प्रतिमा कुलकर्णी

पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे- ती आपल्याला, प्रत्येक वस्तूला तिच्याकडे खेचून घेते- मग ज्या अणूपासून सगळं बनलेलं आहे, त्या अणूमधले मूलकण पृथ्वीकडे नाही तर एकमेकांकडे कसे खेचले जातात? हा चमत्कार नाही तर काय? उत्तर माहीत नाही, पण विचार केला की मन विस्मयानं भरून जातं! मानवी बुद्धीवर श्रद्धा जरूर असावी, निष्ठाही असावीच, पण विस्मय वाटण्याची क्षमता झाकोळू नये.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

दहावीत आम्हाला एक धडा होता. एका सभेसमोर एक जादूगार जादूचे खेळ करत असतो. समोर प्रेक्षकांमध्ये एक चतुर इसम बसलेला असतो. जादूगाराने एखादा खेळ केला की लगेच तो चतुर माणूस शेजारच्या माणसाच्या कानात कुजबुजतो- ‘‘ही हॅज इट अप हिज स्लीव! त्यांनी ते त्यांच्या बाहीत लपवलं आहे!’’ जादूगाराच्या हे लक्षात येत असतं. एका मागून एक खेळ होत असतात. शेवटचा एक खेळ उरतो. जादूगाराला जादू दाखवण्यासाठी एक घडय़ाळ हवं असतं. तो त्या चतुर माणसाकडे त्याचं घडय़ाळ मागतो आणि सांगतो की आता शेवटची जादू बघा, ‘‘मी हातोडय़ाने या घडय़ाळाचे तुकडे करून ते परत पहिल्यासारखं करून दाखवणार आहे!’’

चतुर माणूस मोठय़ा खुशीनं आपलं घडय़ाळ काढून देतो, जादूगार हातोडय़ानं त्याचा चक्काचूर करतो, बाह्य़ा झटकतो.. पण त्यातून काहीच बाहेर पडत नाही. ‘‘माझी जादू फसली, सॉरी!’’ असं म्हणून जादूगार सगळ्यांसमोर त्याची माफी मागतो- आणि तो चुरा परत देताना त्या चतुर गृहस्थाला सांगतो- माझ्या बाहीमध्ये ते नव्हतं! ‘‘आय डिड नॉट हॅव इट अप माय स्लीव!’’

जादूगार हवेतून काहीच निर्माण करू शकत नाही हे सगळ्यांनाच माहीत असतं. त्या नजरबंदीच्या खेळामध्ये तो आपल्याला गुंतवतो आणि आपली तर्कबुद्धी जाणूनबुजून बाजूला ठेवून आपण विस्मयचकित होऊन ते पाहतो. ज्याला तसा विस्मय वाटू शकत नाही आणि जो दुसऱ्यालाही त्याची मजा घेऊ देत नाही, त्याचं घडय़ाळ तर जातंच, पण तो एका थ्रिलिंग अनुभवाला मुकतो..

आपल्याकडे जसा पितृ पक्ष असतो, तसाच आणि त्याच काळात जपानमध्ये असतो आणि त्याला ‘ओबॉन’ म्हणतात. आपल्याकडे आपण नवरात्रात भोंडला किंवा गरबा खेळतो, तिथे ‘ओबॉन’च्या काळात नाच करतात, त्या नाचाला ‘बॉन ओदोरी’ म्हणतात. तोकुशिमा नावाच्या एका गावात सलग तीन दिवस आणि तीन रात्री रस्त्यावर हा नाच चालू असतो. अनेक लोक नाचत असतात आणि तितकेच बघत असतात. तोकुशिमाचा ओबॉन उत्सव हे एक ‘टुरिस्ट अट्रॅक्शन’ आहे. नाचाबरोबर गाणीही असतात. त्यांच्या गाण्यांपैकी एका गाण्याचे शब्द आहेत- ‘‘नाचणारे पण वेडे आणि बघणारे पण वेडे, दोघही जर वेडेच तर न नाचण्यात शहाणपणा तो काय?’’  हे खूप ढोबळ भाषांतर आहे, पण त्यातला मुद्दा असा आहे की ‘‘या, नाचा, नका सतत सावध राहू, कधी तरी भान हरपा, कधी तरी शहाणपणाचं, बुद्धीचं जोखड झुगारून द्या..’’

‘प्रपंच’मध्ये कालिका म्हणते- ‘‘शहाण्या माणसाला वेडेपणा करता येत नसेल तर शहाणा असण्यात शहाणपणा कसला?’’

परवा नाटय़ संमेलन झालं, देवल पुरस्कारांच्या दरम्यान संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार नाटय़संगीताबद्दल बोलत होत्या. त्या म्हणाल्या- लोक नाटय़गीतांवर टीका करतात, जसं ‘सुकांत चंद्रानना’मध्ये- ती चंद्रानना इथे यायला निघाली आहे, एव्हाना येऊन पोचलीच असेल, तिच्या पायातले चाळ ऐकू येतायत आणि हा इथे निवांत ताना घेत बसलाय! पण आपण हे लक्षात घ्यायला हवं की ते पद म्हणजे नायकाच्या मनातली भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. तो एक गोठलेला क्षण आहे, काळ तिथे थांबलेला आहे.

एखाद्याला हे कळेल, एखाद्याला नाही कळणार- पण त्या क्षणी जे मनातल्या सतत, सावध तर्काला बाजूला ठेवू शकतात- त्यांना ‘विस्मय’ भारून टाकतो. असं विस्मय वाटता येणं ही भाग्याची गोष्ट आहे. तर्क असतोच, बुद्धीही असते पण प्रसंगी तिला एका हाताच्या अंतरावर ठेवता आलं नाही तर खूप आनंदाचे क्षण आपण गमावून बसतो. हे बुद्धी ‘डोईजड’ झाल्याचं लक्षण आहे!

इंग्रजी कवी साम्युएल टेलर कोलरीजने याला ‘विलिंग सस्पेन्शन ऑफ डीस्बिलीफ’ असं नाव दिलं- की एखादी कविता वाचताना, नाटक-सिनेमा बघताना आपल्याला माहीत असतं हे खोटं आहे, तरीही आपण त्यात वाहवत जातो, कारण आपण स्वत:हून आपली अविश्वासाची भावना, चिकित्सक विचार बाजूला ठेवून स्वत:ला त्या प्रवाहात झोकून दिलेलं असतं.

काही दिवसांपूर्वी एक नाटक बघितलं- ‘वेलकम जिन्दगी!’ मला आवडलं ते नाटक. तसं गिरीश ओकला सांगितलं तर तो म्हणाला- ‘‘तुला वाटलो मी १०२ वर्षांचा?’’ त्याला म्हटलं मी त्या दृष्टीने पाहिलंच नाही! वृद्ध माणसं आणि त्याचं जगणं- या विषयी नाटकाचं काही म्हणणं आहे आणि ते पोचलं माझ्यापर्यंत- अगदी रंजक पद्धतीने पोचलं! एप्रिलमध्ये मी गोव्याला गेले होते आणि तिथे दोन वृद्ध माणसांच्या भेटी झाल्या. त्यातले एक पणजीचे डॉ. वैद्य – वय १०० आणि दुसरे ‘गोवा हिंदू असोसिएशन’चे रामकृष्ण नाईक- वय ९०च्या पुढे!- डॉ. वैद्य अजूनही रात्री जागून फुटबॉलच्या मॅचेस बघतात, नाईक काका दोन महिन्यांपूर्वी मुंबईला येऊन गेले, अजून ‘गोवा हिंदू असोसिएशन’ मध्ये रस घेतात. या दोन ज्येष्ठांना नुकतीच भेटल्यामुळे वृद्ध माणसांचं शरीर कितपत चालतं, किती गतीने हे मी जवळून पाहिलं आहे. पण नाटकाचा विषय तो नाही. नाटक काही एक म्हणू पाहतंय, त्याचं एक विधान आहे. त्यात मी गुंतले, मला मजा आली, नाटकाचं म्हणणं पटलं- १०२ वर्षांचा माणूस कसा असतो हे दाखवणं हा काही त्या नाटकाचा उद्देश नाही.

इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे- मिसिंग द वूड फॉर द ट्रीज- नक्की कशाकडे लक्ष द्यायचं हे कळलं नाही तर असा घोळ होऊ शकतो. एक-एक झाड बघत त्याची चिकित्सा करताना अख्खं जंगल किती सुंदर आहे हे दिसलंच नाही! बघायला गेलं तर तर्काच्या, मानवी बुद्धीच्या पलीकडे किती तरी गोष्टी आहेत, ज्या विस्मयचकित करतात.

माझं बुद्धीशी वैर नाही, पण सतत बुद्धीला डोक्यावर चढवून प्रत्येक अनुभव तर्काचा काटय़ावर तोलून बघणं मला कंटाळवाणं वाटतं. कॉलेजमध्ये असताना एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये एका मित्राला भेटायला गेले. तिथे एका अनोळखी माणसाने मला विचारलं, तुझा चमत्कारांवर विश्वास आहे का- त्यांच्या बोलण्याचा एक विशिष्ट रोख होता आणि तो मला कळलाही होता- तरी त्याच्या अभिनिवेशी प्रश्नाला तितक्याच अभिनिवेशात मी उत्तर दिलं- ‘‘माझा फक्त चमत्कारांवरच विश्वास आहे! सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि रात्रीनंतर न चुकता दिवस उजाडतो, हा चमत्कार नाही तर काय आहे!’’ तेव्हा फक्त त्या माणसाला निरुत्तर करण्यासाठी म्हणून दिलेलं ते उत्तर माझ्या मनात कित्येक र्वष, अगदी आजपर्यंत घोळत राहिलं आणि भोवताली बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.

पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे- ती आपल्याला, प्रत्येक वस्तूला तिच्याकडे खेचून घेते- मग ज्या अणूपासून सगळं बनलेलं आहे, त्या अणूमधले मूलकण पृथ्वीकडे नाही तर एकमेकांकडे कसे खेचले जातात? हा चमत्कार नाही तर काय? काय आहे याचं गणित आणि कुणी ठरवलं हे? उत्तर माहीत नाही, पण विचार केला की मन विस्मयाने भरून जातं! मानवी बुद्धीवर श्रद्धा जरूर असावी, निष्ठाही असावीच, पण विस्मय वाटण्याची क्षमता झाकोळू नये.

केला रवीने निज ताप दूर,

वाहे हराया श्रम हा समीर

वैशाखमासी प्रतिवर्षी येती

आकाशमार्गे नाव मेघपंक्ती

नेमेची येतो मग पावसाळा

कौतुक हे सृष्टीचे जाण बाळा

pamakulkarni@gmail.com