17 October 2019

News Flash

#ट्विटरसंमेलन: ट्विटरवरही होणार मायमराठीचा जागर

११ ते १३ जानेवारी या तीन दिवसांमध्ये रंगणार हे अनोखे संमेलन

#ट्विटरसंमेलन

यवतमाळमध्ये ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. एकीकडे पारंपारिक पद्धतीने साहित्याचा जागर होत असतानाच दुसरीकडे ट्विटरवरही एक आगळेवेगळे मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. ११ ते १३ जानेवारी या तीन दिवसांमध्ये ट्विटवर ‘चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे.

ट्विटरसारख्या माध्यमावर जास्तीत जास्त नेटकऱ्यांनी मराठीमध्ये लिहावं आणि त्या माध्यमातून मराठीचा प्रसार व्हावा या उद्देशाने #ट्विटरसंमेलन या अनोख्या मोहिमेचा जन्म झाला आहे. तीन दिवस रंगणाऱ्या या ऑनलाइन संमेलनामध्ये #ट्विटरसंमेलन हा हॅशटॅग वापरून ट्विपल्सला सहभागी होता येईल. ट्विटवरील @MarathiWord या अकाऊण्टवर या संमेलनाची अधिक माहिती मिळेल.

#ट्विटरसंमेलन हाच या संमेलनाचा मुख्य हॅशटॅग असणार आहे. या हॅशटॅगबरोबरच ट्विपल्स त्यांनी लिहीलेल्या साहित्यासाठी देण्यात आलेला विशेष हॅशटॅगही वापरु शकतात. यामध्ये एकूण बारा हॅशटॅग देण्यात आले असून त्यात कविता, ब्लॉग, कथा, शाळा, खमंग अशा वेगवेगळ्या विषयांवरील हॅशटॅग देण्यात आले आहे.

या १२ विषयांवर #ट्विटरसंमेलन मध्ये करुन शकता ट्विट

#माझीकविता
#ट्विटकथा
#माझाब्लाॅग
#माझीबोली
#साहित्यसंमेलन
#वाचनीय
#हायटेकमराठी
#बोलतोमराठी
#मराठीशाळा
#भटकंती
#खमंग
#माझेवेड

मागील तीन वर्षांपासून ट्विटरवर ट्विटर संमेलनाचे आयोजन केले जात आहे. याला मराठी नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो. केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर जगभरामधील नेटकरी या संमेलनाच्या माध्यमातून आपल्या लिखाणाची भूक भागवताना दिसतात.

First Published on January 11, 2019 12:50 pm

Web Title: 4th year of twitter marathi bhasha sammelan