सोशल मीडिया आणि त्यामध्ये होणारे हॅकिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. गुगल सिक्युरीटीलाही न जुमानता हे अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये आले असून जवळपास दहा लाखांहून अधिक यूजर्सनी ते डाऊनलोड केल्याचं समोर आलं आहे. हे अॅप्लिकेशन व्हॉटसअॅपप्रमाणेच दिसत असल्याने ग्राहकांनी ते डाऊनलोड केलं असण्याचीच शक्यता जास्त आहे. गुगल प्ले स्टोअरवर मूळ व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन WhatsApp Inc या नावाने आहे. मात्र हे बनावट अॅपही याच नावाने आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल झाली.

विशेषतः एखादे अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना आपण मोबाईलमध्ये सर्च केल्यावर आपल्याला साधारण तीन ते चार पर्याय दिसतात. मग अॅप्लिकेशन योग्य असल्याचे ओळखण्यासाठी युझर्स डेव्हलपरचं नाव वाचतात. मात्र या बनावट डेव्हलपरने आपले नावही मूळ व्हॉटसअॅपच्या नावाप्रमाणेच दिल्याने ग्राहकांची फसवणूक झाली आहे. व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे ही समस्या गंभीर असून गुगलने त्याकडे वेळीच योग्य ते लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्हीही तुमचं अॅप बनावट आहे, की खरं हे तातडीने तपासून पाहा.