तुम्ही एखाद्या अॅपवरुन किंवा सोशल नेटवर्किंग साईटवरुन भेटलेल्या एखाद्या मुलीला डेट करत असलात तर वेळीच सावध व्हा. कारण या मुलीला तुमच्या कमी आणि तुमच्याबरोबर डेटवर गेल्यावर खाण्यामध्ये जास्त रस असू शकतो. नाही हे आम्ही नाही म्हणत आहोत तर असा दावा एका संशोधनानंतर अमेरिकेतील एका विद्यापिठाने केला आहे. डेटिंग करणाऱ्या चार मुलींपैकी एकजण ही केवळ खाण्यासाठी एखाद्या मुलाला डेट करत असते असा दावा या संशोधनानंतर समोर आलेल्या निष्कर्ष अहवालात करण्यात आला आहे. या अशा वागण्याला फूडी कॉल असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीमध्ये भावनिक दृष्ट्या रस नसतानाही केवळ फुकट खाणे मिळवण्यासाठी महिला एखाद्याला डेट करतात असं या अहवालात म्हटलं आहे.

कॅलिफॉर्नियातील अझुसा पॅसिफिक विद्यापीठ आणि कॅलिफॉर्निया मर्स्ड विद्यापिठाने संयुक्तरित्या एक ऑनलाइन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामधील २३ ते ३३ टक्के महिलांनी आपण केवळ फुकट खाणे मिळते म्हणून एखाद्याला डेट करत असल्याचे मान्य केले आहे. या सर्वेक्षणामध्ये व्यक्तीमत्वाच्या बाबतीत मानसिक दृष्ट्या दुबळी, धूर्तपणा, आत्मप्रीतिवाद या तीन्ही गोष्टींचा परिणाम जाणवणाऱ्या आणि स्त्री-पुरुष यांच्या कामांबद्दल पारंपारिक विचारसरणी असणाऱ्या महिला अशाप्रकारे फुकट खाण्यासाठी डेट करण्याची शक्यता अधिक असते असं या अभ्यासातून समोर आलं आहे. या महिला अनेक पद्धतीने केवळ मोफत अन्नासाठी समोरच्याबरोबर भावनिक नातं असल्याचा दिखावा करत असतात असं ब्रायन कोलिसन सांगतात. ब्रायन यांनी या विषयावर संशोधन केल्यानंतर लिहिलेला प्रबंध ‘सोशल सायकोलॉजीकल अॅण्ड पर्सनॅलिटी सायन्स’ जनरलमध्ये छापून आला आहे.

या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ८२० महिलांना सहभाग घेतला. व्यक्तीमत्वासंदर्भातली अनेक प्रकारच्या प्रश्नांना या महिलांनी उत्तरे दिली. या उत्तरांच्या माध्यमातून या महिलांचे व्यक्तीमत्व कसे आहे, त्यांना स्त्री-पुरुष समानतेबद्दल काय वाटते आणि फूडी कॉलसंदर्भात त्यांचा इतिहास काय आहे याची माहिती संशोधकांना मिळाली. या महिलांना मोफत जेवणासाठी एखाद्याला डेट करणे सामाजिक दृष्ट्या योग्य वाटते का असा प्रश्न विचारण्यता आला आहे. त्यावेळी २३ टक्के महिलांनी ‘होय आम्ही मोफत जेवणासाठी एखाद्याला डेट केले आहे’ अशी कबुली दिली. ‘काहीजणी मोफत जेवणाठी नेहमीच डेट करतात तर काहीजणी कधी कधी जेवणासाठी एखाद्याबद्दल खोट्या भावनांचे प्रदर्शन करतात. अशाप्रकारे वागण्यात काहीच गैर नाही’ असं चारपैकी एका महिलेला वाटते. तर उर्वरित तिघींना हे कमी अधिक प्रमाणात चुकीचे वाटते असे या अहवालात म्हटले आहे.

दुसऱ्यांदा ३५७ जणींना हेच प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यापैकी ३३ टक्के महिलांनी होय आम्ही केवळ फुकट जेवणासाठी एखाद्या व्यक्तीला डेट केलं आहे असं सांगत फूडी कॉल्स केल्याचे मान्य केले. काही प्रकरणांमध्ये पुरुषही मोफत खाण्यासाठी खोट्या प्रेमाचा आव आणतात असंही या अहवालात म्हटलं आहे.