News Flash

Watchलेले काही : अधिकची सकारात्मकता!

सकारात्मकतेची देणगी ही माणसाला कधीच जन्मजात मिळत नाही.

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ. मोटिव्हेशनल व्हिडीओंच्या गर्दीतले काही नेमक्या कणांविषयी आजच्या लेखात..

वर्षांरंभाला, महिन्यारंभाला किंवा आठवडय़ारंभाला काही तरी नवे करण्याचा उत्साह प्रत्येकाकडे असतो. कालपेक्षा आजचा दिवस चांगला जावा ही अतिआळशी माणसाचीदेखील अपेक्षा असते. यात वावगे काहीच नाही. आरंभशूरांच्या अनंत व्यक्तींमध्ये जगातील सर्वसामान्य माणसे मोडतात. एखाद्या चांगल्या गोष्टीचा आरंभ करून ध्येयाच्या जवळपास जाणाऱ्यांनाच तर आपण यशस्वी किंवा असाधारण संबोधतो. सकारात्मकतेची देणगी ही माणसाला कधीच जन्मजात मिळत नाही. ती त्याला नेहमीच उसनी घ्यावी लागली. गेल्या शतकात अमेरिकेतील डेल कार्नेगी या व्यक्तीने आत्म-विकासाचे मर्म सांगणारे ‘हाऊ टू विन फ्रेण्ड्स अ‍ॅण्ड इन्फ्लूअन्स पिपल’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याच्या स्वविकासाच्या सिद्धांताचा उद्योग गेल्या शतकभरामध्ये इतका फोफावला आहे की, जगातील सर्वच उद्योग, कंपन्या, संस्था, क्रीडापटूंपासून विद्यार्थ्यांपर्यंत वैयक्तिक पातळीवर आज अधिकच्या सकारात्मकतेला महत्त्व आलेले आहे. या विषयांवर शेकडो पुस्तके, ब्लॉग्ज, फिल्म्स आणि डॉक्युमेण्ट्रीज उपलब्ध आहेत. गंमत म्हणजे या सर्वाची विक्री तुफान होते. म्हणजे रॉबिन शर्मा, ब्रायन ट्रेसी, शिव खेरा यांच्या पुस्तकांच्या खपाचे आकडे पाहिले तर या जगात किती नकारात्मक माणसे सकारात्मक होऊ पाहात आहेत, हे कळेल. या पुस्तकांमध्ये वेगळे काहीच सांगितले जात नाही. कंटाळा न करता प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी शिस्तीत केली, तर त्यातूनही बरेच काही आयुष्यातून मिळविता येईल. फक्त त्यासाठी तुमच्ये ध्येय लिहून काढण्यापासून त्याचा पाठपुरावा करायला न थकण्याची अट पाळणे अत्यावश्यक असल्याचे पटवून दिले जाते.

यूटय़ूबवर गेल्या दहा वर्षांमध्ये व्हिडीओजचा महापूर आला. प्रत्येक भल्या-बुऱ्या विषयांसोबत ‘मोटिव्हेशनल व्हिडीओ’ तयार करण्याचा झपाटा सुरू झाला. सुरुवातीला या पुस्तकांतील एकसारखेच तत्त्वज्ञान, ‘स्वप्न वगैरे पूर्ण करण्याची गुरुकिल्ली’ छापाच्या व्यक्तींच्या सहज भावतील अशा वाक्यांचा-छायाचित्रांचा वापर करून सकारात्मक व्हिडीओ पेरले जात होते. आता त्यांच्यामध्येही प्रचंड कलात्मकता आलेली आहे. व्हिडीओ अ‍ॅडव्हाइस कंपनीने प्रसारित केलेला ‘ड्रीम ऑन’ हा व्हिडीओ या सर्व क्लिप्समध्ये उजवी ठरावी. पिटर डिंकलेज नामक लघुउंची असलेल्या अभिनेत्यापासून मनोरंजन उद्योगातील दिग्गजांपर्यंत अनेक यशस्वी व्यक्तींचे आयुष्याविषयीचे स्वगत या दहा मिनिटांच्या क्लीपमध्ये आलेले आहे. त्यांनी स्वप्नांपासून ते पराभूत न होण्याबद्दल, कामातील सातत्याबद्दल काहीच वेगळे सांगितले नाही. पण त्या सांगणाऱ्या व्यक्ती स्टीवन स्पीलबर्गपासून ते क्वेन्टीन टेरेन्टीनोपर्यंत दोन भिन्न विचारांचे चित्रपट दिग्दर्शक, निसिम तालेब, ओप्रा विन्फ्रे, जॅक कॅनफिल्ड यांच्यासारखे विचारवंत, काइ ग्रीन हा बॉडीबिल्डर आणि लिसा निकोल्स, रॉबिन शर्मा हे सकारात्मक विचारांचे प्रचारकर्ते आहेत. पिटर डिंकलेज याने आपल्या कमी उंचीतून आलेल्या न्यूनगंडावर मात करत अमेरिकीतील सर्वाधिक कमाई करणारा टीव्ही अभिनेता ही ओळख कशी केली, याची काही सेकंदांच्या संवादातून माहिती दिली आहे. यात त्याच्या जुन्या चित्रपटांतील दृश्यांसह ‘गेम ऑफ थ्रोन’साठी मिळालेल्या एमी पुरस्काराच्या घोषणेचे चित्रणही जोडण्यात आले आहे. इतर लेखक-कलाकार यांच्या दृश्यांना एकत्रित करून हा व्हिडीओ सजविण्यात आलेला आहे.

सकारात्मकतेचा शोध याहून गंभीररीत्या घ्यायचा असेल तर ‘टेड टॉक’ पाहण्याशिवाय पर्याय नाही. टेड (टेक्नॉलॉजी, एण्टरटेण्टमेण्ट, डिझाइन) ही नफाविरहित माध्यमसंस्था १९८४ पासून अस्तित्वात आहे. मात्र २०१० पासून त्यांचे ‘टेड टॉक’ हे शैक्षणिक व्हिडीओ कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञांचे त्या-त्या विषयासंदर्भातील सर्वज्ञान दाखविणारे असते. शाळा विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता मारत आहे का इथपासून गणित, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आदी कोणत्याही विषयावर आपल्या कल्पनेपलीकडे उच्चविचार घेऊन येणारी सकारात्मक माणसांची फौजच टेडटॉकद्वारे दाखल झाली आहे. वीसेक मिनिटे या व्यक्तींचे अमोघ वक्तृत्व, देहबोली पाहणे, हादेखील वेगळा धडा असेल. हे सारे खूप रंजक आहे. पण पारंपरिक मनोरंजनातून सकारात्मकता हवी असेल, तर मक्सीम म्रॅव्हिका या क्रोएशियातील पियानोवादकाचे जगभरात प्रसिद्ध असलेले ‘ऑलिम्पिक ड्रीम’ हे पियानो गाणे. ऑलिम्पिकवरच्या शकीरा किंवा के नानच्या गाण्याहून ‘ऑलिम्पिक ड्रीम’ गाण्याचे चित्रण अधिक परिणामकारक आहे. यात सामान्य माणसांमधला ऑलिम्पिकज्वर अत्यंत चपखलपणे चित्रित झाला आहे. त्याचे वर्णन ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणेच आवश्यक आहे. अधिकच्या सकारात्मकतेचा आपल्याला सतत गरजेचा असणारा स्रोत त्यांतून गवसल्यावाचून राहणार नाही.

मस्ट वॉच लिंक्स

https://www.youtube.com/watch?v=K8iUaChZYgg

https://www.youtube.com/watch?v=nGH0l0XCF4I

https://www.youtube.com/watch?v=eIho2S0ZahI

https://www.youtube.com/watch?v=F4Zu5ZZAG7I

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:36 am

Web Title: youtube video must watch video motivational videos ted talk videos
Next Stories
1 व्हायरलची साथ : विश्वरूपदर्शनाची झलक!
2 ‘ताण’लेल्या गोष्टी : ‘माय चॉइस’चा बॅलन्स
3 खाबूगिरी : भुजिंगाट
Just Now!
X