06 March 2021

News Flash

‘मुक्त’संवाद

ओपन माईकचे कार्यक्रम हे सर्वसामान्यपणे कॅफेज किंवा मोकळ्या जागांवर होतात.

तरुणांचे आवडीचे विषय कोणते, याचं अगदी स्पष्ट उत्तर देणं कठीण, कारण आजचं चित्र पाहता तरुण पिढी कोणत्या विषयावर आपलं मत मांडू इच्छिते हे सोशल मीडियावर रोज पाहायला, वाचायला मिळतं. त्यातून त्या विषयावर चर्चा होते, संवाद साधला जातो पण सोशल मीडियावरून संवाद साधणारा तरुणाईचा चेहरा ही एकच बाजू आहे का? आजूबाजूला घडणाऱ्या घटना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषय यावर खुलेपणाने बोलावं, आपले अभ्यासात्मक विचार मांडावेत, अशी इच्छा त्यांच्यात निर्माण होते का, या प्रश्नाचं उत्तर ओपन माईकच्या निमित्ताने त्यांनीच दिलं आहे. मुक्तसंवादाची संधी देणारा हा ओपन माईकप्रकार नेमका काय आहे? त्याचं जाळं सध्या मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून विणलं गेलंय.. त्याची मुळं कुठे आहेत?

‘ओपन माईक’ हे म्हटलं तर तरुणाईच्या विचारांचं जाळं. यामागचा त्यांचा उद्देश एकच आहे- तो म्हणजे संवाद. ‘ओपन माईक’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांकडून आपल्याकडे आली आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सध्या समाजमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉम्र्सवर स्टॅण्ड अप कॉमेडियन्स, मोटिव्हेशनल स्पीकर्स यांचं पेव फु टलं आहे. त्यात तरुण पिढी काही काळ रमली असली तरी स्वत:चे विचार मग ते अगदी दैनंदिन घटनांवरचे का असेना ते आपल्या शैलीत मांडणं, त्यावर लोकोंशी संवाद साधणं, त्यांचे विचार ऐकणं हे त्यांना गरजेचं वाटू लागलं आहे. याआधीची पिढी व्याख्यानमालांना आवर्जून हजेरी लावायची. आताची पिढी ‘ओपन माईक’च्या माध्यमातून व्यक्त होते आहे. हे जाळं आज खूप मोठय़ा प्रमाणावर विस्तारतंय.

अगदी सर्वसामान्य कॉलेजला जाणारी, एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करणारी ही तरुण मुलं या ‘ओपन माईक’ शोमध्ये सहभागी होतात, आपले विचार थेट मनमोकळेपणाने बोलून दाखवतात आणि जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधतात. अगदी घरून उठून या शोला आलेली ही मंडळी. मुंबई, दिल्ली, गुडगावसारख्या शहरातून आलेले हे कोणी स्टँडअप कॉमेडियन, कोणी वक्ता, कोणी कवी अशा विविध ढंगात मुक्तसंवाद करतात. हे कार्यक्रम स्वतंत्र पद्धतीने आयोजित केले जातात, सर्वाना खुले असतात तेही कधी अगदी माफक दरात तर कधी विनामूल्य.. आपल्याला अवगत असणाऱ्या कलेतून विचार व्यक्त करावेत, हा एकच उद्देश त्यामागे असतो. ‘कॅट कॅफे स्टुडिओ’च्या व्यवस्थापकीय टीममधील लावण्या वर्मा सांगते, ‘ओपन माईकमधून आम्ही नव्या कलाकारांना संधी देतो, आपल्या कलेतून त्यांनी लोकांसमोर खुलेपणाने व्यक्त व्हावं यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. इथे सहभागी होणारे प्रेक्षक हे साधारण ट्रोडर, टीनएज, अ‍ॅडल्ट असतात, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित विषयच आम्ही इथे कलाकारांना सादर करण्यासाठी सांगतो’.

ओपन माईकचे कार्यक्रम हे सर्वसामान्यपणे कॅफेज किंवा मोकळ्या जागांवर होतात. अशा कार्यक्रमांना साधारण कमी तिकीट असतं तर कधी मोफतही असतो. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आर्थिक निधी हा एखाद्या मोठय़ा स्टेजशी किंवा कंपनीशी टाय अप करून केला जातो, कधीतरी कॅफे भाडय़ाने घेतले जातात, असे लावण्याने सांगितले. तर कॅफेजशी देवाणघेवाण करूनही असे कार्यक्रम केले जातात. सध्या ओपन माईकचं वेड कॉलेजेसमध्येही पसरलं आहे. विल्सन कॉलेजची प्रीती बेघल सांगते की, ‘द शो’ या नावाने कवितांसाठी आम्ही ओपन माईक इव्हेंट करतो. आमच्या कॉलेजचे फेस्टिवल प्रायोजक, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या मदतीने आम्ही पहिला शो केला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कॉलेजनेही त्यासाठी मदत केली. आमच्या कॉलेजसमोरच चौपाटी आहे म्हणून आम्ही तिथे हा कार्यक्रम आयोजित करतो. आपापल्या कविता सादर करण्यासाठी आम्ही तरुणांना आमंत्रित करतो. या शोमागची प्रेरणाही हीच होती की कवितांवर हल्ली खूप कमी पिढी बोलते, पण स्वत:ला लोकांसमोर व्यक्त करायचं असेल तर कवितांसारखं माध्यम नाही त्यामुळे सुरुवातीला आम्ही आमच्या ओळखीतले कवी शोधले त्यांना ओपन अप केलं. हळूहळू ही संख्या आपणहून वाढत गेली.’

‘ओपन माईक’ हे तरुणाईसाठी अभिव्यक्ती माध्यम असलं तरी त्यातून करिअरच्या संधीही विकसित होताना दिसतायेत मात्र ते तितकं सोपं नाही, असं ‘पृथ्वी थिएटर’च्या ‘कॅफेरटी’द्वारे ओपन माईक करणाऱ्या रेहमानचं म्हणणं आहे. ‘करिअरच्या दृष्टीने ओपन माईकद्वारे लोकांपर्यंत पोहचणं अवघड काम आहे, कारण कलाकारांसाठी ही एक फक्त संधी आहे. त्यासाठी त्यांना पैसे मिळत नाहीत. प्रेक्षकांचा किती प्रमाणात जास्त प्रतिसाद त्या कलाकाराला मिळेल त्यावर पुढच्या अ‍ॅक्टसाठी त्याला ग्राह्य़ धरलं जातं. त्यामुळे त्या शोपुरती प्रसिद्धी त्याला मिळू शकते, पण एक करिअर म्हणून त्यात सलगता ठेवण हे आव्हान आहे’. मात्र याच ओपन माईकद्वारे स्टँडअप कॉमेडियन म्हणून नावारूपाला आलेली पवित्रा तुपुरानी करिअर म्हणून हा   स्टेज लोकप्रिय आहे, असं म्हणते. अर्थातच, यात करिअर घडवणं ही कसोटी आहे कारण तुमच्या लेखनात, आशयात सतत नवं काही देणं गरजेचं असतं, असं ती सांगते. तिचा ‘कॅनव्हास लाफ क्लब’ हा आता खूप मोठा स्टेज झाला आहे आणि यावर इतरांनाही संधी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. ‘सुरुवातीच्या काळात  मी माझ्या प्रवासादरम्याने किस्से, घरातील, ऑफिसमधील भांडणे यावर विनोदी मांडणी केली होती. त्यानंतर अभिषेक उपमन्यू आणि मी एकत्र कार्यक्रम केले. पण सातत्याने पुढे नवीन काय, हा आमच्यासमोरचा प्रश्न होता. तुमच्या सादरीकरणात दर्जेदार आशय, उत्कृष्ट देहबोली, आवाज सगळ्याचा मिलाफ असावा लागतो तर तुम्ही या मंचावर प्रसिद्ध होऊ शकता, असं पवित्रा सांगते.

कॉलेज सुरू असतानाच ओपन माईकच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देणारे अनेक जण आहेत. त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक नफ्या-तोटय़ाचा विचार केला जात नाही. ओपन माईक हेच करिअर म्हणून करावं, असं बंधनही नसल्याने एकाच वेळी शिक्षण किंवा करिअर आणि ओपन माईक दोन्ही सांभाळलं जातं. अर्थात, सुरुवातीच्या काळात पैसे नसले तरी एखादा शो लोकप्रिय झाल्यानंतर त्याला व्यावसायिक स्वरूप देणंही शक्य असल्याचं ही मंडळी सांगतात.

ओपन माईकची संकल्पना ही सध्या तरी आपल्या विचारांना खुला वाव देणं इतपतच मर्यादित आहे. ही संकल्पना येत्या काळात आणखी विस्तारित होत जाणार यात शंका नाही. मात्र भविष्यात मोठं होणारं ओपन माईकचं हे रोपटं आजही दररोज तरुणाईच्या मनात दडलेल्या नव्या विचारांना, आशयाला खुली वाट करून देत आहे. कोणता विषय ठरवायचा हे सर्वस्वी त्या कलाकारांवर अवलंबून असलं तरी इथे त्यांना विषयाचं बंधन नाही. राजकीय, सामजिक विषयांपासून अगदी आपल्या आयुष्यातील किस्से, साध्या साध्या घटना, चालू घडामोडींवर कधी विनोदातून, चर्चेतून किंवा कवितेतून मांडत ते एकमेकांच्या विचारांना चालना देताहेत हेही नसे थोडके. माईक समोर आल्यावर ओपन होणं, मोकळं होणं गरजेचं असतं. आपलं मन कोणालाही न घाबरता मोकळं करणं ही मुक्त संवादाची पहिली पायरी आहे. यातूनच कदाचित पुढे संवादाचे हे धागे घट्ट वैचारिक बंध समाजात निर्माण करतील.. आणि एक पिढी घडेल!

 ‘ओपन माईकचे चेहरे

आज पीयूष शर्मा, नवीन नरोन्हा, बिसवा कल्याण राथ हे आघाडीचे स्टँड अप कॉमेडियन या मंचावरून आले आहेत. बिसवाचे ‘इंग्लिश अ‍ॅण्ड रिप्रॉडक्शन’, ‘उबर अ‍ॅण्ड मी’,‘ फॅन्स अ‍ॅण्ड नेलकटर्स’ हे ‘कॅनव्हास लाफ क्लब’चे ओपन माईक शोज हिट आहेत. बिसवा आयआयटियन आणि कधीकाळी ड्रिप्रेशनमध्ये गेलेला मुलगा या कार्यक्रमांद्वारे लोकांसमोर मुक्तपणे बोलायला शिकला. ‘एलजीबीटी कम्युनिटी’तील अनेकांसाठी हा महत्त्वाचा मंच ठरला. अबीश मॅन्थू, करूनेश तलवार, झाखीर खानसारखे कलाकार आज मोठय़ा प्रमाणात ओपन माईकवरून संवाद साधतात. आज यांची मतं, विचार ऐकण्यासाठी तरुण मोठय़ा प्रमाणावर उत्सुक आहेत, असं नवीन नरोन्हा सांगतात. आब्बास मोमीन, पवित्रा शेट्टी, ध्रुव देशपांडे, राहुल सुब्रमण्यम, अभिषेक उपमन्यू, विक्रमजीत, प्रित्यूष यांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पवित्रा शेट्टीचा सोनू ठक्करसोबत ‘चलता है’ हा शो फार हिट आहे. तर आब्बास मोमीन – कुणाल राव जोडीचा ‘ब्रो जॉक सुना ना’ हा शो हिट आहे. हे शोज मोठय़ा प्रमाणात ‘कॅनव्हास लाफ क्लब’, ‘द हॅबिटॅट’, ‘कॅ ट कॅ फे स्टुडिओ’, ‘अ‍ॅन्टीसोशल’, ‘फन पब्लिक सोशल’, ‘द स्क्वेअर’ म्हणजे मुंबईत बांद्रा, लोअर परेल, खार या परिसरात जास्त होतात.

ओपन माईकमध्ये पैसा महत्त्वाचा नाही

हल्ली कोणताही कार्यक्रम असो किंवा घरातला छोटेखानी समारंभ तिथे पैशाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. मात्र ओपन माईकसारख्या ठिकाणी जिथे इतकी लोक तुम्हाला ऐकायला येतात आणि तुम्हालाही सादरीकरणाची संधी मिळते तिथे आर्थिक फायदा महत्त्वाचा मानला जात नाही. ओपन माईक म्हणजे पैशांच्या पलीकडे जाऊ न निव्वळ तुमच्या कलेला, मग ती कविता असो, गाणं असो, कॉमेडी असो वा एखादा संवेदनशील मुद्दा ते लोकांसमोर आणणं, त्यांचं मनोरंजन करणं हेच यात अपेक्षित असतं. आम्ही अवघ्या काही महिन्यांपूर्वी पुण्यात ठिकठिकाणी ओपन माईक सुरू केले आहेत. शहरांमध्ये आता कॅफे आणि क्लब संस्कृती वाढली आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या कॅफे-क्लबमध्ये शो करताना पैशाचा प्रश्न येतनाही. तिथे येणारे लोक पैसे भरूनच येतात त्यामुळे कॅफे मालकांकडून सहज परवानगी मिळते. शिवाय त्यांना त्यांचं खाणं फस्त करायला ‘खवय्ये’ मिळतात. त्यामुळे त्यांचाही फायदाच होतो. सादरीकरण करायला येणारे कलाकारसुद्धा कोणत्याच मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाही कारण ओपन माईकमध्ये ती पद्धत नाही. ओपन माईक हे नाव यासाठीच आहे कारण इथे येऊन कोणीही काहीही सादर करू शकतो आणि यात कोणताच मोबदला गणला जात नाही.

अजिंक्य भालेराव, सदस्य- इल्युजन ओपन माईक’, पुणे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:33 am

Web Title: youth from social media free communication
Next Stories
1 फॅशन परंपरेची..!
2 ‘बुक’ वॉल
3 ‘जग’ते रहो : भाषाभिमान आणि बरंच काही..
Just Now!
X