‘बजाज ऑटो’ने आपली Pulsar RS200 ही लोकप्रिय बाइक BS6 व्हर्जनमध्ये लाँच केली आहे. लूक आणि स्टाइलच्या बाबतीत कंपनीने जास्त बदल केलेला नाही, त्यामुळे नवी पल्सर दिसायला BS4 मॉडेल प्रमाणेच आहे. भारतीय बाजारात Yamaha R15 V3 सोबत नव्या पल्सरची टक्कर असेल.

नव्या पल्सरमध्ये BS6, 199.5cc लिक्विड कूल, फ्युअल इंजेक्टेड इंजिन आहे, यासोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहेत. हे इंजिन 24bhp ऊर्जा आणि 18.7Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिनशिवाय अन्य काही बदल करण्यात आलेला नाही. बाइकमध्ये आधीप्रमाणेच फुल्ली फेयर्ड डिझाइन, मोठा फ्युअल टँक, स्टेप्ड अप सीट, आकर्षक ग्राफिक्स आहेत. जुन्या BS4 मॉडेलच्या तुलनेत या बाइकची किंमत 3 हजार रुपयांनी अधिक आहे. 1.45 लाख रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत कंपनीने ठेवली आहे.

याशिवाय एक एप्रिल रोजी कंपनीने Pulsar 180F आणि Pulsar 220F या दोन बाइकही BS6 इंजिनमध्ये लाँच केल्या. 2020 Bajaj Pulsar 180F BS6 ची एक्स-शोरुम किंमत 1,07,827 रुपये आहे. तर, BS6 Pulsar 220F ची एक्स-शोरुम किंमत 1,17,286 रुपये ठेवण्यात आली आहे. BS4 मॉडेलच्या तुलनेत या दोन्ही बाइकच्या किंमती अनुक्रमे 11 हजार व 9 हजार रुपयांनी वाढ झालीये. दरम्यान, देशभरात 1 एप्रिल 2020 पासून वाहनांसाठी नवीन ‘उत्सर्जन मानके’(इमिशन स्टँडर्ड) BS6 चे निकष लागू झाले आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने करोना व्हायरसमुळे ज्या कंपन्यांकडे अद्यापही बीएस-4 गाड्यांचा स्टॉक पडून आहे त्यांना 24 एप्रिल म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरचे अतिरिक्त 10 दिवस मुदतवाढ दिली आहे. तसेच, केवळ 10 टक्के स्टॉकचीच विक्री करता येईल आणि ही मुदतवाढ दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तेथील वाहन वितरकांसाठी नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.