ्या जीवांवर होणाऱ्या अ‍ॅसिडच्या परिणामावर आधारित आहेत. आठवा गणपती हा आरशांचा बनवला आहे म्हणजे अ‍ॅसिडग्रस्तांनी जरी चेहऱ्याची ओळख गमावली तरी आरशात पाहण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. त्यातून या सर्व मूर्तीसाठी रंग न वापरता गेरू, शेण, झेंडूची फुले, काडय़ा, बियाणे यांचा वापर त्याने केला आहे. याबद्दल सुमित म्हणतो, ‘याआधी मी तृतीयपंथी समाजाकडून तसेच अंध व्यक्तींकडून गणपती बनवून घेतले आहेत. या वर्षी मी अ‍ॅसिडग्रस्त तरुणींची भेट घेतली. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याची ओळख पुसली जाते मात्र त्यांच्या अंगी असलेली कला, नैसर्गिक गुण यांच्या जोरावर त्या आपली ओळख परत मिळवू शकतात, हा विचार यामागे आहे. या उपक्रमाला ‘संजीवनी’ असे नाव देऊन त्यासाठी गेले सहा-सात वर्षे काम करतोय. याच नावाने अ‍ॅप तयार केले असून कुठल्याही कारणाने त्यांना असुरक्षित वाटलं तर या अ‍ॅपच्या माध्यमातून एक मेसेज जवळपासच्या पोलिसांना लगेच पोहोचतो. या अ‍ॅपचे नियंत्रण सहज व्हावे यासाठी लॉकेट किंवा ब्रेसलेट तयार केले असून त्यातून ते कार्यरत करता येऊ शकते. या अ‍ॅपसाठी इंटरनेटचीही गरज नाही कारण हे अ‍ॅप ‘जीपीएस’वर चालते. त्यामुळे यंदाच्या गणशोत्सवात मिठाई, सजावट याला महत्त्व न देता प्रसाद म्हणून विविध मंडळांना आणि स्त्रियांना हे अ‍ॅपच दिलेय,’ असे त्याने सांगितले. सामाजिक संबंध सणांतून टिकले जावेत यासाठी सुरू असलेल्या सुमितच्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी.

गणपतीचे रूप जसे मूर्तीतून म्हणजेच शिल्पकलेतून प्रतीत होते तसेच ते अक्षरकलेतूनही प्रतीत होते. तरुणांना काही तरी वेगळे करावेसे वाटतच असते पण कधी कधी लहाणपणी अनुभवलेली कला मोठेपणी कुठे तरी हरवल्यासारखी वाटते. मग काही काळाने त्याचा शोध घेतला जातो. गणशोत्सवात गेली सात वर्षे अक्षरातून गणपती साकारण्याचे काम करतो आहे आर्किटेक्चर शिकत असलेला वैभव शिंदे. दर वर्षीच्या गणपती उत्सवात ‘अक्षरगणेशा’द्वारे गणपतीचे रूप त्याच्या अक्षरकलेतून सादर करतो. व्यक्तींच्या नावातून, विविध भाषांमधून तो अक्षरगणेश काढतो. ‘मुळात स्वत:चे नाव आपण चित्राच्या रूपात सहसा पाहत नाही. माझे सुंदर छायाचित्र काढले तर माझा आनंद गगनात मावेनासा होईल, मग माझ्या नावातल्या अक्षरावर कोणी प्रयोग करून त्यातले सौंदर्य वाढवले तर त्यातून मिळणारा आनंद हा माझ्या सुंदर छायाचित्रापेक्षाही दुप्पट असेल म्हणून अक्षरगणेशाची संकल्पना माझ्या मनात आली. मी आत्तापर्यंत असे सात हजारपेक्षाही जास्त अक्षरगणेश साकारले आहेत,’ असे वैभवने सांगितले. तो अकरावीत असल्यापासून ही कला जोपासतोय. त्याच्या मते तरुणांकडून या क लेला आणि कलाकारांना आदर मिळतोय. आजची पिढी आत्मकेंद्रित आहे, त्यांच्या या स्वभावाचा सकारात्मक विचार करत त्याने त्यांचे नाव गणेश रूपात चितारत त्यांच्यासमोर ठेवले. ते पाहिल्यावर त्यांना होणारा आनंद हा फेसबुकवर डीपीला येणाऱ्या लाइक्सपेक्षाही जास्त असतो असा त्याला अनुभव आहे. ‘अक्षरातून एक रूप डोळ्यांसमोर येणार तेही गणपतीचे.. हे अक्षर गणेश साकारण्यातले मोठे आव्हान असते. कारण गणपतीचे उदर, हात, पाय, कान व सोंड या गोष्टी शिवाय त्याचे दागिने यांना गणपतीच्या रूपात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ते अक्षरातून चित्रित करताना अक्षरांचे जे वळण आहे ते लक्षात घ्यावे लागते. अक्षरातून तयार होणाऱ्या भल्यामोठय़ा शब्दांचीही गंमत असते. आता मी नावातून गणपती काढतो तर काही वेळेस गंमत अशी होते की व्यक्तींची नावे लहान-मोठी असतात. मग त्यातील अक्षरांच्या साइझचा विचार करण्यापेक्षा मी त्यातले कोणते अक्षर मला जास्त हायलाइट करता येईल त्याचा विचार करून मी अक्षरगणेश साकार करतो,’ असे तो सांगतो. वैभवने ही कला सोशल मीडियावरूनच आत्मसात केली. समाजमाध्यमांवरून अक्षरगणेश कसा काढायचा हे तो शिकत गेला.

शेफ असलेला महेश बनकर हा तरुण गेली दोन वर्षे इकोफ्रेंडली गणपती बनवण्यासाठी प्रेरित करतोय. त्याची शैली मात्र इतर पर्यावरण संवर्धक गणपतींपेक्षा वेगळी आहे. यंदाही त्याने नवा उपक्रम हाती घेतलाय. दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात त्याने ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण आणि जलप्रदूषण यातून किती घातक परिणाम होतात याचे प्रदर्शन भरवले होते. त्यातून जागरूकताही साधली त्याचबरोबरीने लोकमान्य टिळकांच्या काळात गणपती मंडळ कसे असायचे, तेव्हा काय करायचे, मंडळांची नावे कशी पडली याची माहितीही दाखवण्यात आली होती. ‘गणपतीत तरुणांचा त्यांच्या सुहृदांशी संवाद कमी झाला आहे त्यामुळे गणपती उत्सव नक्की कसा असतो याबद्दल कमी चर्चा होताना दिसते. त्यामुळे पर्यावरणासह उत्सवाची जाणीव करून देण्याची गरज होती ती आम्ही प्रदर्शन, देखाव्यांच्या माध्यमातून करतो,’ असे महेशने सांगितले. यंदाच्या वर्षी त्याने गणपतीचे रूप इकोफ्रेंडली पद्धतीने कसे साकारायचे याबद्दल प्रबोधनाचे काम केले. ‘रंगीत पेपर, काचेची बाटली, उरलेले कापड, रद्दीच्या मदतीने इकोफ्रेंडली गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याची माहिती घराघरांतून आम्ही दिली. गणपतीसाठी भलामोठा सेट, महागडे डेकोरेशनच हवे असते पण आता डेकोरेशनची फॅशनही इकोफ्रेंडली असायला हवी हा विचार रुजतो आहे. इकोफ्रेंडली गणपतीची ही साखळी वाढतेय. उदाहरण म्हणजे पीओपीचा गणपती बंद करा असे सांगूनही लोकांना ते पटत नव्हते. समुद्रात पीओपीचे गणपती विसर्जित केले तर पाण्याचे जे काही स्रोत जे समुद्राला जोडलेले (पान २ वर) (पान १ वरून) असतात ते ब्लॉक होतात. मग पाणी मिळू शकत नाही हे कळल्यावर लोकांनी घरीच गणपती विसर्जित करायला सुरुवात केली. अशा प्रकारचे मुद्दे धरून आम्ही गणपतीत कार्यशाळा घेतो,’ अशी माहितीही महेश बनकरने दिली. मागच्या वर्षी महेश व त्याच्या सहकाऱ्यांनी गणपतीला सजावटीसाठी वापरलेल्या वस्तूंचे काय करायचे, याबद्दल कार्यशाळा घेतल्या होत्या. या कचऱ्याचे आधी व्यवस्थापन कसे करायचे हे समजावून दिले, त्यानंतर त्याचा पुनर्वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण दिले. कोणत्याही कलेला आमचा विरोध नाही पण गणपतीत होणारा आवाजवी खर्च आणि पर्यावरणाची दखल या दोन्ही गोष्टींचा समतोल राखला जावा यासाठी आम्ही प्रयोग करत आहोत, असे त्याने सांगितले.  इकोफ्रेंडली सजावटीबरोबरच गणशोत्सवात मंडळे बांधण्यासाठी झाडे तोडली जातात. त्यामुळे कमी उंचीची झाडे लावा असा पर्याय म्हणून कमी वाढ होणारी झाडे महेशने यंदा वाटली. ज्यात आपटय़ाच्या झाडांचे रोपटे त्याने दिले. आदिवासी पाडय़ातील व गावातील मुलांना गणपती ही विद्येची देवता असल्याने या निमित्ताने पुस्तक व स्टेशनरी वाटप केले, असे त्याने सांगितले.

गणेशोत्सवात घरच्या गणपतीची पूजा आणि लोकप्रिय गणपतींचे दर्शन करून झाले या गैरसमजात न रमता या उत्सवाच्या निमित्ताने काही सर्जनशील, विधायक कार्य करू पाहणारी, ते मोठे करू पाहणारी ही तरुणाई म्हणूनच वेगळी ठरते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 1:23 am

Web Title: youth craft ideas to celebrate ganesh chaturthi
Next Stories
1 पाळीव प्राण्यांसाठीही सुरु झाली डबा सेवा
2 फॅशनदार  : आकार‘ण’
3 ‘जग’ते रहो : शहर श्रीमंतांचं!
Just Now!
X