प्रतिमा कुलकर्णी  pamakulkarni@gmail.com

प्रत्येक ‘हुनर’ आपापली खासियत घेऊन येतो. त्याला तंत्र म्हणा, विद्या म्हणा किंवा कला म्हणा. आपला हुनर आपण तंत्राच्या पातळीवरच अडकवून ठेवलाय की त्याला कलेच्या स्तरावर उंचावलंय हे ठरतं आपण त्यावर किती प्रेम करतो याच्यावर. खरं म्हणजे कुठचीही गोष्ट किंवा काम शिताफीने, सफाईने करणारी माणसं बघणं नेहमीच सुंदर असतं. त्यातूनही ते काम त्यांना मनापासून आवडत असेल, तर एखाद्या कलाकाराची कला बघण्याइतकाच आनंद मिळतो.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

ट्रॅफिक लाइटला थांबणं कुणालाच आवडत नसेल- मलाही नाही. पण मुंबईत असा एक सिग्नल आहे की तिथे थांबायला माझी हरकत नसते. तो म्हणजे सांताक्रूझ विमानतळाच्या समोर, फ्लाय ओव्हरच्या खाली असलेला मोठा सिग्नल. तिथे जवळपास पाच एक रस्ते मिळतात, आणि त्यातले सर्व सतत वाहते असतात. तिथे सिग्नल असला तरी ट्रॅफिक हवालदारांची गरज भासते कारण वाहतूक सुविहित आणि जलद होण्यासाठी काही गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. ते हवालदार ते ज्या प्रकारे नियंत्रित करतात ते पाहायला मला फार आवडतं. एखाद्या वाद्यवृंदाचा कंडक्टर एका लयबद्ध रीतीने सगळ्या वादकांना कंडक्ट करत असावा तसंच ती वाहतूक हाताळणाऱ्या हवालदारांना बघून वाटतं.

तिथे नेहमी तेच हवालदार असतात का मला माहीत नाही पण मध्यंतरी काही काळ माहीमला एक तरुणी हवालदार होती. तीसुद्धा ज्या पद्धतीने ट्रॅफिक हाताळायची ते बघायला मला फार आवडायचं. उंच, कायम हसतमुख असलेली ती तरुणी गणवेशात फार रुबाबदार दिसायची. तिने मला पकडावं असं मी कधी काही केलं नाही, पण जर तसं झालंच असतं, तर ‘मी तुझी फॅन आहे’ असं तिला सांगायचं ठरवलं होतं मी!

खरं म्हणजे कुठचीही गोष्ट किंवा काम शिताफीने, सफाईने करणारी माणसं बघणं नेहमीच सुंदर असतं. चप्पल शिवणारा मोची, समोरच्या कितीही महाग कापडाला बेधडक कात्री लावत कपडे बेतणारा आणि शिवणारा शिंपी, विविध रंग, आकार आणि तऱ्हा असणाऱ्या फुलांना बघता-बघता एका बुकेत रचणारा फ्लॉरिस्ट, हे सगळं बघायला फार मजा येते. त्यातूनही ते काम त्यांना मनापासून आवडत असेल, तर एखाद्या कलाकाराची कला बघण्या इतकाच आनंद मिळतो.

जपानला असताना माझी काही ठरावीक दुकानं होती. चहा मी कधी सुपर मार्केटमधून घ्यायचे नाही. माझं घर टोक्योच्या अशा भागात होतं की ज्याला मुंबईत गिरगाव किंवा पुण्यात सदाशिव पेठ म्हणता येईल. त्यामुळे पिढय़ान्-पिढय़ा तो व्यवसाय करत असलेली अनेक दुकानं तिथे होती. ज्या दुकानातून मी चहा घ्यायचे तिथली मालकीण तो ज्या पद्धतीने पॅक करायची ते लाजवाब होतं! घरातून निघतानाच ते पॅकिंग बघायला मिळणार याची एक्साइटमेंट लागून राहायची.

दूरचित्रवाहिनीवरचे ‘रेसिपी शोज’मध्ये पदार्थ करत असताना करणाऱ्यांचा वावर, त्यांचा आत्मविश्वास, हे फार मस्त वाटतं. स्वयंपाक करताना सगळ्यात अवघड काय असतं तर प्रमाण आणि वेळ- टायिमग! ते चुकलं तर सगळं ओमऽऽफस. आणि ते साधण्यासाठी माझी फार घालमेल होते. घालू की नको, इतकं घालू? का थोडं कमी-का थोडं जास्त..? हे असलं काही टेन्शन त्यांना नसतं. अगदी सहज, हसत-खेळत, गप्पा मारत ते पदार्थ करत असतात आणि ते फार सुंदर जमून येतात- निदान असं वाटतं!

अलीकडे खूप दिवसात मी दिग्दर्शक म्हणून शूटिंग केलेलं नाही. मध्ये-मध्ये अभिनय करण्यासाठी सेटवर जायचा प्रसंग येतो. सुरुवातीला मला फार कंटाळा यायचा आणि का ते कळायचं नाही. कारण खूप वेळ थांबून मग तासाभराचं काम असायचं. हे असंच असतं, त्याला कुणाचा इलाजही नसतो. आपल्याला कंटाळा येतोय या गोष्टीची मला फार लाज वाटायची. मग मी विचार केला की असं का होतं? तर लक्षात आलं की दिग्दर्शक म्हणून आपण नेहमी कामात असतो, सतत गडबड असते. मेकअप रूममध्ये बसून शॉटची वाट बघण्याची आपल्याला सवय नाही. हे समजल्याबरोबर मी सेटवर बसायला लागले. तिथे चाललेलं काम बघण्यात मस्त वेळ जातो. लाइट्स लागत असतात. कॅमेरा विभाग शॉटची आखणी करत असतो. सहायक एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर लढत असतात.. सेटवर बसायला लागले तेव्हा माझा कंटाळा पळून गेला.

वर उल्लेख बहुतेक गोष्टी आपल्याला दिसतात, साधारणपणे काय चाललंय ते समजतं आणि म्हणून त्याचं कौतुक वाटतं. मात्र काही जागा अशा आहेत की तिथे नक्की काय चालू आहे ते काही केल्या कळत नाही. संकलन आणि ध्वनिमुद्रण.

मी जेव्हा नवीन होते तेव्हा संकलन प्रत्यक्ष फिल्मवर चालत असे, एखादा शॉट कापला किंवा कमी केला तर नक्की काय केलं ते दिसत असे. प्रत्यक्ष तो सेल्युलॉइडचा तुकडा कापायचा, पुढच्या शॉटला जोडायचा, मग तो कापलेला तुकडा जपून ठेवायचा.. कारण त्यातला एखादा भाग परत लागण्याची शक्यता असते. गरज लागेल तेव्हा नेमका तुकडा मिळावा म्हणून त्यांना व्यवस्थित लेबल लावून, एका विशिष्ट पद्धतीने रचून ठेवायला लागायचा. संकलकांनी मागितला की बरोब्बर त्यांना हवा तो तुकडा लवकरात लवकर शोधून देणं हे सहायक म्हणून फार गर्वाची बाब होती माझ्यासाठी. त्यासाठी ते नक्की काय करतायत ते डोळ्यात तेल घालून पाहायला लागायचं. शिवाय डोक्यात सतर्क राहून आणि मनात कुतूहल ठेवून. स्मरणशक्ती तल्लख असेल तर ‘सोने पे सुहागा’.

पण अलीकडे संकलनातली ही सगळी मजा लुप्त झाली आहे. संकलक एका मोठय़ा डबल स्क्रीनवाल्या कम्प्युटरसमोर बसतो, कीबोर्ड आणि माऊसवर काहीतरी करतो किंवा करते आणि मग काही तरी होतं. मागे बसलेल्या आपल्याला काही पत्ता लागत नाही! माझ्या संकलकांवर माझा पूर्ण विश्वास आहे तरी मला फार असुरक्षित वाटतं! त्यांना सारखे प्रश्न विचारणं पण बरं वाटत नाही आणि मी मनातल्या मनात काळजी करत राहते. शेवटी सगळं झाल्यावर सलग एखादा सीन बघितला की मगच जीव भांडय़ात पडतो.

म्हणून आपण जुन्या काळात परत जावं असं मला मुळीच म्हणायचं नाही, पण गमतीची एक गोष्ट कमी झाली एवढं खरं!

ध्वनिमुद्रणाच्या बाबतीत ही तेच. आता रेकॉर्डिंगची प्रक्रिया इतकी बदलली आहे की तो रेकॉर्डिंस्ट काय करतोय हे तर कळत नाहीच, पण त्यांची भाषाही कळत नाही. रेकॉर्डिंग करणारी माणसं फार कमी बोलतात. म्हणजे कमी शब्दात बोलतात आणि तरीही त्यांना एकमेकांचं म्हणणं बरोब्बर समजतं! आजचे संगीतकार, गायक, वादक हे फक्त संगीतातच निपुण नाही आहेत, ते तंत्राच्या बाबतीत ही चोख आणि स्मार्ट आहेत. हे संकलक किंवा ध्वनिमुद्रक काम करता असताना त्यांना बघणं हे एक अप्रूप असतं.

प्रत्येक ‘हुनर’ आपापली खासियत घेऊन येतो. त्याला तंत्र म्हणा, विद्या म्हणा किंवा कला म्हणा. आपला हुनर आपण तंत्राच्या पातळीवरच अडकवून ठेवलाय की त्याला कलेच्या स्तरावर उंचावलंय हे ठरतं आपण त्यावर किती प्रेम करतो याच्यावर. ‘प्रपंच’मध्ये एका सीनचं लोकेशन मी एका लाइटबॉयच्या सांगण्यावरून बदललं होतं. सीनची सगळी तयारी झाली होती, रीहर्सलला सुरुवात होणार तेवढय़ात तो कुणाला तरी सांगत असताना ऐकलं- ‘‘यहाँ लाइटिंग का मजा नही आता!’’ इंदर त्याचं नाव. इंदर हुशार होता, वयाने लहान होता, जे वाटेल ते प्रामाणिकपणे बोलायचा आणि मनापासून काम करायचा. मी म्हटलं ठीक आहे, आणि तो सीन हलवला. काही लोक नाराज झाले कारण परत तेच करण्यात अर्धा तास जाणार होता- पण मी म्हटलं, हरकत नाही, प्रेमाने काम करणाऱ्या माणसासाठी ‘‘इतना तो बनता है!’’

chaturang@expressindia.com