जगभरातील इंटरनेटचा वाढता वापर आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणारे बदल आपल्याला अनेकदा थक्क करतात. काही वर्षांपूर्वी आपण २ जी इंटरनेट वापरायचो. त्यानंतर ३ जी आले आणि आता भारतातील ४ जी नेटवर्क युजर्सची संख्याही वाढली आहे. मात्र, आता भारताला 5G नेटवर्कचे वेध लागले आहेत. भारतात नवीन 5G सेवेला आवश्यक असलेल्या सेवा निर्माण करण्यासाठी स्वीडनमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या एरिक्सन कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीने भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलशी भागीदारी केली आहे.

यामध्ये करण्यात आलेल्या चाचणीत एरिक्सनच्या 5G टेस्ट बेड आणि 5G न्यू रेडिओ (एनआर) मार्फत अतिशय कमी वेळा म्हणजे ३ मिली सेकंदात ५.७ गीगा बाईट प्रती सेकंद एवढा वेग मिळाला. याशिवाय आणखी एक विशेष बाब म्हणजे भारतात येत्या काही काळात 5G ची सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बदल घडून येऊ शकतात. भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये २०१६ पर्यंत २७.३ अब्ज महसूल निर्माण करण्याची क्षमता असल्याचं एरिक्सनच्या अभ्यासात म्हटलं आहे. सरकारने २०२० पर्यंत 5G सेवा भारतात यावी यासाठी एका समितीची स्थापना केली आहे, ज्याद्वारे 5G सेवा भारतात आणण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात येतील.