13 December 2018

News Flash

तारुण्यात ‘या’ ५ आर्थिक चुका टाळा

चांगले नियोजन गरजेचे

तरुण वयात, एकटा जीव सदाशिव असताना तुमच्याकडे वेळ आणि पैसा बराच असतो कारण तुमच्यावर आर्थिक जबाबदारी किंवा कुटुंबाचा भार नसतो. पण काळाप्रमाणे आणि मोठे होत असताना आर्थिक परिस्थिती बदलते. त्यामुळे पुढे अडचण होऊ नये यासाठी आत्तापासून तुमचे अर्थकारण सुदृढ असले पाहिजे. एकदा लग्न झाल्यावर आर्थिक ध्येयांमध्ये साथीदाराच्या विचारांचाही समावेश होतो. जरी तुम्ही अर्थकारणासाठी नीति तयार केलेली नसली, तरी या लहान आर्थिक चुका करणे टाळल्याने भविष्यात त्यांची सल तुम्हाला राहणार नाही.

नियोजन करणे व्यर्थ आहे असे समजणे

तरुणपणी जेव्हा जबाबदारी नसते, तेव्हा आपण आपल्या अर्थकारणाकडे लक्ष देत नाही. पण नियोजित अर्थकारणाची गरज तुमचे लक्ष्य तसेच बांधिलकी स्पष्ट करण्यासाठी नक्कीच असते. हे नियोजन एखाद्या सल्लागाराच्या सहाय्यानेच झाले पाहिजे असे नाही, पण तुम्हाला किमान आपले मासिक बजेट तयार करून त्याप्रमाणेच वागायला हवे. तसेच तुमच्या उद्दिष्टांसाठी तुम्हाला तुम्ही केलेली गुंतवणूक माहीत असायला हवी. रिटायरमेंटसाठी तुम्हाला किती पैसा लागेल हे समजून घ्या आणि त्यासाठी एक-एक पाउल उचलणे सुरू करा. एवढी घाई कशासाठी, असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे, पण तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल आणि नियोजनाबद्दल कल्पना नसणे भविष्यात त्रासदायक ठरू शकते.

क्रेडिट कार्डांनी खिसा कापला जाणे

अनेक तरुण-तरुणी अनेक क्रेडिट कार्डे वापरतात. क्रेडिट कार्डांनी तुमचे आयुष्य सुकर होते, पण अनेक क्रेडिट कार्डे वापरल्याने पैशाचे नियोजन करण्यास त्रास होतो आणि तुमची क्रेडिट कार्डाची देणी ही एक डोकेदुखी ठरू शकते. अनेक लोक कार्डाचे मासिक स्टेटमेंटही वाचत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कार्डावर बँकेने किती व्याज घेतले आहे हे त्यांना माहितच नसते.
कार्डासंबंधी एक आणखी चूक म्हणजे कार्डावर फक्त किमान पैसे भरणे. महिना संपता-संपता अनेक तरुण कफल्लक झालेले असतात आणि त्यामुळे कार्डाचे पैसे भरताना दर्शवलेली किमान रक्कम भरतात. अशाने तुम्ही खर्च केलेल्या पैशावर फार जास्त व्याज द्यावे लागते आणि ते पुढील अनेक वर्षे चालू राहू शकते ज्याने तुमच्यावर कर्जाचे ओझे होते. अशाने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरीत प्रभाव पडतो ज्याने भविष्यात तुम्हाला कर्ज घेणे कठीण होऊ शकते.

संकटकालीन निधी तयार केलेला नसणे

तुमच्यावर आर्थिक संकट केव्हा येईल याची शाश्वती नसते. तुम्ही कमावते झाल्याबरोबर हा निधी तयार करून ठेवावा. सुरूवातीसच मोठी रक्कम नाही जमवू शकलात, तरी हळू-हळू काही कालावधी नंतर हा निधी तयार करू शकता. या निधीसाठी साधारणपणे 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम असणे बरे असते, पण याबद्दल तुम्ही स्वतः विचार करू शकता. पण जर हा निधी नसला, तर तुमची आर्थिक घडी केव्हाही विस्कटू शकते आणि तुम्हाला गरजेच्या वेळी कर्ज घेणे किंवा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीतून पैसे काढणे असे पर्याय पत्करावे लागू शकतात.

पुरेसे विमा कव्हर नसणे

आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग म्हणजे आयुर्विमा आणि आरोग्य विमा. आयुर्विमासाठी विमाधनाची रक्कम तुमच्या वयावर, जबाबदारींवर आणि कुटुंबातील आश्रितांच्या संख्येवर अवलंबून असते. तसेच आरोग्य विम्याची तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवर, आजारपणाच्या इतिहासावर, तुमचे शहर, तुमचे वय आणि घेतलेल्या इतर आरोग्य विमा पॉलिसीवर अवलंबून असते. आयुर्विमा आणि आरोग्य विमा पुरेसा नसणे म्हणजे मोठी जोखीम घेणे होय, अशाने तुमच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकींवर सुद्धा संकट येते.

विमा आणि गुंतवणूक यांना एकरूप करणे

ही तरुणपणी होणारी एक सर्वसामान्य चूक आहे. विमा पॉलिसामध्येच गुंतवणूक केल्याने तुमचा पैसा विमा कंपनीची महागडी फी आणि इतर शुल्क यांच्या रूपाने बाहेर जात असतो. तसेच विमा प्लॅन सुरूवातीस फार आकर्षक दिसतात, पण शेवटी त्यांच्यावरील परतावा अपेक्षेपेक्षा फार कमी असू शकतो. त्यामुळे विमा आणि गुंतवणूक यांना एकत्र आणू नका.

आदिल शेट्टी, सीईओ, बँकबझार

First Published on January 10, 2018 2:34 pm

Web Title: 5 mistakes one should avoid about financial planning in young age