News Flash

मालिका, ती आणि फॅशन

शगुन साडी म्हणून तिच्या साडय़ांची फॅशन ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

आपल्या रोजच्या दिनक्रमावर मनोरंजन विश्वाचा मोठा प्रभाव पडत असतो. दिवसभराच्या कामानंतर विश्रांती म्हणून आपण टीव्हीची हमखास मदत घेतो. रोजच्या रोज ठरलेल्या मालिका बघणं हा दिनक्रमाचा भाग असतो. त्यामुळे त्या मालिकांमधील पात्रं आपल्या रोजच्या जीवनाचा भाग होतात आणि आपण त्यांना प्रत्येक गोष्टीत फॉलो करायला लागतो. या फॉलो करण्यामध्ये एखाद्या पात्रांची फॅशन फॉलो करणं हा नवीन ट्रेंड नाही मात्र तरी तो तरुणाईत चांगलाच रुजला आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका गुरुनाथला काय अद्दल घडवते हे फारसं महत्त्वाचं न वाटता शनायाचे ड्रेसेस, तिची त्यावरची हेअरस्टाईल मात्र आवर्जून फॉलो के ली जाते..

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सध्या खूप गाजतेय. यामध्ये शनायाची व्यक्तिरेखा जास्तच लोकप्रिय आहे. शनायाच्या बोलण्यापासून तिच्या फॅशनपर्यंत सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्या जातात. शनायासाठी या मालिकेत अगदी रोज सहज वापरता येतील असे वनपीस, जीन्स आणि वेस्टर्न टॉप्सचा वापर क रण्यात आला आहे. वेस्टर्न कपडेच नाही तर अगदी घरी घालायचे ट्रक पॅन्ट, शॉर्ट्स आणि टी-शर्ट्सही शनायाची भूमिका साकारणाऱ्या रसिका सुनील या अभिनेत्रीने उत्तम कॅरी केले असल्याने नाही म्हटलं तरी तिच्या या वेस्टर्न आऊटफिट्सना तरुण मुली चांगलंच फॉलो करतायेत. शिवाय त्या त्या कपडय़ांवरचा मेकअप आणि ज्वेलरीला मारलेली काट हाही एक ट्रेंडच सेट झाला आहे. याच मालिकेत राधिकेच्या मैत्रिणीच्या भूमिकेत असलेल्या रेवतीची
फॅशनही चर्चेचा विषय ठरते आहे. रेवती हे पात्र एका कर्तबगार आणि स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रीचं प्रतिनिधीत्व करणारं आहे. त्यामुळे तिला वेगळ्या प्रकारचं ड्रेसिंग देण्यात आलं आहे. रेवती बऱ्याचदा ट्रेंडी कुर्तीज आणि पलाझो पॅन्ट्सचे कॉम्बिनेशन वापरते. रेवतीची फॅशन ही कोणत्याही शरीरयष्टीला शोभून दिसते. त्यामुळे ही फॅशनही सहजपणे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीही फॉलो करताना दिसतायेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिके तली चर्चेची जोडी राणा आणि पाठकबाई असल्या तरी फॅशनच्या बाबतीत इथे मात्र नंदिताने बाजी मारली आहे. नंदिताच्या साडय़ा आणि लूक  इतका  लोकप्रिय आहे की  तुम्हाला तो इंटरनेटवरही सहज सापडतो. ‘फ्लिपकार्ट’ सारख्या मोठय़ा शॉपिंग साईट्वरही तिने घातलेल्या हुबेहूब साडय़ा, ज्वेलरी तुम्हाला सहज सापडते. मालिका गावाकडची असली तरीही त्यातली फॅशन शहरातील स्त्रियाही सहज करू शकतात अशी आहे. त्यामुळे नंदिताच्या कॉटन सिल्कच्या साडय़ा आणि ट्रॅडिशनल कानातले अनेकजण रोजच्या वापरात फॉलो करतात. साडी आणि ब्लाउजचे कलर कॉम्बिनेशन कोणालाही आवडतील आणि रोजच्या वापरात वापरता येतील असेच आहेत. साडी सोबतच नंदिताच्या ब्लाउजची स्टाईल खूप फॉलो होत आहे. जुन्या काळातील थ्री फोर्थ स्लीव्जची फॅशन नंदिता या पात्राच्या फॅशनमुळे परत आली आहे.  नंदिताचा चेहरा छोटा असला तरी ती मोठी टिकली लावते. तिची ही टिकलीची फॅशनही सध्या ट्रेंडमध्ये आहे.

हिंदीत अनेक साँस-बहू मालिकांमध्ये त्याच त्याच भरजरी साडय़ा पहायला मिळतात मात्र ‘इश्कबाज’सारख्या मालिकांनी फॅशनचा जाणीवपूर्वक वेगळा विचार करत वेगवेगळे ड्रेसिंग्ज प्रेक्षकांसमोर आणले आहेत. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘इश्कबाज’ ही मालिका श्रीमंत घरातील तीन भावांची कथा आहे. श्रीमंत कुटूंब दाखवलं असल्यामुळे त्यात असलेल्या पात्रांची फॅशनही तशीच आहे. या मालिकेतील अगदी सगळ्याच पात्रांची स्वत:ची अशी एक स्टाईल आहे. ‘आनिका’ या पात्राने घातलेली कुर्ती आणि जीन्सची फॅशन कॉलेजला जाणाऱ्या मुलींना भावते आहे. तर नेहमीच्या कुर्तीपेक्षा वेगवेगळे कट असणारी कुर्ती टिपिकल लुक न देता इंडोवेस्टर्न लूक देते आणि सोबत कम्फर्टही. अनिकाने  घातलेलं मंगळसूत्रही ट्रेंडमध्ये आहे. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन , इबे अशा मोठय़ा फॅशन साईट वरती ‘इश्कबाज अनिका स्टाईल मंगळसूत्र’ अशा नावाने ते उपलब्ध आहे. अनिकाप्रमाणे गौरी या पात्राची आउटफिट्स आणि ज्वेलरीची फॅशनही ट्रेंडमध्ये आहे. गौरी हे पात्र वेस्टर्न आउटफिट घालत नाही. तिच्या अनारकली स्टाईलच्या ट्रॅडीशनल ड्रेसला अनेकदा ट्वीस्ट दिलेला दिसतो. ज्वेलरीमध्ये तिने घातलेले मोठे कानातले अगदी रोजच्या वापरासाठी नाही पण काही खास कार्यRमांना तुम्ही नक्कीच घालू शकता. असाच प्रभाव टाकणारी आणखी एक मालिका आहे ती म्हणजे ‘ये है मोहोबत्ते’. याही हिंदी मालिकेतील सगळ्याच पात्रांची वेगवेगळी स्टाईल स्टेटमेंट आहेत. या मालिकेत लीड असलेली इशिता लग्नआधी दाक्षिणात्य आणि लग्नानंतर पंजाबी दाखवल्यामुळे अनेक प्रकारच्या स्टाईल्सचा पुरेपूर वापर केला गेला. इशिताच्या साडय़ा म्हणून तुम्ही कोणत्याही दुकानात विचारणा केली त्या तर तुम्हाला सहज मिळतील, इतकी ही फॅशन सर्वदूर पोहोचली आहे. साडीबरोबरच तिच्या ब्लाऊज स्टाईलने अनेक ट्रेंड सेट केले आहेत. बलून स्लीव्ज, पफ स्लीव्ज तर कधी थ्रीफोर्थ, लाॅंग स्लीव्जची  फॅशन तिने सेट केली. ब्लाऊजच्या नेकलाईनमध्येही खूप प्रकारचं वैविध्य देण्यात आलं आहे. इशिताप्रमाणे शगुन नावाच्या व्यक्तिरेखेलाही ती खलनायिका असून फॉलो केलं जातं आहे. शगुन साडी म्हणून तिच्या साडय़ांची फॅशन ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

अशा प्रकारच्या अनेक व्यक्तिरेखा आणि त्यांची फॅशन फॉलो केली जाते. यापूर्वीही ‘होणार सून मी या घरची’ मधील जान्हवीच्या मंगळसूत्रापासून तिच्या गाऊनपर्यंत अनेक गोष्टी लोकप्रिय झाल्या होत्या. अनेक पात्रं, मालिका आणि त्यांची फॅशन रोजच्या रोज फॉलो होतो. याचा फायदा अर्थातच सगळ्यांना होतो. मार्केटमध्ये त्या त्या पात्राचं नाव देऊन ही फॅशन विकली जाते. ग्राहकांनाही आपल्या आवडत्या व्यक्तिरेखांप्रमाणे फॅशन करायची संधी मिळते. त्यामुळे डेली सोप या नावाने घराघरातला अविभाज्य भाग झालेल्या या मालिका आता तरुणाईच्या फॅशन मार्गदर्शक ठरू लागल्या आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:27 am

Web Title: zee marathi serial actress shanaya and fashion
Next Stories
1 फॅशनदार : हानीकारक फॅशन
2 ‘जग’ते रहो : संस्कृती, संधी आणि बरंच काही..
3 ‘कट्टा’उवाच  : धडाकेबाज
Just Now!
X