News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : ‘माय चॉइस’चा बॅलन्स

लहान असल्यापासून आई-बाबांनी तिच्यात आणि दादात काहीच भेदभाव केला नव्हता.

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. हे कसं साधायचं़  या गोष्टींमधून हेच थोडं समजून घेऊ या.

‘मला लोकांचं एक कळत नाही, इतकी सगळी बंधनं का? केवळ मी मुलगी आहे म्हणून? रात्री फार वेळ बाहेर राहायचं नाही, अंगभर कपडे घालायचे, फतकल मारून बसायचं नाही, जोरजोरात हसायचं नाही.. इट्स माय लाइफ, अ‍ॅण्ड चॉइस. कसले कपडे घालायचे ते मी ठरवीन ना! मुलं हिंडतात रात्रभर बाहेर, मग आम्ही का नाही? पार्टीत त्यांनी ड्रिंक्स घेतली तर ते सेलिब्रेशन आणि आम्ही घेतलं तर ते मात्र ऑब्जेक्शनेबल? मला अजिबात मान्य नाहीये हे.’ ऋचा तावातावानं बोलत होती.

खरं तर लहान असल्यापासून आई-बाबांनी तिच्यात आणि दादात काहीच भेदभाव केला नव्हता. मी फुटबॉल खेळायची शाळेच्या टीममध्ये, सुट्टीत ट्रेक्सना जायची. पण वयात यायला लागल्यापासून तिला आईच्या वागण्यातला बदल स्पष्टपणे जाणवायला लागला होता. हळूहळू एक एक नकारघंटा, बंधनं ऐकून सुरुवातीला ती गोंधळली आणि मग चिडायला लागली. पण आई-बाबा ठाम होते.

आजच्या मुली फक्त शिकलेल्याच नाही तर सक्षम झाल्या आहेत, जबाबदार आणि कॉन्फिडन्टही आहेत. ‘त्यांनी कसं जगावं?’ असा प्रश्न निघाला की मात्र दोन टोकांची मतं ऐकायला मिळतात. पारंपरिक मत असं की, ‘मुलींनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. आपल्या वागण्या-बोलण्याच्या, कपडय़ांच्या बाबतीत काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. उगीच आपणहून संकटाला आमंत्रण कशाला द्यायचं? त्यांच्या अशा वागण्यामुळेच पुरुष प्रोव्होक होतात.’ तर दुसरं मत असतं की, ‘कसेही कपडे घालण्याचं, रात्री मनसोक्त हिंडण्याचं, एकटीनं प्रवास करण्याचं, आपले चॉइसेस करण्याचं स्वातंत्र्य मुलींना असायला हवं. आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ काढायचा, फायदा घ्यायचा कुणाला हक्क नाही.’ गंमत अशी की, अत्याचारांच्या घटनांमध्ये असणाऱ्या दोन घटकांपैकी त्या दुसऱ्या घटकानं, म्हणजे पुरुषांनी काय करायला हवं-नको याबद्दल कुणी फारसं काही बोलत नाही. मुलींना राग येतो तो याच गोष्टीचा. काही घडलं तरी त्यांनाच जबाबदार धरलं जातं. त्यांच्यावरची बंधनंच अधिक कडक होतात.

मुलीवर जे अत्याचार होतायत, त्यांच्या स्वातंत्र्यावर जे आक्षेप घेतले जातायत ते ऐकल्यावर मला नेहमी हायवे वरचे अपघात आठवतात. हे अपघात नेहमी नियम न पाळणाऱ्यांनाच होतात का? नाही खरं तर. गाडी चालवणाऱ्या कित्येक जणांकडे लायसन्स नसतं, असलं तरी त्यांना रहदारीच्या नियमांची काडीची माहिती नसते किंवा माहिती असली तरी त्यांना ते नियम पाळायची इच्छा नसते. म्हणजे अपघात होऊ नयेत यासाठी ड्रायव्हर्सना फक्त गाडी चालवायला शिकवून पुरेसं नाही तर या सगळ्या फ्रंट्सवर त्यांना अवेअर करायला हवं. आणि जोपर्यंत ते तसे तयार झालेले नाहीत तोपर्यंत तरी इतरांना काळजी घ्यायला लागणार गाडी चालवताना. समोरच्याला या नियमांची माहिती नसू शकेल असं गृहीत धरूनच गाडी चालवायला लागेल. नाही तर हकनाक जिवावर बेतायचं.

दुनियेतल्या तमाम पुरुषांना आपण प्रशिक्षित करू शकलोय का? समोरची व्यक्ती सेन्सिबल विचार करेल याची खात्री देता येणार आहे का? आणि तसं नसेल, तर काय करायचं? बाहेर जाणं थांबवायचं? बुरख्यात बसून राहायचं? मुकाटय़ानं सगळं तसंच चालू ठेवायचं? काही तरी सुवर्णमध्य काढला पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती इतकी प्रगल्भ होत नाही, तोर्पयच डोळे, कान उघडे ठेवायला हवेत. कुठेही जाण्याआधी आणीबाणीत काय निर्णय घ्यायचा, कुणाला कॉन्टॅक्ट करायचं, सुटकेचे, सेल्फ डिफेन्सचे कुठले मार्ग अ‍ॅव्हेलेबल आहेत याची चाचपणी करून ठेवायला हवी. सीमेवरचे सैनिक कसे, कुठल्याही क्षणी शत्रू हल्ला करेल याबाबत कायम सावध असतात. खरंतर हल्ला कधीतरीच होतो, पण सैनिक सतत तयारीत असतात. तशी सावधगिरी आपण बाळगायला हवी.

आपण जनरलायझेशन करत नाही आहोत. सगळीच मुलं वाईट आणि सगळ्याच मुली धोक्यात असं नाहीये. इन फॅक्ट, आजची किती तरी तरुण मुलं तयार आहेत बदलांना. त्यांना नाही कमीपणा वाटत स्वयंपाक करण्यात आणि मुलं सांभाळण्यात. मुलींच्या मोकळेपणानं वागण्याचा ते चुकीचा पण सोयीस्कर अर्थ नाही काढत. म्हणजे बदलांची सुरुवात झाली आहे. फक्त समाजाचे नियम, रीतीरिवाज, थिंकिंग अजून बदललेलं नसल्यामुळे आपण नक्की काय करू शकतो हे लक्षात येत नाहीये. कित्येक पिढय़ांपासून आपली संस्कृती पुरुषांच्या फेवरमध्ये आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपोआप किंवा ओव्हरनाईट बदलणार नाही. आपल्याला त्यासाठी दीर्घकाळ अ‍ॅक्टीव्ह प्रयत्न करत राहावं लागणार आहेत.

एक गोष्ट आपल्या हातात आहे. काही काळात तुम्ही पालक बनणार आहात. नवीन जन्माला येणाऱ्या मुला-मुलींना, एस्पेशिअली मुलांना लहानपणापासून आपल्या बदललेल्या रोलची जाणीव करून देता आली तर ते या विचारांबरोबरच मोठे होतील, ते विचार खोलवर रुजतील. मग त्यांना नंतर फारसं अवघड जाणार नाही. म्हणजे आजच्या तरुणांना दोन फ्रंट्सवर विचार करायचाय. एक तर मुलींना मोकळेपणानं, निर्भयपणे जगता यावं यासाठी आपला खारीचा वाटा उचलायचा. आपल्या आजूबाजूची, नात्यातली, ओळखीची मुलं आणि आपली स्वत:ची होणारी मुलं यांच्यात या बदलाची बीजं रुजवायची. आणि दुसरं म्हणजे तोपर्यंत स्वातंत्र्य अबाधित राहील हे बघायचं पण हार्म होणार नाही अशी प्रिकॉशनही घ्यायची. हा जरा डेलिकेट बॅलन्स आहे पण तो सांभाळण्याशिवाय गत्यंतर नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:34 am

Web Title: youth life examination study relationship friendship career looks
Next Stories
1 खाबूगिरी : भुजिंगाट
2 सुगंधी कट्टा : सुगंधी इतिहासाचे दुसरे पर्व
3 हेल्दी रेसिपीज : पौष्टिक सामिष
Just Now!
X