अलीकडच्या काळात भारतातही प्रक्रियायुक्त बटरचा वापर केलेले पफ्ड पदार्थ व चरबीयुक्त पदार्थ यांचा सुळसुळाट झाला आहे. ते विशिष्ट चवीमुळे जास्त प्रमाणात सेवन केले जातात, पण प्रक्रियायुक्त बटर व चरबीयुक्त तसेच तळकट पदार्थ यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागाला भूक नियंत्रित करण्याची संवेदनाच राहत नाही. परिणामी, नवीन पिढीत लठ्ठपणा वाढत आहे, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे संपृक्त मेदयुक्त पदार्थ आहारातून वगळलेले चांगले असे म्हणायला हरकत नाही. इटलीतील नेपल्स फेडेरिको टू विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे, की चरबीयुक्त तळकट पदार्थामुळे किती खावे याचे संवेदनात्मक नियंत्रणच मेंदू गमावून बसतो. किती खावे, कुठे थांबावे याचे माणसाचे भान या पदार्थामुळे सुटते, त्यामुळे फ्राइड (तळकट) पदार्थ किंवा प्रक्रियायुक्त बटरचे पदार्थ टाळलेले बरे. त्यामुळेच जगातील अनेक लोकांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला आहे. उंदरांवर संपृक्त मेदामुळे बोधनक्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे भुकेवर व खाण्यावर कुठलेही नियंत्रण राहत नाही. मेदयुक्त अन्नपदार्थ मेंदूच्या हायपोथॅलॅमस या भागावर परिणाम करतात. हा भाग भूक नियंत्रित करीत असतो. लोकांच्या उत्तम प्रकृतीसाठी आहार कसा असावा यावर आता खूप संशोधन होते आहे, पण जास्त मेद असलेल्या आहाराने चयापचयाच्या क्रियेवर काय परिणाम होतो याचाही अभ्यास झाला, पण मेंदूवर नेमका काय परिणाम होतो हे समजले नव्हते, असे मारिया पिना मोलिका व मरियाना ख्रिसपिनो यांनी सांगितले. प्रक्रियायुक्त मेदाने परिपूर्ण आहार वाईट असतो. त्यात चरबी, प्रक्रिया केलेले बटर व तळकट अन्नपदार्थाचा समावेश होतो. मासे, अ‍ॅव्होकडो व ऑलिव्ह तेल हे यातील मेद मात्र अंसपृक्त व चांगले असतात. चरबी खाण्यापेक्षा माशाच्या तेलाने चांगला परिणाम होतो. त्यामुळे मेंदूचे कार्य योग्य चालते व वारंवार खा-खा होत नाही. मेदयुक्त आहाराचा मानवी मेंदूवर व परिणामी प्रकृतीवर होणारा परिणाम प्रथमच तपासल्याचा दावा क्रिस्पिनो यांनी केला. ‘फ्रंटियर्स इन सेल्युलर न्यूरोसायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)