News Flash

मोबाईल हेडफोन्स वापरताय? सावधान… ११० कोटी लोकांना आहे बहिरेपणाचा धोका!

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

मोबाईल हेडफोन्स वापरताय? सावधान… ११० कोटी लोकांना आहे बहिरेपणाचा धोका!
बहिरेपणाचा धोका

शहरामधील जीवनमान हे ग्रामीण जीवनमानापेक्षा अधिक धावपळीचे आणि धकाधकीचे असते. शहरामधील प्रदूषण, आवाज, तणाव, जेवणाच्या पद्धती यांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यातही ध्वनीप्रदुषणामुळेही अनेकांना त्रास होतो. म्हणूनच शहरांमध्ये कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणारे अनेकजण गाड्यांच्या आणि इतर आवाज ऐकण्याऐवजी इयरफोन्स किंवा हेडफोन्स कानाला लावून गाणी ऐकत प्रवास करणे पसंत करतात. मात्र आता या कृत्रिम ध्वनीप्रदुषणाचा धोका अधिक वाढला असल्याचे एका संशोधनामधून समोर आले आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार जगातील ११० कोटी लोकांना बहिरेपणाचा धोका आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्यूएचओ) नुकताच हा अहवाल जाहीर केला आहे. दैनंदिन जिवनात लोकांवर ध्वनी प्रदूषणाचा काय परिणाम होतो यासंदर्भातील एका संशोधनानंतर हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार कानामध्ये रोज हेडफोन टाकून मोठ्याने गाणी ऐकण्याची सवय असणाऱ्यांना बहिरेपणा येण्याचा धोका अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जगातील ११० कोटी लोकांना बहिरेपणा येऊ शकतो अशी शक्यता या अहवालात ‘डब्यूएचओ’ने व्यक्त केली आहे. त्यातही हेडफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत राहिला तर जगभरामधील १२ ते ३५ वयोगटातील तरुणांना लवकरच बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो असंही या अहवालात म्हटले आहे.

कोणतीही सामान्य व्यक्ती ८५ डेसिबलपर्यंतचा आवाज आठ तासांसाठी किंवा १०० डेसिबलचा आवाज १५ मिनिटांसाठी सहन करु शकते. मात्र यापेक्षा जास्त आवाज कानावर पडत राहिल्यास कानातील आती भागावर परिणाम होऊन बहिरेपण येऊ शकते. दैनंदिन जिवनामध्ये एकमेकांशी साधला जाणारा संवाद हा ६० डेसिबल इतक्या आवाजात असतो.

हेडफोन्स वापरणाऱ्या जागतील एकूण तरुणांपैकी ५० टक्के तरुणांच्या कानावर सतत क्षमतेपेक्षा अधिक आवाज पडत असतो असंही या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. तर ४० टक्के तरुणांच्या कानावर सतत क्लब्स आणि कॉन्सर्टला जाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे अधिक ताण पडतो असंही ‘डबल्यूएचओ’च्या या अहवालात म्हटले आहे.

सतत हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्यांच्या कानावर १०५ डेसिबल इतका आवाज पडत असतो. चार मिनिटांपेक्षा अधिक काळ एवढा मोठा आवाज कानावर पडत राहिल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. या वरुन तासनतास हेडफोन्स कानात घालून प्रवास करणाऱ्यांच्या कानावर येणारा ताण किती असतो याचा अंदाज सहज बांधता येईल. क्लब आणि बारमधील गाण्यांचा आवाज हा ११० डेसिबल इतका असतो. इतका आवाज एका मिनिटापेक्षा जास्त वेळ कानावर पडणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते. तर फटाक्यांचा आवाज या सर्वांहून अधिक म्हणजेच १५० डेसिबल इतका असतो.

रोज आपल्याला आवडणारी गोष्ट करण्याच्या नादात अनेक तरुणांना बहिरेपणा येत असल्याचे मत ‘डब्लूएचओ’च्या ‘डिपार्टमेंट फॉर मॅनेजमेंट ऑफ नॉनकम्युटेबल डिसिजेस, डिसअॅबिलीटी, व्हॉयलन्स अॅण्ड इंज्युरी प्रिव्हेंशन’चे अध्यक्ष डॉ. इटियेन क्रग यांनी व्यक्त केले आहे. ‘एकदा ऐकण्याची शक्ती गमावल्यानंतर ती पुन्हा मिळवता येत नाही हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. दैनंदिन जिवनातील सवयींमध्ये छोटा बदल केला तरी त्यांना बहिरा होण्याचा धोका टाळता येईल’, असंही डॉ. क्रग या समस्येबद्दल बोलताना म्हणाले.

मोटरसायकलचा आवाज हा ९५ डेसिबल इतका असतो. हा आवाज अडीच तासाहून अधिक काळ सतत कानावर पडत राहिल्यास कानाच्या पडद्यावर परिणाम होऊ शकतो. रोज सकाळी हेअरड्रायरने केस सुकवणाऱ्यांनाही १५ मिनिटांपेक्षा जास्तवेळ तो वापरणे कानासाठी धोकादायक ठरु शकते. कारण हेअरड्रायरमधून १०० डेसिबल इतका आवाज येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 5:59 pm

Web Title: 110 crore people at risk of hearing loss age 12 25 at high risk because of headphone use
Next Stories
1 भारतात ‘या’ तारखेपासून Galaxy S10, S10+, S10e साठी प्री-बुकिंग होणार सुरू
2 Yamaha MT-09 भारतात लाँच, किंमत 10.55 लाख रुपये
3 कर्मचा-यांच्‍या अपेक्षा पूर्ण करणारं ‘सोशल ऑफिस’, गोदरेज इंटेरिओचा संशोधन अहवाल सादर