News Flash

गरे, आठळी, पानं, चीक सारं सारं काही आरोग्यदायी; जाणून घ्या फणसाचे १० फायदे

फणस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे, परंतु फार गरे खाल्ल्यास...

गरे, आठळी, पानं, चीक सारं सारं काही आरोग्यदायी; जाणून घ्या फणसाचे १० फायदे

-डॉ. शारदा महांडुळे

सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे. त्यातही बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. संस्कृतमध्ये बीजपूर अज्जीरं, मराठीत फणस, तर इंग्रजीत जॅकफ्रुट व शास्त्रीय भाषेत अटरेकारपस हेट्रोफायलस या नावाने प्रसिद्ध असलेल्या फणसात अनेक औषधी गुणधर्म आहेत. फणस हे अरटिकसी या कुळातील आहे. तर बरका व कापा फणस अशा त्याच्या दोन जाती आहेत. कापा प्रकारात मधुर चविष्ट व कडक गरे आढळतात व हे गरे पिवळ्या रंगाचे असतात तर बरकामध्ये गोड व लिबलिबीत नरम व पांढरे गरे आढळतात. फणसावर जाड काटे असतात. फणसाचे गरे व आठळे दोन्हीमध्येही औषधी गुणधर्म आहेत. फणसाचे साधारणपणे वजन २०-२२ किलोपासून ४० किलोपर्यंत असते.

औषधी गुणधर्म –

पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो.

फणसाचे गर व आठळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते तसेच प्रथिने, मेद, खनिजे, आद्र्रता, तंतुमय, पिष्टमय पदार्थही असतात. या सर्व गुणधर्मामुळे शरीर संवर्धनासाठी, पचनशक्ती वाढविण्यासाठी फणसाचा उपयोग होतो.

उपयोग –

१)
फणसाचे गरे सुकवून नंतर त्याचे दळून पीठ करून त्याची पातळ पोळी किंवा पुरी बनविल्यास वर्षभर फणसाचा आस्वाद घेता येतो.

२)
लहान मुलांना ही फणसाची पोळी खाण्यास द्यावी, यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते.

३)
फणसांच्या गऱ्याची खीर व कढीही उत्कृष्ट होते. तसेच फणसापासून जाम, जेली, मुरंबा तयार करता येतो. हे सर्व पदार्थ लहान मुलांना आवडतात म्हणून या सर्व पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. कच्च्या फणसाची भाजी बनवावी तसेच आठळ्या ओल्या असताना त्यांची भाजी बनवावी किंवा वाफवून आंब्याच्या कोयीप्रमाणे खावीत.

४)
फणसाची बी सुकवून दळून त्याचे पीठ बनवावे व या पिठाचा वापर भाजीत, आमटीत रश्श्यासाठी करावा किंवा त्याची थालिपीठे बनवावीत. हे अत्यंत पौष्टिक असल्याने अशक्तपणा, जुना ताप, कृशव्यक्ती यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आठळीच्या पिठाचा वापर करावा. आठळीच्या पिठापासून खीरही बनविता येते. रुग्णांसाठी खीर बनवून तिचा वापर करावा.

५)
फसणाचे गरे, लहान मुलांच्या शक्तीप्रमाणे खाण्यास द्यावे. त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो.

६)
फणसाची मुळे अतिसारावर उपयोगी पडतात.

७)
फणसाची आठळी भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.

८)
सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो.

९)
फणसाचा चीक शरीरावर जर बेंड आले असेल तर उपयोगी पडतो. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी होऊन ते पिकते व त्यात असणाऱ्या ‘पू’चा निचरा होतो.

१०)
कृशव्यक्तींनी वजन वाढविण्यासाठी रोज ७-८ फणसाचे गरे खावेत किंवा त्याच्या आठळ्याची खीर करून खावी.

सावधानता –

फणस हे पौष्टिक असल्याकारणाने ते शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे, परंतु फार गरे खाल्ल्यास त्यामध्ये असणाऱ्या एन्झाइममध्ये अपचन होऊन जुलाब होतात. म्हणून सहसा फणस जेवण झाल्यावर खाऊ नये.

फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यावर नागवेलीचे पान खाल्यास पोट फुगते व खूप त्रास होतो. अशा वेळी लिंबूपाणी प्यावे. त्यामुळे पोटफुगी कमी होते.

पोट जास्त भरलेले नसताना मधासोबत गरे खाल्ल्यास बाधत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 5:56 pm

Web Title: 10 reasons why the jackfruit is super healthy scsg 91
Next Stories
1 कारल्याच्या रसाचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?
2 तब्बल 6000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा सेटअप, नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन भारतात लाँच
3 फ्लिपकार्टचं आता ‘हायपरलोकल डिलिव्हरी’ क्षेत्रात पाऊल; जाणून घ्या काय आहे ही सेवा?
Just Now!
X