आगामी काळात जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना लहान असताना व पुढे मोठे झाल्यावर कोणते रोग होणार हे आधीच समजण्याची सोय झाली आहे. त्यात आता एका साध्या डीएनए चाचणीमुळे मुलांना होणारे १९३ रोग आधीच ओळखता येणार असून त्यात फेफरे, कर्करोग या रोगांचा समावेश आहे.

अमेरिकेतील एका जनुक चाचणी कंपनीने ही चाचणी शोधून काढली आहे.

यात गालातील जनुकीय नमुने घेऊन मुलाला पुढे कुठले रोग होणार, हे आई-वडील जाणून घेऊ शकणार आहेत. सेमा ४ नॅटॅलिस ही चाचणी आधीच्या चाचण्यांपेक्षा पाचपट अधिक रोगांचे निदान आधीच होणार आहे. सध्या अमेरिकी रुग्णालयात अशा जनुकीय चाचण्या असल्या तरी त्यात आधीच समजणाऱ्या रोगांची संख्या कमी आहे.

फेफरे, मणक्याचे रोग, मुलांचे कर्करोग अशा चाचणीत ओळखता येतात. या चाचणीला मान्यता मिळाली असून त्यामुळे रोगनिदानात प्रगती होणार आहे, असे सेमा ४ चे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक शा यांनी सांगितले. आताच्या काळात मुलांना होणारे रोग ओळखणे हे व्हिटॅमिनची गोळी घेण्याइतके सोपे होत चालले आहे, असे सांगून ते म्हणाले की, सेमा ४ नॅटॅलिस या चाचणीत मुलांच्या जनुकांचे अचूक विश्लेषण करून आनुवंशिक रोग ओळखता येतात. लहान बाळांचे आजारही यात समजू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.