अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात गेल्या पन्नास वर्षांत एकूण १६ हजार नेत्रपटल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती राष्ट्रीय नेत्रपेढीचे अध्यक्ष जीवन तितीयाल यांनी दिली. नेत्रपेढी डॉ. राजेंद्र प्रसाद सेंटर फॉर ऑपथॅलमिक सायन्सेस या संस्थेत स्थापन करण्यात आली आहे. नेत्रपेढीला पन्नास वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एकूण नेत्रपेढीकडे २३ हजार दात्यांनी नेत्रदान केले होते, त्यातील सोळा हजार नेत्रांचे प्रत्यारोपण करण्यात आले. गेल्या वर्षी १ हजार नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय नेत्रदान सप्ताह पाळण्यात आला. नेत्रदात्यांच्या १०० नातेवाइकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. अनेक सामाजिक कार्यकर्ते नेत्रदान क्षेत्रात काम करीत आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातील नेत्रविज्ञान प्राध्यापक तितीयाल यांनी सांगितले, की नेत्रदानासाठी संस्थेच्या आवारात जागरूकता फेरी काढण्यात आली होती. इतर संस्थांमध्येही असे कार्यक्रम घेतले जात आहेत. सध्या अवयवदानाला महत्त्व दिले जात असताना त्यात नेत्रदानाचे महत्त्वही फार मोठे आहे. नेत्रपटले दान केल्याने अनेक लोकांना दृष्टी देता येते.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)