डोकेदुखीचा त्रास होत असल्याने पेनकिलर घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली आहे. तरुणीने आईकडे डोकं दुखत असल्याची तक्रार केली होती. डोकेदुखी थांबावी यासाठी तिने पेनकिलर घेतल्या आणि झोपण्यासाठी गेली. इंग्लंडमध्ये ही घटना घडली आहे. जेसिका असं या तरुणीचं नाव असून १४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. जेसिकाच्या अचानक जाण्याने कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला असल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे.

“जेसिकाने झोपण्याआधी आपलं डोकं दुखत असल्याचं सांगितलं होतं. सकाळी मी तिला उठवण्यासाठी गेले असता तिचा मृत्यू झाला असल्याचं लक्षात आलं,” असं जेसिकाच्या आईने सांगितलं आहे. नंतर तपासणी केली असता जेसिकाला रक्तदोष आणि मेंदुज्ज्वराचा त्रास होता ही माहिती समोर आली.

“तिने आपलं डोकं दुखत असून थोडं अशक्त वाटत असल्याची तक्रार केली होती. तिने काही पेनकिलर घेतले, पाणी प्यायली आणि झोपण्यासाठी गेली होती. सकाळी मी उठवण्यासाठी गेले पण ती उठलीच नाही,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. जेसिकाच्या आईने तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली. यावेळी फोनवरुन देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी सीपीआर केला पण फायदा झाला नाही. जेसिकाच्या अचानक जाण्याने तिच्या आईसह कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.