भारतात गतवर्षी १.९६ लाख जणांना एचआयव्ही विषाणूंची लागण झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. तर जगभरात एकूण २५ लाख जणांना या विषाणूंची लागण झाली आहे.  ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसेस’ (जीडीबी) यांनी ‘द लँसेट’ या एचआयव्ही नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. तसेच, भारतात २८.८१ लाख लोक एचआयव्हीसह जीवन जगत असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २००५-२०१५ या कालावधीत ०.७ टक्के या गतीने एचआयव्हीचा प्रसार झाला. तर १९९७ ते २००५ या कालावधीत एचआयव्ही प्रसाराचा वेग २.७ टक्के इतका होता.

‘जीडीबी’ने दिलेल्या माहितीनुसार एचआयव्हीसह जगणाऱ्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून २००० मध्ये २७.९६ दशलक्ष असलेली ही रुग्णसंख्या २०१५ पर्यंत ३८.८ दशलक्ष इतकी झाली आहे. एचआयव्ही/एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मात्र घट झाली आहे. २००५ मध्ये एचआयव्ही/एड्समुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १.८ दशलक्ष इतकी होती ती २०१५मध्ये १.२ दशलक्षपर्यंत कमी झाली आहे. एचआयव्ही/एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या घटविण्यात ‘अँटायरट्रोव्हायरल’ (एआरटी) उपचारांचा मोठा वाटा असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. २००५ ते २०१५ या कालावधीत ‘एआरटी’ उपचारांमुळे एचआयव्ही/एड्स रुग्णांमध्ये पुरुषांचा जगण्याचा कालावधी ६.४ वरून ३८.६ टक्के इतका तर महिलांचा ३.३ वरून ४२.४ टक्के वाढला. नव्याने एचआयव्ही विषाणूंची बाधा होण्याचे प्रमाण घटले असून १९९७ मध्ये ३.३ दशलक्ष असलेले हे प्रमाण २.५ दशलक्ष इतके कमी झाल्याचे संशोधकांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)