भारतातील भीषण वैद्यकीय परिस्थिती ’ केंद्र सरकारची माहिती
भारतात १ हजार ६८१ रुग्णांमागे सरासरी एक डॉक्टर असल्याची माहिती राज्यसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली. अ‍ॅलोपॅथी आणि एयूएम (आयुर्वेदिक, युनानी आणि होमीओपॅथी) प्रवाहातील डॉक्टरांच्या संख्येची वर्गवारी लक्षात घेतली तरी एकूण लोकसंख्येतील ८९३ रुग्णांमागे सरासरी एक डॉक्टर असे प्रमाण येईल, असे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत सांगितले.
राज्य वैद्यकीय आयोग आणि केंद्रीय वैद्यकीय आयोग यांच्याकडे नोंद झालेल्या माहितीनुसार देशात ९ लाख ५९ हजार १९८ डॉक्टर आहेत. त्यातील फक्त ८० टक्के डॉक्टर जरी कार्यरत असल्याचे गृहीत धरले, तरी साधारण ७.६७ लाख डॉक्टर आरोग्याशी निगडित सेवा देत असल्याचे सव्रेक्षणातून समोर येते. त्यानुसार एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आणि उपलब्ध डॉक्टरांच्या संख्येच्या वर्गवारी प्रमाणे १,६८१ रुग्णांमागे प्रत्येकी एक डॉक्टर असे समीकरण तयार होते. त्यापैकी देशात ६.७७ लाख एयूएम डॉक्टर असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.
देशाच्या आरोग्यसेवेला बळकटी यावी यासाठी डॉक्टराची संख्या वाढवण्यावर केंद्रीय स्तरातून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठीच्या जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर राज्य आणि केंद्रशासन अखत्यारीत वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता आणि आधुनिकीकरणावर भर देण्यात आली आहे. एमबीबीएससाठीच्या जागा वाढवण्याला अनुमती दिली जात आहे, तर विविध जिल्ह्य़ांबरोबर देशातील आवश्यक आरोग्य सेवा नसलेल्या जिल्ह्य़ांमध्येही रुग्णालये उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे, असे नड्डा यांनी सांगितले.

‘अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील त्रुटी दूर करणार’
अवयवदानाबाबत असलेल्या अनास्थेमुळे देशात मानवी अवयवांच्या प्रत्यारोपण प्रक्रियेत खूप मोठी दरी असल्याचे मत नड्डा यांनी व्यक्त केले. दर वर्षी जवळपास दोन लाख मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण होणे आवश्यक आहे. पण सद्य:स्थितीला केवळ सहा हजार मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. वर्षांला ३० हजार यकृतांची गरज असताना प्रत्यारोपणासाठी केवळ दीड हजार यकृत उपलब्ध होतात. ५० हजार हृदयांची गरज असताना केवळ १५ हजार हृदय उपलब्ध होतात, असे त्यांनी संसदेत सांगितले.