12 August 2020

News Flash

मुक्त मी!

लैंगिक ओळख हा प्रत्येकाचा खासगी मुद्दा आहे. जी आपल्याला जन्मत:च मिळते.

तेजल चांदगुडे, प्रियांका वाघुले

नुकताच कलम ३७७ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय समलिंगी, उभयलिंगी आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणणारा निर्णय ठरला. या निर्णयामुळे समाजातील विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया उमटल्या, पण या सगळ्यात देशाचं भविष्य घडवणाऱ्या तरुण पिढीला या निर्णयाबाबत काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. हा निर्णय नेमका काय आहे, तरुणाईने या निर्णयाबरोबरच या व्यक्तींनाही आपल्यात कसं सामावून घेतलं आहे याविषयी त्यांच्याशीच बोलून घेतलेला वेध..

स्त्री-पुरुष समानता, त्यांना मिळणारे समान नागरी हक्क, विविध क्षेत्रांत समान वेतन मिळण्यासाठी धरला जाणारा आग्रह हे असे आणि अनेक ‘सामाजिक लिंग भेदा’च्या समस्या  मिटवण्यासाठी जगभरातून सातत्याने प्रयत्न होत राहिले आहेत. खरंतर ‘लिंग’ ही गोष्ट रंग, रूप, जात, धर्म या गोष्टींप्रमाणे आपल्या हातात नसते. मात्र आपण मोठे होत जातो तसतसे आपण स्त्री की पुरुष यानुसार आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीसह लैंगिक भिन्नतेचे अनेक पैलू स्वानुभवातून उलगडत जातात.

लिंग ही गोष्ट वरकरणी स्त्री-पुरुष इथपर्यंतच मर्यादित वाटत असली तरी ती तितकी सोपी नाही. समाजात या दोघांशिवाय ज्यांचं अस्तित्व आहे त्यांच्याबद्दल सरळसरळ ते अनैसर्गिक आहेत, असं म्हणून आपण त्यांचा विचार करणंही टाळतो. मात्र अशा अनेकांना काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ‘आता आम्हीही आहोत’ असं छातीठोकपणे सांगण्याचं बळ मिळालं आहे. कलम ३७७ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेला ‘समलिंगी संबंध गुन्हा नाही’ हा निर्णय अनेकांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आला. खरं तर कलम ३७७ विरोधात न्यायालयात अनेकदा अनेक धार्मिक संस्था, सामाजिक हितासाठी काम करणारे संघ इत्यादींकडून याचिका दाखल करण्यात आहेत. सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार यांच्या निर्णयांमुळे हा गहन मुद्दा अनेकदा नकारात्मक दृष्टीने लोकांसमोर आला होता, मात्र सर्वोच्च न्यायलायाने दिलेला आत्ताचा निर्णय समाजातील विविध स्तरांतील अनेक सुजाण नागरिकांनी अगदी डोक्यावर घेतला. समाजात वावरताना प्रत्येकाला आपल्या भावना, विचार मुक्तपणे आणि खुलेपणाने मांडण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे, मात्र हे स्वातंत्र्य किंबहुना मोकळीक खासगी आणि शारीरिक गरजांच्या बाबतीत बोलताना आढळून येत नाहीत. लैंगिक ओळख हा प्रत्येकाचा खासगी मुद्दा आहे. जी आपल्याला जन्मत:च मिळते. पण जर ती ओळख स्त्री किंवा पुरुष याव्यतिरिक्त असेल तर मात्र समाजात त्यांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. परिणामी कधी समलिंगी, उभयलिंगी आणि ट्रान्सजेन्डर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या या वेगळेपणामुळे नेमकं किती आणि काय सहन करावं लागत असेल हे खरंच कल्पनेबाहेरचं आहे.

पाश्चिमात्य देशात ज्यांना ‘थर्ड सेक्स’ म्हटलं जातं अशा अनेकांना आपल्या देशात अपमानित व्हावं लागलं आहे, तसंच त्यांना आपली ओळख लपवून इथे वावरावं लागलं आहे. मात्र ही परिस्थिती सध्या वेगाने बदलत चालली आहे. एकीकडे फॅ शन, ग्लॅमर विश्वात हा लैंगिक भेद गळून पडला आहे. अनेक ट्रान्सजेन्डर मॉडेल्स आज दिमाखात रॅम्पवर वावरत आहेत मात्र आपल्या समाजाने त्यांना आपलंसं केलं आहे की नाही, याचा विचार करताना सध्या तरुणाईने त्यांना सहजपणे स्वीकारल्याचं चित्र आजूबाजूला दिसतं आहे. या लोकांबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल एक वर्ग अजूनह तितका सकारात्मक नाहीये, पण तरुणवर्ग मात्र या गोष्टींचा बारकाईने विचार करू लागलाय.

३७७ च्या या निर्णयाबद्दल जेव्हा महाविद्यालयातील तरुणांना विचारलं, तेव्हा खरंच त्यांची मतं विचार करण्यासारखी वाटली. रुईया महाविद्यालयात या निर्णयानंतर ‘रोज क्वीन’ ठरलेली व्यक्ती ही एक ट्रान्सजेंडर असून या निर्णयाचे सामान्य जनतेनेही सकारात्मक स्वागत केल्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. याच संदर्भात रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, ‘जन्माला येताना आपण काही करू शकलो नाही तरी नंतर तो पूर्णपणे त्या व्यक्तीचा निर्णय आहे की तिने कोण म्हणून जगावं. आणि जगत असताना आपला सोबती स्त्री असावी की पुरुष हे सर्वस्वी त्या व्यक्तीची निवड असायला हवी, असे मत एका विद्यार्थिनीने व्यक्त केले. तर आपल्या पोटाची भूक जशी आपल्यालाच कमावून भागवावी लागते. तशीच आपल्या शरीराची भूक हाही वैयक्तिक मुद्दा आहे. ती भूक आपण समलैंगिक व्यक्तीकडून भागवावी की भिन्नलिंगी व्यक्तीकडून भागवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यात इतरांनी ढवळाढवळ करण्याचे कारणच नाही, असे दुसऱ्या विद्यार्थिनीने स्पष्ट केले.

निसर्ग नियमानुसार प्रजननासाठी भिन्नलिंगी संबंध आवश्यक असल्याने समलैंगिक नात्याने आपण निसर्गनियम मोडत आहोत आणि न्यायालयाच्या या निर्णयामुळे याला आता अजून हातभार लागला आहे, अशीही मतं व्यक्त करणारी तरुण मंडळी आहेत. तर मुळात समलिंगी, ट्रान्सजेंडर यांच्याबद्दल अज्ञान असणारी, कलम ३७७ म्हणजे नेमकं काय याबाबत अगदीच अजाण असणारीदेखील तरुणवर्गाची एक फळी अस्तित्वात आहे. तर काहीही अभ्यास नसताना केवळ सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला म्हणजे तो योग्यच असणार, असं निर्विकारपणे सांगणाऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दल विविध पडसाद उमटत आहेत. तस सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अनेकांनी तिथे झळकणाऱ्या सप्तरंगांच्या प्रतीकात्मक मांडणीतून या निर्णयाचं स्वागतही केलं आहे. समलैंगिकता हा आजार नाही तसंच ही मानसिक विकृतीही नाही, असं एकविसाव्या शतकातील संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समलैंगिक म्हणजे काहीतरी विचित्र, विकृत असं ठरवलं जाऊ  शकत नाही. जे समलिंगी, उभयलिंगी आहेत, ट्रान्सजेंडर आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्यापासून वंचित ठेवलं जाऊ  शकत नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे.

अनेक जण या ऐतिहासिक निर्णयाला पाठिंबा देताना आणि केवळ स्त्री-पुरुष यापलीकडे लिंग असणं किती नैसर्गिक आहे हे सांगण्यासाठी अनेक पौराणिक आख्यायिकांचे दाखले देतात. उदाहरणार्थ विष्णूने मोहिनीचं रूप घेणं, महादेव अर्थात शंकराचं अर्धनारीनटेश्वर रूप इत्यादी. तसंच शिखंडीचं लिंगपरिवर्तन हे सेक्स रिअसाइन्मेंटचं बहुतेक पहिलं उदाहरण असावं, असंही म्हटलं जातं. मात्र दाखले कुठलेही असले तरी काहीएक प्रमाणात तरुण वर्ग आणि सुजाण नागरिक या व्यक्तींना आपलंसं करण्यासाठी तयार आहेत, हेच यातून दिसून येतं.

मुळातच एक तर अनेक वर्ष स्वत:ची लैंगिक ओळख लपवत, शारीरिक-मानसिक गरजांना बाजूला सारत कुढत जगणाऱ्या अनेकांना कुठे तरी या कायदेशीर मान्यतेमुळे आणि लोकांनी त्यांना स्वीकारल्यामुळे या निर्णयाने स्वच्छंदी जगण्याचा मार्ग खुला झाला आहे, यात शंका नाही. आपली लैंगिक ओळख न लपवता समाजात मानाने वावरण्याचा अधिका देणारा हा निर्णय खऱ्या अर्थाने ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.

उक्तीपेक्षा कृती बोलकी..

कलम ३७७ संदर्भात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिल्यानंतर देशभरात या निर्णयाचे उत्साहात स्वागत झाले. त्यानंतर अनेकांनी न घाबरता समोर येऊ न आपण समलिंगी असल्याचं सांगितलं. तर अनेक ठिकाणी तृतियपंथीयांना यापुढे सर्व अधिकार मिळतील याची झलक पाहायला मिळाली. अशाच काही बोलक्या घटना..

चित्रपट निर्माता अपूर्व असरानीने फेसबुकवर प्रियकराबरोबरचा फोटो शेअर करत त्याच्या ११ वर्षांचे नातेसंबंध जाहीर केले. अपूर्वने ‘अलीगढ’, ‘शाहीद’ या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे त्याचा ‘अलीगढ’ हा चित्रपटही एका समलैंगिक प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित आहे.

> भारतामधील तृतीयपंथी शासकीय अधिकारी असणारी ऐश्वर्या प्रधान हिनेही आपण प्रियकराबरोबर लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. मागील दोन वर्षांपासून लीव्ह इनमध्ये राहणारे ऐश्वर्या आणि तिचा प्रियकर लग्नाचा निर्णय घेण्यासाठी न्यायलयाच्या निर्णयाची वाट पाहत होते. ती सध्या ओडिशामधील आयकर विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहे.

> पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवात शंभरहून अधिक तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेऊन त्याची आरतीही केली. याशिवाय यंदा पिंपरी चिंचवडमध्ये रुपीनगर येथील ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली. तर सोलापुरात तृतीयपंथीयांनी गौरी आवाहन केल्याचे पाहायला मिळाले.

> एलजीबीटीक्यू समुदायाला पाठिंबा देण्यासाठी क्रि केटपटू गौतम गंभीर यानेही आपली भूमिका एका वेगळ्या मार्गाने मांडली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या हिजडा हब्बाच्या सातव्या पर्वाच्या अनावरणाच्या वेळी त्याने हजेरी लावली होती. त्या वेळी त्याने तृतीयपंथीयांना पाठिंबा देण्यासाठी डोक्यावर पदर घेऊन, कपाळावर टिकली लावून महिलांचा वेष धारण करत सर्वानाच थक्क केलं.

याशिवाय अनेक ब्रॅण्ड्सनी वेगवेगळ्या पद्धतीने या निर्णयाचे स्वागत केले. यामध्ये अगदी गुगल, फेसबुक, युटय़ूब, ट्विटरसारख्या बडय़ा कंपन्यांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्यांनी सहभाग घेत आत्तापर्यंत समाजाने ज्यांचे अस्तित्वच नाकारले होते त्यांचे खुल्या मनाने अभिनंदन केले.

सप्तरंग म्हणजे नेमकं काय?

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एल.जी.बी.टी. या संकल्पनेत मोडणाऱ्या लोकांची विविधता दाखविण्यासाठी गिल्बर्ट बेकर यांनी इंद्रधनुष्यतील सप्तरंग वापरून झेंडय़ाची रचना केली होती. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर समलिंगी व्यक्ती आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी हाच इंद्रधनुषी रंगाचा झेंडा अभिमानाने मिरवला.

संकलन – स्वप्निल घंगाळे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:15 am

Web Title: youth reaction on supreme court verdict on section 377
Next Stories
1 पुन्हा एकदा खादी..
2 ‘जग’ते रहो : फिर भी दिल हैं हिंदुस्थानी
3 विरत चाललेले धागे : स्वयंसिद्धा साडी
Just Now!
X