बदलती जीवनशैली, असमतोल आहार यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात घातक परिणाम होत आहेत. २०२५ पर्यंत यापूर्वीच्या ९.१ कोटी स्थूल मुलांसह पाच ते पंचवीस वर्षे वयाच्या २६. ८ कोटी मुलांना अतिस्थूलता येणार असून, हे अतिशय घातक असल्याचे एका संशोधनात म्हटले आहे.  स्थूलपणा कमी करण्यासाठी जगातील सरकारांकडे कोणतेही परिणामकारक धोरण नसल्याने स्थूलपणामध्ये आणखी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक स्थूलता फेडरेशनने ११ ऑक्टोबरला जागतिक स्थूलता दिनानिमित्त सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

२०२५ मध्ये १२ दशलक्ष मुले रक्तातील जास्त ग्लुकोजशी शिकार बनणार असून, ४ दशलक्ष मुले टाइप-१ च्या डायबेटिसने पीडित होणार आहेत. तसेच २७ दशलक्ष मुलांना मोठय़ा प्रमाणावर रक्तदाब होणार असून, ३८ दशलक्ष मुलांच्या यकृतामध्ये फॅट जमा होण्याची शक्यता आहे, असे संशोधनामध्ये आढळून आले आहे.

हा अहवाल तयार करण्यासाठी २००० ते २०१३ पर्यंत संशोधन करण्यात आले आहे. ही एक धोक्याची घंटा असून येणाऱ्या वर्षांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या समोर उभ्या ठाकल्याचे या संस्थेने म्हटले आहे. असे होऊ नये अशी आमची इच्छा आहे. मात्र सरकारने मुलांच्या स्थूल होण्यावर योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच २०२५ पर्यंत मुलांमध्ये आलेले स्थूलत्व २०१० च्या स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे संस्थेने म्हटले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)