करोना संसर्गामुळे रुग्णांमध्ये मेंदूच्या काही भागांवर परिणाम झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे. ‘लॅन्सेट सायकााट्रिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार करोनामुक्त झालेल्या पाचपैकी एक रुग्ण (२० टक्के) तीन महिन्यात मानसिक आजाराने ग्रस्त होत असल्याचं समोर आलं आहे.

‘लॅन्सेट सायकााट्रिक जर्नल’नं अमेरिकेतील ६९ हजार करोनाबाधित रुग्णांवर संशोधन केलं होतं. या सशोधनात इलेक्ट्रॉनिक आरोग्याच्या नोंदीचेही विश्लेषण करण्यात आलं आहे. संशोधनानुसार करोनामुक्त झालेल्या २० टक्के रुग्ण चिंता, नैराश्य किंवा निद्रानाशाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. तसेच वेड लागणे, मेंदू कमकुवत होणे आदि समस्यादेखील आढळून आले आहे. त्यामुळे करोनाच्या आजारासाठी नवीन उपचार पद्धत शोधून त्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वैज्ञानिकांचं म्हणणे आहे.

करोनाच्या संसर्गानंतर आपण बरे झालो म्हणजे सगळे आलबेल झाले असे समजणे चुकीचे आहे. कारण त्यामुळे मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत. लेखक पॉल हॅरिसन यांच्या मते, करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये चिंता आणि नैराश्याची चिन्हे दिसण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणेद्वारे हा विषाणू मानवी मेंदूचे थेट नुकसान करू शकतो. दुसरं कारण म्हणजे, करोना असल्याच्या अनुभवामुळे आणि पोस्ट कोविड सिंड्रोमच्या भीतीमुळे लोक चिंताग्रस्त होऊ शकतात.