प्रतिमा कुलकर्णी  pamakulkarni@gmail.com

विक्रम गोखले ‘बॅरिस्टर’च्या त्या प्रयोगात म्हणाला, ‘मी अजूनही माझ्या पहिल्या एन्ट्रीबद्दल समाधानी नाही!’ अनेक प्रयोग झाले असले तरी एका विशिष्ट भूमिकेत शिरून,  वेगळी व्यक्ती बनून रंगमंचावर  ‘पहिलं पाऊल’ टाकणं हे अवघड असतं हे मी त्या दिवशी शिकले. म्हटलं तर चार-पाच पावलांचाच काय तो प्रश्न! पण ती फार आव्हानात्मक असतात. त्या वेळी फक्त एक नवीन पात्र मंचावर येत नाही, एक अख्खी कहाणी, एक विधान, एक आयुष्य मंचावर पाऊल टाकत असतं. मैफील सुरू होताना गायक षड्ज लावतो, तशी असते प्रत्येक पात्राची पहिली एन्ट्री!

गेल्या लेखात ‘बॅरिस्टर’ नाटकाच्या बाबतीत मला दोन गोष्टी आठवतात, असं म्हटलं होतं. लेख परत वाचून पाहिल्यावर जाणवलं, की नाही- पूर्ण नाटकच माझ्या मनावर कोरलं गेलं आहे! मी म्हणतेय त्या आठवणी म्हणजेच नाटकाच्या आजूबाजूला घडलेल्या घटना आहेत. त्या लेखातून अनवधानाने असं ध्वनित झालं की पुढचा लेखही त्याच नाटकावर आहे. पण हा लेख त्या दुसऱ्या आठवणीशी निगडित आहे. दिग्दर्शक म्हणून काम करण्याआधी कसे कसे संस्कार होत गेले त्यातली ती एक महत्त्वाची आठवण आहे. त्यातही गमतीची गोष्ट ही की आपण आत्ता एक महत्त्वाची गोष्ट ऐकली ही जाणीव त्या वेळी नसते. पण काही कारणाने ती गोष्ट डोक्यात घोळत राहते आणि योग्य वेळ आल्यावर डोकं वर काढते.

ती आठवण अशी- चिंचवडच्या नाटय़गृहात ‘बॅरिस्टर’चा प्रयोग सुरू आहे. मी विंगेत उभी राहून माझा आवडता सीन डोळे विस्फारून बघतेय- तो माझा आवडता सीन होता- बॅरिस्टर आणि भाऊराव (प्रदीप वेलणकर) बोलतायत आणि बॅरिस्टर म्हणतोय- ‘‘भाऊराव माझ्याशी काही तरी बोला, बोलत राहा- नाही तर वेड लागेल मला!’’ त्या सीनमध्ये बॅरिस्टरचं मानसिक संतुलन आत्ता ढळेल की मग असं प्रत्येक क्षणी वाटत राहतं- बुद्धिमान माणसाला स्वत:बद्दल नको तितकी जाण असते- तसं त्याला हेही कळत असतं की आपल्या मनात जे चाललंय ते घातक आहे, भीषण आहे.. बॅरिस्टरची ती तगमग, ती घालमेल बघताना बघणाऱ्याचा जीव खालीवर होत असतो. भाऊरावच्या भूमिकेत प्रदीप वेलणकर ती तगमग बघत असतो, विलायती बॅरिस्टर काय म्हणतायत ते त्याला नीटसं कळत नाही, पण एक माणूस म्हणून त्यांचा दर्द त्याला समजतो, जाणवतोदेखील. त्याने तो हलून जातो.

त्या दिवशी तो सीन संपला आणि विक्रम गोखले विंगेत आला- (विक्रम आणि प्रदीपसारख्या ज्येष्ठ नटांचा एकेरी उल्लेख कुणाला खटकला तर माफ करा- अनेक वर्षांच्या जुन्या मैत्रीमुळे मी तसं म्हणतेय. दोघांबद्दल आदरार्थी बहुवचन वापरून पाहिलं, पण ते माझं मलाच खोटं वाटलं! असो.)

विक्रम विंगेत आल्यावर मी कौतुकाने त्याला सांगितलं की कितीही वेळा पाहिला तरी हा सीन मला बघावासा वाटतोच! त्यानंतर आणखीन थोडं काही तरी- विक्रम म्हणाला, ‘‘ते सगळं ठीक आहे, पण मी अजूनही माझ्या पहिल्या एन्ट्रीबद्दल समाधानी नाही!’’ मला ते जरा विचित्र वाटलं- पण त्याबद्दल खोलात जाऊन विचारण्याची ती वेळ नव्हती. मुळात प्रयोग चालू असताना असं बोलणं हेच चूक होतं, पण न राहवून मी ती चूक केली होती. पुढे प्रयोग चालू राहिला आणि मी विचार करत राहिले. अनेक प्रयोग झाले असले तरी एका विशिष्ट भूमिकेत शिरून, एक वेगळी व्यक्ती बनून रंगमंचावर पहिलं पाऊल टाकणं हे अवघड असतं हे मी त्या दिवशी शिकले.

पडद्यावर पहिली एन्ट्री म्हटलं तर सोपी असते. बरेच वेळा ते काम दिग्दर्शक आणि कॅमेरा करत असतो. जुन्या सिनेमांमध्ये तर ही गोष्ट फारच सोपी होती. उघडय़ा टपाची गाडी चालवत असलेली तरुणी दिसते- तिच्या केसाला स्कार्फ आणि डोळ्यावर गॉगल, तिला कुणी तरी तरुण छेडतो, मग ती गॉगल काढून त्याला विचित्र इंग्रजीत, ‘‘यू, अमुक तमुक..’’ असं म्हणते आणि आपल्याला कळतं की ही नायिका आहे, श्रीमंत घरची लाडावलेली मुलगी आहे किंवा विमानातून उतरली आणि कुणी तरी पुष्पगुच्छ दिला की आपण काय ते समजतो.

पण नाटकात तसं नसतं- आपली भूमिका, व्यक्तिरेखा अंगावर बाळगून रंगमंचावर पहिलं पाऊल टाकण्याचं पूर्ण ओझं त्या नटालाच वागवायचं असतं. फार तर त्याला संगीताची आणि प्रकाशयोजनेची साथ असेल. माझ्या नाटकांमध्ये मी नटासाठी ही गोष्ट शक्य तेवढी सोपी करायचा प्रयत्न करते, पण शेवटी मंचावर पाऊल त्यालाच टाकायचं असतं!

मध्यंतरी आम्ही हर्बेरियम उपक्रमाची मंडळी ‘गोष्ट तशी गमतीची’ नाटक बघायला गेलो. संध्याकाळच्या वेळी दादरहून पाल्र्याला पोचायला थोडासा उशीर झाला, नाटकाची पहिली पाच-एक मिनिटं चुकली. मी खुर्चीत बसल्या बसल्या सुनील बर्वे म्हणाला, ‘‘तू मंग्याची- (मंगेश कदम) एन्ट्री चुकवलीस, अफलातून होती’’- ती एन्ट्री चुकल्याची रुखरुख अजून आहे- तेवढय़ासाठी परत एका प्रयोगाला जावं म्हणतेय!

‘घाशिराम कोतवाल’ नाटकात नाना फडणवीसांची एन्ट्री मोठय़ा झोकात मेण्यातून होते, तर ‘महानिर्वाण’ नाटकातला नाना येतो तो आटय़ापाटय़ा खेळत, चाळकऱ्यांच्या सहानुभूतीचा मारा चुकवत!

अलीकडच्या काळात ‘लग्नबंबाळ’ नाटकातली मधुरा वेलणकरची पहिली एन्ट्री विशेष लक्षात राहिली. कारण ज्या पद्धतीने ती मंचावर आली, त्यात ती कोण आहे, कशी आहे, कशासाठी इथे आली आहे, आत्ता तिच्या मनात काय चाललंय, हे सगळं व्यक्त होत होतं! म्हटलं तर चार-पाच पावलांचाच काय तो प्रश्न! पण ती फार आव्हानात्मक असतात. त्या वेळी फक्त एक नवीन पात्र मंचावर येत नाही, एक अख्खी कहाणी, एक विधान, एक आयुष्य मंचावर पाऊल टाकत असतं. मैफील सुरू होताना गायक षड्ज लावतो, तशी असते प्रत्येक पात्राची पहिली एन्ट्री!

‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात पहिल्या एन्ट्रीबद्दल अनवधानाने मी एक चांगलाच धडा शिकले! त्याबद्दल मी इतर ठिकाणीही लिहिलं आहे, पण धडा महत्त्वाचा आहे म्हणून पुनरावृत्तीची हिंमत करतेय. जसं प्रत्येक पात्र आपला षड्ज लावत स्टेजवर येतं, तसं कुठचंही नाटक सुरू होताना त्याचा सूर स्पष्ट होतो. तो केवळ आवाजाचा सूर नसतो, तर पूर्ण नाटकाचा विषय काय आहे, तो कशा पद्धतीने मांडला जाणार आहे, वृत्ती काय आहे, हे सगळं त्यातून व्यक्त होत असतं.

‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या पहिल्या प्रवेशात स्वातंत्र्यसूर्य कोटीभास्कर यांची सत्ताविसावी पुण्यतिथी आहे आणि त्यांची दोन पिल्लं आपल्या वडिलांची स्मृती जागवायला येणाऱ्या ‘प्रचंड’ गर्दीची वाट पाहत आहेत, पण कुणीच येत नाही आहेत. लोकांना भावनिक आवाहन म्हणून ते समरगीतं लावतात, घोषणा देतात, पण शेजारीपाजारी फक्त निषेध करतात,

येत कुणीच नाही. पडदा उघडल्यावर काही क्षणातच हे सगळं व्यक्त होतं. बराच वेळ हे चाललेलं असल्यामुळे वाट बघण्यामध्ये एक हताशपणा आणि म्हणूनच थोडा कर्कश्शपणा आला आहे. म्हणजेच नाटकाची सुरुवात थोडी तीव्र सुरात होते.

एका प्रयोगात कुणाला वाटलं की जे पात्र पडदा उघडताना मंचावर हजर असतं त्याचं अस्तित्व फारसं अधोरेखित होत नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की एका पात्राला एन्ट्री द्यायची. त्यांनी रीतसर माझी परवानगी घेतली आणि मी ती दिली! पडदा उघडला, त्याने एन्ट्री घेतली आणि काही तरी चुकलंय हे माझ्या लक्षात आलं. एन्ट्री घेतल्यामुळे त्यांचं वाट बघणं तिथपासून सुरू झालं आणि त्यांचा सूर तीव्र झालाच नाही! माझ्या मते पहिला पूर्ण अंक पडला. कारण ते नाटक सीमलेस आहे. त्यात एकही ब्लॅक आउट नाही. त्यामुळे नाटकाला उठायला संधीच मिळाली नाही!  त्या प्रयोगाचा धडा- पूर्ण नाटक जर रंगायला हवं असेल, तर त्याचं ‘पहिलं पाऊल’ योग्य पडायला पाहिजे..

chaturang@expressindia.com